Homeघडामोडीएका दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली समीर वानखेडे यांची मुलाखत आज होतेय व्हायरल...

एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली समीर वानखेडे यांची मुलाखत आज होतेय व्हायरल | Saeer Wankhede Interview Viral

अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यकठोर , कुठलाही भेदभाव न करता कायद्यासमोर सगळयांनाच समान मानणारे, तसेच सध्या NCB चे Zonal Director असलेले धडाकेबाज अधिकारी श्री समीर ज्ञानदेव वानखेडे, IRS, यांच्याशी श्री संतोष पेडणेकर ह्यांनी केलेली मनमोकळी बातचीत.हि मुलाखत मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईस युनियनचे मुखपत्र असलेल्या ” कामगार ” च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती.

नमस्कार सर!

साहेब मुलाखतीची सुरुवात आपल्या कौटुंबिक माहितीने करूया ?

हो…चालेल ना! माझे वडील श्री. ज्ञानदेव वानखेडे स्टेट एक्साईज म्हणजे राज्य उत्पादन शुल्क जे अमली पदार्थ व दारूबंदी यासंदर्भात काम करते. ते या खात्यामध्ये उप अधीक्षक होते. ते लाॅयर असून सध्या निवृत्त झालेत. माझी आई २०१५ साली स्वर्गवासी झाली. तिने तिच्या आयुष्यात देखील खूप समाजसेवा केली. दोनशेहून अधिक निराधार मुलांना तिने दत्तक घेतले होते. तिच्यामुळे मला देशसेवा करण्याची खूप मोठी प्रेरणा मिळाली. तिने खूप चांगले संस्कार माझ्यावर केले. माझी एक मोठी बहीण आहे ती सुद्धा लॉयर आहे आणि मी सुद्धा बाय प्रोफेशन लॉयर आहे त्यानंतर माझी पत्नी, आपणा सर्वांना माहिती आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती. मला एक मुलगा आहे अधीर त्याचं नाव व दोन जुळ्या मुली आहेत .जिया आणि आणि जायरा.

सर आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कुठे झाले?

माझं दहावीपर्यंतच शिक्षण वडाळा येथील सेंट जोसेफ हायस्कूल येथे झालं. तर महाविद्यालयीन शिक्षण पदवीपर्यंत रामनारायण रुईया येथे झाले. ग्रॅज्युएशन नंतर मी UPSC च्या तयारीस लागलो. त्याच वेळी मुंबई युनिव्हर्सिटी मधून LLB पूर्ण केले.

http://linkmarathi.com/झाडमाया/

सर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपलं पहिलं सिलेक्शन कुठे झालं?

माझं पहिलं सिलेक्शन २००५ मध्ये देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो ज्याला आसुचना एकक म्हणतात त्यामध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून झालं . ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर माझी नियुक्ती आंध्रप्रदेश मध्ये झाली . इथं नक्षलवाद्यां विरुद्ध अनेक यशस्वी कारवाया केल्या. तिथून पुढे दिल्ली येथे IB मधूनच बदली झाली. त्यानंतर 2007 मध्ये Civil Service ची परीक्षा दिल्ली येथे दिली पुढे 2008 मध्ये माझं सिलेक्शन IRS ऑफिसर म्हणून झालं. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे कस्टम्स विभागात इंटेलिजन्स युनिट मध्ये Asstt. Commissioner म्हणून नेमणूक झाली. त्याआधी सुद्धा अनेक क्षेत्रात मला संधी उपलब्ध झाल्या होत्या. उदाहरणार्थ मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक पदासाठी , सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्स मध्ये PSI पदासाठी निवड झाली, Asstt. Commander पदासाठी BSF मध्ये निवड झाली. माझा ओढा युनिफॉर्म सर्विस कडे जास्त असल्याने मी इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस, इंडियन फोरेन सर्विस यांच्या ऐवजी IB ला पसंती दिली.

पोलीस दल, BSF, IB, कस्टम्स, सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्स इत्यादी विविध खात्यांची नावे लक्षात घेता, हे सर्वच जॉब अतिशय चॅलेंजिंग व खडतर स्वरूपाचे होते याकडे तुमचा असलेला कल लक्षात घेता तुम्हाला लहानपणा पासून साहसी खेळांची आवड होती का?

हो! होती ना! मला लहानपणापासून आईने कराटे शिकण्यासाठी माझगाव येथील ग्लोरिया चर्च येथे पाठवलं. मी कराटेचा ब्राऊन बेल्ट आहे.

http://linkmarathi.com/नशा-व्यसन-drugs/

या क्षेत्रात येण्यासाठी आपले आदर्श कोण होते?

*सर्वात आधी माझें आदर्श ,माझे आई-वडील आहेत. आज मी जो काही आहे त्याचे श्रेय आईनं माझ्यावर केलेल्या संस्कारांना जाते. तिने मला सांगितले होते की तुला देशासाठी जे काही करता येईल ते कर. मी आधीच सांगितलं की ती एक समाजसेविका होती. She was coming from a good family and she was a business woman. पैशां साठी कधीही चुकीचे काम करू नको. तुला पैशाची गरज पडली तर माझ्याकडून घे. तुला फक्त देश सेवा करायची आहे ही शिकवण तिने मला दिली.

नक्षलवादी भागात सेवा बजावताना काही विशेष अनुभव आले होते का?

हो नक्कीच..! 2005 मध्ये आंध्रप्रदेश येथे निजामाबाद मध्ये माझी पोस्टिंग होती तेव्हा नक्षली कारवाया जोमाने चालू होत्या. घनदाट जंगल असलेल्या या भागात कम्युनिकेशनचा, ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम होता . भाषेचा प्रश्न होता.त्यातून मी मराठी, परप्रांतीय . अशा परिस्थितीत काम करणं खुपच अवघड जात होतं. परंतु IB ने मला भरपूर पाठिंबा दिला देशासाठी आपण काहीतरी करू शकतो ह्याच समाधान मिळत होतं.

तिथलं ट्रेनिंग कसं होतं?

केंद्रीय पोलिस दलाचे ट्रेनिंग अतिशय खडतर व उच्च दर्जाचे होते. त्यामध्ये आम्हाला आईसक्राफ्ट, कमांडो ट्रेनिंग, माउंटेनियरिंग, पोलिस ट्रेनिंग असे विविध प्रकारचे एक वर्षाचे ट्रेनिंग दिले गेले.IRS झाल्या नंतर सुद्धा पुढील दोन वर्ष संपूर्ण देशभर विविध भागात जाऊन ट्रेनिंग केलं. त्यानंतर NIA मध्ये आल्यानंतर मला होम मिनिस्टरीने मोठी संधी दिली. मला शार्प शूटर ,स्नायपर च्या ट्रेनिंग साठी अमेरिकेला पाठवलं होतं. त्या बद्दल मी नेहमीच भारत सरकारचे मनापासून आभार मानतो की, एवढ्या महत्त्वाच्या ट्रेनिंगसाठी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला संधी दिली.

आपण रेवेन्यू सर्विस कडे कसे काय वळलात?

माझे ऑप्शन्स IPS व इंडियन रेवेन्यू सर्विस मधील कस्टम्स, यासारख्या युनिफॉर्म सर्व्हिस हे होते.मी IAS किंवा IFS ला सुद्धा ऑप्शन दिले नव्हते मात्र अन्य दोन सर्विस साठीही माझें ऑप्शन दिले होते पण युनिफॉर्म सर्व्हिस ला जास्त प्राधान्य होतं. मला माझा दुसरा ऑप्शन मिळाल्यावर त्यात मी समाधानी होतो शिवाय कस्टम्सचा जॉब सुद्धा खूपच चॅलेंजिंग आहे, त्यामुळे मी कस्टम्सची निवड केली.

http://linkmarathi.com/एक-चूक/

कस्टम्स मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर AIU म्हणजे एअर इंटेलिजन्स युनिट मध्ये काम करतानाचे अनुभव कसे होते?

माझ्या संपूर्ण 14 वर्षांच्या सर्विस करीयर मध्ये सर्वात जास्त अनुभव देणारी व एक्साइटमेंट असलेली एअरपोर्ट ची पोस्टिंग होती. मुंबईतील ही माझी पहिलीच पोस्टिंग होती. कस्टम डिपार्टमेंट मध्ये काम करताना, कुठल्याही देशातील विदेशातून भारतात येणाऱ्या व्यक्ती, मग ती एखाद्या देशाची राजदूत असूदे किंवा सामान्य नागरिक. ती व्यक्तीं देशात आल्यावर पहिल्यांदा तुम्हाला सामोरी जाते. इथे तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करीत असता . सहाजिकच त्या व्यक्तीचं भारताबद्दलचं फर्स्ट इम्प्रेशन तुम्हाला पाहिल्यानंतर, भेटल्यानंतर तयार होतं असतं. त्यामुळे ही फार मोठी जबाबदारी कस्टम्स डिपार्टमेंट मध्ये काम करताना आपल्यावर असते. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत एअरपोर्टला ड्युटीवर होता. तुम्हाला माहितच आहे की, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी संपर्क येतो. त्यावेळी स्मगलिंग मोठ्या प्रमाणावर चालत होतं. गोल्ड, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अंमली पदार्थ इत्यादी‌. तर अशा प्रकारच्या लोकां बरोबरच अनेक प्रतिष्ठित मान्यवर लोकांनाही आपल्याला सामोरे जावे लागते. तिथे काम करताना एकाच वेळी तुम्हाला to be a very soffisticate आणि त्याच बरोबर तुम्हाला a true intelligent officer अशी दुहेरी भूमिका पार पाडावी लागते. हि दुहेरी जबाबदारी पार पाडताना मला खूप काही शिकायला मिळाले.

एअरपोर्टला उतरल्यावर अनेक सेलिब्रिटी मंडळी आपल्या नावाचा गैरफायदा घेत असतात. AIU मधील सेवा काळात त्यापैकी अनेकांना तुम्ही वठणीवर आणले. यामध्ये सिनेक्षेत्रातील बरीच नामांकित मंडळी होती. ( मला मधेच थांबवून सर हसून म्हणाले. )

नाही तसं काही नाही . माझ्यासाठी व्यक्ती कुठल्या क्षेत्रातील आहे याचा काहीच संबंध नाही. तसा मी सिनेमा प्रेमीही नाही. मात्र संविधाना समोर किंवा कायद्या समोर सगळेच नागरिक समान आहेत असे मी मानतो.

IB मधील ट्रेनिंगचा फायदा IRS मध्ये सेवा बजावताना कितपत झाला?

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

खूपच झाला. कारण IB मधील ट्रेनिंग सर्वांनाच करायला मिळत नाही. ते अत्युच्च स्वरूपाचे ट्रेनिंग असते. इंटेलिजन्स डिपार्टमेंट मध्ये कसं काम करायच हा IB च्या ट्रेनिंगचा भागच होता. त्याची मदत पुढे नक्कीच झाली.

कर्तव्यकठोर अधिकारी आणि कुटुंब वत्सल व्यक्ती या दोघांचा समतोल आपण कसा सांभाळता?

Unfortunately balance होतच नाही. कारण माझे दिवसातील 16 ते 17 तास कामांमध्ये जातात . सकाळी जेव्हा मी ऑफिसला जायला निघतो तेव्हा माझी तिन्ही मुलं झोपलेली असतात चुकून कधी रात्री लवकर म्हणजे दहा साडेदहा पर्यंत गेलोच तर त्यांच्या बरोबर दहा वीस मिनिटे खेळतो, पण बर्याचदा मी घरी पोहोचतो तेव्हा ती झोपलेली असतात.

एक पिता म्हणून या गोष्टीचा आपल्याला त्रास होत असेल?

हो, नक्कीच होतो! पण यापेक्षा माझ्यावर सरकारने सोपवलेली देशसेवेची जबाबदारी जास्त महत्त्वाची आहे असं मी मानतो.

आजपर्यंत आपण IB, Customs, DRI, NIA, NCB अशा विविध महत्त्वपूर्ण सरकारी विभागांमध्ये काम केलं. तिथल्या कामाचा दर्जा एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्हाला समाधानकारक वाटतो का?

हो नक्कीच वाटतो .जेव्हा प्रथम IB मध्ये काम केलं तेव्हा माझा Prime Moto हा National Security, Anty Terrorist Activities हाच होता. त्यानंतर एअरपोर्टवर काम करताना Anty Smuggling ची जबाबदारी होती. ती पार पाडताना जवळपास तीन हजार केसेस केल्या. DRI मध्ये काम करताना सतरा हजार कोटीचे अ़मली पदार्थ तर 185 किलो सोन पकडलं. अश्या इतरही अनेक महत्त्वपूर्ण कामगिऱ्या केल्या. तुम्हाला माहीत असेलच की सध्या NCB मध्ये drugs प्रकरण किती गाजत आहे ते. अनेक तरुण मुलं या ड्रग्स च्या विळख्यात सापडून वाया जात आहेत. कितीतरी घरं बरबाद होत आहेत. तर या गोष्टींना थांबवणे ही सुद्धाआमच्यावर खूप मोठी सामाजिक जबाबदारी आहे.या सर्व कामाचे समाधान नक्कीच आहे, त्याही पेक्षा जास्त आनंद हा आहे की ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्याची संधी मला भारत सरकारने दिली.

सर, सरकारी सेवेत आल्यावर अशा प्रकारची देशसेवा करायची संधी अनेकांना मिळते, परंतु तिचा प्रामाणिकपणे उपयोग करणे हे फारच थोड्या लोकांना जमतं. म्हणूनच आपण ज्या ज्या विभागात काम केलं त्या त्या विभागात अत्यंत कौशल्याने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सेवा करून स्वतः बरोबरच त्या त्या विभागाला सुद्धा आपण सन्मान मिळवून दिलात.आपल्या आदर्शवत कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

(विनयाने हसून) सरकार मला त्यासाठी वेतन देत आहे तर मग मला सुद्धा त्याला योग्य न्याय दिलाच पाहिजे ना?

सर पदवीधर होऊन स्पर्धापरीक्षा देऊन या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍या तरुणांना आपण काय सल्ला द्याल?

या सर्व तरुणांना एकच सांगेन आपण आज जागतिक स्तरावर Developing Country कडून आता एक Developed nation म्हणून नावारुपाला येत आहोत. अशावेळेस एक भारतीय नागरीक म्हणून देशासाठी आपण काय योगदान देऊ शकतो? तर त्यासाठी पहिला प्रहार भ्रष्टाचारावर केला पाहिजे. भ्रष्टाचार संपूर्ण बंद झाला पाहिजे. लोकांची निपक्षपातीपणे सेवा करा कायद्यासमोर सर्वांना समान माना. “टू फाईट करप्शन ॲन्ड टू सर्व्ह द नेशन विथ इनपार्शलिटी” एवढंच सांगेन.

आपल्या सतरा वर्षाच्या सेवाकाळात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य आपल्याला कसे मिळाले?
(हसून) You can’t choose your Boss, but you’re fine , everyone is fine. तुम्ही तुमचे काम योग्य पद्धतीने , शिस्तबद्ध प्रामाणिकपणे करीत असाल तर तुम्हाला कोणी त्रास देऊ शकत नाही आणि माझ्या सुदैवाने मला संपूर्ण सेवाकाळात खूप चांगले चांगले वरिष्ठ अधिकारी भेटले हे माझं सौभाग्य.

सर हे NIA चे Commandation आपल्याला कोणत्या कामगिरी बद्दल मिळाले होते?

2017 मध्ये आयसिस (ISIS) च्या म्हणजेच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया ह्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन च्या विरुद्ध आपल्या देशातील जे सर्वप्रथम सिक्रेट ऑपरेशन झालं होतं त्यामधील यशस्वी कामगिरीबद्दल सर्विस ॲंड गॅलंटरी अवॉर्ड मिळाले होते.

DRI ने सुद्धा आपल्याला DG Disc ने सन्मानित केले होते त्याबद्दल काय सांगाल?

DRI च्या पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, 2019 मध्ये आम्ही 185 किलो गोल्ड पकडलं. ह्याच कामगिरीबद्दल मला सन्मानित करण्यात आलं होतं. मला DRI मध्ये अशा तिन DG Disc मिळाल्या. तसेच NIA मध्ये सहा ते सात DG Disc मिळाल्या. कस्टम्स मध्ये 2012 साली बेस्ट असिस्टंट कमिशनर चा अवॉर्ड मिळाला असे अनेक पुरस्कार व कित्येक सर्टिफिकेट्स मला मिळाले. आसरा समूहाचा मान मराठी मनाचा या महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा साहित्य संस्कृतीचा प्रसार व प्रचार करणाऱ्या संस्थेने, मुंबई कस्टम्स मध्ये आपल्या कामगिरीने दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे जमादार कै. बापू लक्ष्मण लामखडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी देण्यात येणारा पहिला पुरस्कार 2019 ला मिळाला. याबद्दल थोडं अधिक सांगेन की आजही जमादार बापू लक्ष्मण लामखडे कस्टम डिपार्टमेंट साठी आयडियल आहेत. त्यांची कार्यपद्धती, बहादुरी, त्यांचे खब-यांचे नेटवर्क इत्यादी सर्व गोष्टी IRS officer साठी आदर्श आहेत. १९५०-६० मध्ये त्यांनी केलेले कार्य आजही आपण आठवतोय यातच सर्व काही आले. त्यांना माझा सलाम.

२ जुलै २०२१ ते २ जुलै २०२२ हे वर्ष जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे त्याबद्दल आपण काय संदेश द्याल?
मी सर्व IRS officer, आणि सर्व Government Servants यांना एवढेच सांगेन, एक साधा जमादार असूनही जमादार बापूंनी जशी आदर्श कामगिरी केली त्या कार्यपद्धती प्रमाणे काम करा. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करा. मला संधी मिळाली तर जमादार बापूं संदर्भात काही करायला नक्कीच आवडेल.

सर, आपणही आपल्या छोट्याशा कारकिर्दीत बरीच मोठी कर्तबगारी केलेली आहे. या आठवणी पुस्तक रूपाने लोकांना सांगायला आवडतील का?

(नम्र पणे.) तसं इतकं काही केलेलं नाही, पण खरंच आवडेल. फक्त वेळ मिळत नाही. जेव्हा मिळतो तेव्हा त्या दृष्टीने थोडं थोडं टीपण करतो सुद्धा. बघूया कधी जमतंय ते.
पुढील वर्षी येणाऱ्या बापूंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा!

http://linkmarathi.com/सप्तशृंगी-गड-वणी/

धन्यवाद साहेब. आपल्याला सुद्धा ह्या पुस्तका साठी व पुढील उज्वल कारकिर्दी साठी आमच्या सर्व वाचकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!

जय हिंद…..!

साभार ,
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईस युनियन ,
“कामगार” दिवाळी विशेषांक ,२०२०

ही मुलाखत या दिवाळीच्या दरम्यान व्हायरल होत आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular