Homeघडामोडीसमितीचा निर्णय शरद पवारांनी फेटाळला तर पर्याय काय असणार? जयंत पाटील म्हणाले..

समितीचा निर्णय शरद पवारांनी फेटाळला तर पर्याय काय असणार? जयंत पाटील म्हणाले..

"देशातील विविध नेत्यांचा आग्रह आणि राज्यातील लाखो कार्यकर्त्यांचा शरद पवारांवर विश्वास आहे, त्यामुळे…" असेही जयंत पाटील म्हणाले.

शरद पवार यांनी मंगळवारी (२ मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. शरद पवार यांनी अचानक घेतलेला हा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना धक्का देणारा होता. त्यानंतर पुढचा अध्यक्ष निवडण्यासाठी शरद पवार यांनी समिती नेमली होती. या समितीची आज (५ मे) बैठक झाली.

या समितीच्या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा नेत्यांनी एकमताने फेटाळला आहे. शरद पवार अध्यक्ष असतील, असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. यानंतर या समितीच्या नेत्यांनी ‘सिल्व्हर ओक’ येथे शरद पवार यांना आपला निर्णय कळवला आहे. यानंतर शरद पवार विचार करून निर्णय देतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, “देशातील विविध नेत्यांचा आग्रह आणि राज्यातील लाखो कार्यकर्त्यांचा शरद पवारांवर विश्वास आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शरद पवारांनीच अध्यक्षपदी राहावे, ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे. समितीचा ठराव शरद पवार यांच्या कानावर घातला आहे. ‘विचार करून सांगेन,’ असं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार निर्णय कधी जाहीर करणार? यावर जयंत पाटल म्हणाले, “शरद पवार यांनी समितीतील सर्वांचे मत ऐकून घेतले आहे. आम्ही सर्वांनी विनंती केली आहे, लवकरात लवकर निर्णय द्यावा. कारण, महाराष्ट्रासह देशातील कार्यकर्ते निर्णयाची वाट पाहत आहेत.”

शरद पवारांनी निर्णय नाकारला तर पर्याय काय असणार? असे विचारले असता जयंत पाटल म्हणाले, “शरद पवारांशिवाय पर्याय नाही, यावर कोणतीही चर्चा झाली नाही.”

बैठकीत कार्याध्यक्ष नेमण्याबाबत चर्चा झाली का? जयंत पाटल यांनी स्पष्ट केले आहे. “कार्यकारी अध्यक्ष नेमण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. अध्यक्षपदी फक्त शरद पवारच राहावेत, असा आग्रह होता. तशी विनंती शरद पवार यांना केली आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular