व्यवसाय करण्याचा निर्णय घेऊन आपण या टप्प्यावर पोहोचलो आहोत. आता जगातील कोणतीही ताकद आपल्याला आपला व्यवसाय चालू करण्यापासून रोखू शकत नाही, कारण आपली उत्तम मानसिकता तयार झालेली असते. त्यातून आपण व्यवसायच करणार हे आपले ठाम मत तयार होऊन कित्येक दिवस उलटून गेलेले असतात. आपल्यातला विश्वास वाढलेला असतो. आपण आपला व्यवसाय ठरवलेला असतो. वेळकाळाची तमा न बाळगता आपण बिझनेस प्लॅन तयार केलेला असतो. तहानभूक विसरुन तो बिझनेस प्लॅन विविध गुंतवणूकदारांना, भांडवलदारांना व बँकांना समाजावलेला असतो. घरातल्या व्यक्तींना, नातेवाईकांना व मित्रमंडळीना आपल्या व्यवसायाविषयी माहिती झालेली असते. त्यातील बरेचजण आता आपल्याला मदत करायला तयार असतात किंवा त्यांचा विरोध आता सौम्य झालेला असतो. आता आपल्याला भांडवल मिळालेले असते. आपली कंपनी नोंदणी झालेली असते.
आपल्या बऱ्याच प्रश्नांची आपल्याला आता उत्तरे मिळालेली आहेत. राहिलेल्या काही प्रश्नांची आपण आता मिळवणार आहोत. त्याआधी आपण स्वामी विवेकांनदांचे एक वाक्य मनावर कोरुन ठेवले पाहिजे, ते म्हणजे “एकदा एखादी कल्पना स्वीकारली की मग तिलाच आपले जीवनसर्वस्व बनवा, सतत तिचाच ध्यास घ्या, तिचीच स्वप्ने बघा, तिच्यावरच जगा. तुमचा मेंदू, तुमचे स्नायू, तुमचे मज्जातंतू, तुमच्या शरीराचा अणुरेणू त्याच कल्पनेने भरला जाऊ द्या. इतर कोणत्याही विचाराला व कोणत्याही कल्पनेला थारा देऊ नका. यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे. थोर थोर धर्मवीर केवळ याच तऱ्हेने निर्माण होत असतात.” या ठिकाणी धर्मवीरच्या ऐवजी उद्योजक तयार होतील, कारण जी कल्पना आपण स्वीकारली आहे, ती उद्योगाची आहे.
जगप्रसिध्द हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांना २३२ कोटीपेक्षा अधिक कर्ज झाले असताना त्यांनी स्वामी विवेकानंदांनी वरील सांगितलेला मार्ग स्वीकारला. परत ते मोठ्या जोमाने कामाला लागले. आज त्यांचे यश आपल्यासमोर आहे. त्यांच्याकडून कित्येकवेळा मी हे वाक्य ऐकलेले आहे. स्वामीजींचे दुसरे एक वाक्य जे सुरुवात करण्यापूर्वी अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपण उद्योगात यशस्वी होण्याचा एक नवीन धडा शिकू शकतो, ते म्हणजे; “माझ्या आयुष्यात जी एक फार महत्त्वाची गोष्ट मी शिकलो आहे ती ही की, कर्माच्या बाबतीत साध्याइतकेच साधनाकडेही लक्ष द्यायला पाहिजे. या एकाच तत्त्वात कर्माच्या यशाचे सर्व रहस्य सामावलेले आहे. आपल्या जीवनामध्ये फार मोठी चूक जर कोणती असेल, तर ती ही की आपण ध्येयाकडे इतके आकर्षिले जातो, ते आपल्याला मोहक वाटतं, आपल्या मनावर त्याचा इतका प्रभाव पडतो की ते प्राप्त करुन घेण्याच्या साधनांच्या तपशीलाकडे आपले दुर्लक्ष होते. पण जेव्हाजेव्हा आपल्याला अपयश येतं तेव्हा तेव्हा अगदी बारकाईने त्याचं पृथ्थकरण केल्यास शेकडा नव्याण्णव वेळा आपल्याला असं दिसून येतं की आपण साधनाकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. हेच आपल्या अपयशाचं कारण आहे. साधनं परिपूर्ण आणि बलवत्तर करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य लक्ष देणं हे आपल्यापक्षी आवश्यक आहे. साधनं योग्य आणि परिपूर्ण असतील तर ध्येय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपण ही गोष्ट विसरुन जातो, कारणापासूनच कार्याची उत्पत्ती होते. कार्य आपोआप निर्माण होत नाही. कारणं योग्य, अचूक आणि बलवान असल्याखेरीज कार्याची निर्मिती होणार नाही. एकदा ध्येय ठरवले त्याची साधने निश्चित केली की मग आपण ध्येयाचा विचार करणं प्रायः सोडून दिले तरी हरकत नाही. कारण आपल्याला खात्री असते की साधने परिपूर्ण झाल्यावर ध्येयप्राप्ती झाल्यावाचून राहणार नाही. कारण जर उपस्थित असेल तर त्याचा परिणाम म्हणजे कार्य दिसून येण्यासाठी विशेष अडचण भासणार नाही. मग कार्याची उत्पत्ती होईलच. आपण जर कारणाच्या बाबतीत काळजी घेतली तर कार्य हे आपोआप निर्माण होईलच. ध्येयसिध्दी हे कार्य आहे आणि साधन हे कारण आहे. म्हणून साधनाकडे लक्ष देणं हे जीवनसाफल्याचे रहस्य आहे.”
यात साधने म्हणजे आपल्या व्यवसायासाठी लागणारी यंत्रे, मनुष्यबळ, तंत्रज्ञान, ऑफिस, कारखाना, visiting cards (भेटकार्ड), लेटरहेड, वेबसाईट, सरकारी परवानग्या, बँकेत खाते असणे अशा सर्व गोष्टी होत.
प्रत्यक्ष उत्पादनापूर्वी ही सर्व साधने आपण निर्माण करणे. त्याची उपलब्धता करणे, किंवा त्याच्या outsourcing ची खात्रीशीर/विश्वसनीय अशी व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. मग ध्येय प्राप्त होईलच. हा लेख परत परत वाचून यातील प्रत्येक शब्द आपल्या व्यवसायात कशा प्रकारे लागू होईल ते समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुख्यसंपादक