मतदारांच्या मतपेटीचे, नाही ठेवले उपकार
हात जोडले कोपरापासून, अजब तुझे सरकार ।।धृ।।
निवडणुकीवर लक्ष ठेवूनी, गैरमार्गाने मत घेऊनी
खोट्या आश्वासनांनी तुही, गाजवला प्रचार
हात जोडले कोपरापासून, अजब तुझे सरकार ।।१।।
सत्तेच्या लालसेपायी, भ्रष्ट केल्या दिशा दाही
आता संकटाच्या काळात तु, घेत नसे पुढाकार
हात जोडले कोपरापासून, अजब तुझे सरकार ।।२।।
दवा दारूचा बाजार मांडला, श्रेयासाठी आपसात भांडला
या नौटंकीच्या राजकारणातून, झाला आम्हाला साक्षात्कार
हात जोडले कोपरापासून, अजब तुझे सरकार ।।३।।
महामारीने थैमान घातले, डोळ्यामधूनी अश्रू आटले
प्रेतांचा तो खच पाहुनी, इथं माजवला हाहाकार
हात जोडले कोपरापासून, अजब तुझे सरकार ।।४।।
अंत्यसंस्कारा जागा नाही, म्हणून प्रेतं गंगेत वाही
मेल्यावरही हेळसांड पाहून, मनी उठती फुत्कार
हात जोडले कोपरापासून, अजब तुझे सरकार ।।५।।
गरीबांची ती सारी पीडा, भोगून तु ही शिकावा धडा
योग्याच्या या तळमळीतून, असा घडावा चमत्कार
हात जोडले कोपरापासून, अजब तुझे सरकार ।।६।।
✍️- योगेश पानपाटील
मुख्यसंपादक