लस्सी जैसी कोई नही.
काही दिवसांपूर्वी एक कविता वाचनात आली. लस्सी ते चा असे त्या कवितेचे नाव होते. कवी अन्वर मसूद यांनी पंजाबीत लिहिलेली ही कविता व तिचे हिंदी रुपांतर पहाण्यात आले.
कवितेत लस्सी आणि चहा यापैकी कोण जास्त बरे आहे असा विवाद लस्सी आणि चहामध्ये झालेला दाखवला आहे. शेवटी ते दुधाला विचारतात की त्यांच्यात जास्त उपयोगी कोण? दुध त्यांचा निवाडा करते अशा अर्थाची ती कविता आहे.
माझे मत विचारले तर चहा आणि लस्सी यांच्यात विवाद होण्याचे कारणच नाही. थंडीत आणि पावसात चहाला जास्त पसंती दिली जाईल पण उन्हाळ्यात मात्र लस्सीचाच पहिला नंबर लागेल.
पंजाबात प्रसिद्ध असलेल्या या लस्सीचे भारतातही अनेक ठिकाणी फॅन्सफॉलोअर आहेत . तशी अमूल लस्सीने हिलाबाजारात ब्रॅंडनेमही मिळवून दिले पण पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या लस्सीची सर त्या खोक्यातल्या लस्सीला नाही.
ताजे घट्ट दही त्यात साखर आणि दूध घालून भरपूर घुसळायचे. घुसळून एकजीव झाले की दुधाची मलई त्यात घालायची ( म्हणजे साय नव्हे तर निरसे दुध घुसळून जी वरती येते ती मलई). वेलची आणि केशरकाड्या घालून पुन्हा थोडे घुसळायचे. ग्लास भरताना थोड्या उंचावरून फेसाळती लस्सी ग्लासात ओतायची वर बारीक चिरलेले बदामाचे काप पसरायचे. अशी लस्सी आणि तुपातले आलू पराठे सकाळी नाष्ट्याला खाल्ले की काय बिशाद दुपारपर्यंत भूक लागायची. माझ्यासारखीला तर संध्याकाळपर्यंत भूक लागणार नाही.
दुपारच्या रणरणत्या उन्हात घरी आल्यावर थंडगार लस्सीचा ग्लास समोर आला की जो आनंद मिळतो त्याची तुलना स्वर्गप्राप्तीशी करता येईल. स्वर्गीय आनंद असतो ती लस्सी पिण्यात आणि वरच्या ओठावर पांढऱ्या मिशीची रेघही यायला हवी अशी लस्सी प्यायल्यावर….
ही झाली मिठी लस्सी. त्यात आणखी एक प्रकार बहुदा गुजरात, राजस्थान भागात दिसतो ती म्हणजे खारी लस्सी. बाकी पद्धत सारखीच असली तरी साखर अजिबात नसते. तव्यावर किंवा मातीच्या खापरावर भाजलेल्या जिऱ्याची ताजी पूड आणि काळे मीठ घालून ही खारी लस्सी बनते. त्यातल्या जीरेपुडीच्या प्रमाणावर आणि खरपूस भाजलेपणावर हिची चव अवलंबून असते.
जेवताना ज्यांची एक नजर वजनाच्या किंवा कॅलरीजच्या काट्याकडे असते अशा डाएट तज्ञांनी लस्सीच्या वाटेला जाऊच नये. त्यांनी आपले ताक प्यावे.
दही भरपूर घुसळून त्यात पाणी घालून त्यातले लोणी बाजूला करुन जे उरते ते ताक. यातही सायीसकटचे दही आणि बीनसायीचे दही असेही पोटभेद आहेत. काहींना बीन सायीच्या दह्याचे ताक आवडते तर काहींना सायीच्या दह्याचे ताक आवडते. यात किंचीत मीठ, हिंग घालून प्यायले तर पाचक असते असे म्हणतात.
जुन्या ग्रंथांमध्ये एक भाग दही व त्यात तीन ते पाचपट पाणी घालून घुसळून ते प्यायल्यास पचनसंस्थेचे आजार बरे होतात असा उल्लेख आढळतो.
गुजरात मध्ये जेवणानंतर ताक प्यायची पद्धतच आहे. या ताकात कोथिंबीर, आले, हिरवी मिरची, सैंधव आणि जिरेपूड घातलेली असते. यास मसाला छास म्हणतात.
महाराष्ट्रात, विशेषतः कोकणात ताकभात खायची सवय आहे. ताक कण्या किंवा ताकातली उकड हे आणखी काही सकाळच्या न्याहारीचे पदार्थ कोकणात सर्रास दिसून येतात.
लस्सी सारखाच पण थोडा वेगळा मराठी पदार्थ म्हणजे पियुष…
श्रीखंड, ताक, जायफळ किंचित लिंबाचा रस एकत्र घुसळून पियुष बनवतात. जायफळ आणि लिंबामुळे या पेयाला एक विशिष्ट चव येते. पुण्यात अनेक ठिकाणी व दादरमधील काही मराठी हॉटेलमध्ये पियुष मिळते. एक वेगळ्या चवीचे पेय म्हणून पियुष प्यायला हरकत नाही.
लहानपणीची लस्सीची आठवण म्हणजे शिवाजीमंदीरच्या बाहेर एक लस्सी वाला होता. त्याच्याकडे ते लस्सीने भरलेले चकचकीत हंडे अजून आठवतात. तो लस्सीवर चमच्याने मलई घालून द्यायचा. पण बाहेरचे खाणे म्हणजे आजारी पडायला निमित्त हे मनावर पक्के बिंबवले गेले होते. (आईसफ्रूटवर मीठ घातले की त्यातून किडे वळवळत बाहेर येतात, लस्सीत मलई ऐवजी टीपकागदाचा लगदा घालतात, पेप्सीकोला बनवायला घाणेरडे पाणी वापरतात. हे शोध कोणाच्या सुपीक डोक्यातून आलेत माहीत नाही पण लहानपणी माझा त्यावर भाबडा विश्वास होता. शिवाय आईबाबा वाक्यं प्रमाणम् असण्याचा तो काळ होता.) त्यामुळे क्वचितच कधीतरी ती लस्सी प्यायल्याचे आठवतेय.
आतातर काय गुलाब, स्ट्रॉबेरी, आंबा, अननस अशा वेगवेगळ्या चवीची लस्सी प्यायला मिळते. पण ते काहीही असले तरी कपिलदेव म्हणतो तसे पंजाबी लस्सीदा जवाब नही.
लस्सी जैसी कोई नही.
तुम्ही कोणत्या पंथातले ? ताक की लस्सी ?
- डॉ. समिधा गांधी
मुख्यसंपादक
[…] उन्हाळा स्पेशल – लस्सी जैसी कोई नही […]