Homeसंपादकीयकायद्याच्या बुडाला आग लावणारे एके दिवशी अराजकाच्या वणव्यात जळून खाक होतील!

कायद्याच्या बुडाला आग लावणारे एके दिवशी अराजकाच्या वणव्यात जळून खाक होतील!

(१) कायदा म्हणजे काय व कायद्याचा न्याय म्हणजे काय? कायद्याच्या बुडाशी जाऊन अभ्यास करा म्हणजे कायदा व न्याय कळेल. निसर्गाने त्याच्या कायद्याची एक चौकट तयार केलीय. निसर्ग कायद्याच्या त्या मूळ चौकटीला म्हणजे मूलभूत सांगाड्याला (बेसिक स्ट्रक्चर) धक्का न पोहोचवता अर्थात पर्यावरणाची हानी न करता मानवाचे विशेष कल्याण व मानवाची विशेष सुरक्षितता यांची हमी देणारा विशेष समाज कायदा निर्माण करण्याचे नैसर्गिक स्वातंत्र्य निसर्गाने माणसाला दिले आहे. या स्वातंत्र्याचा उपयोग नीट करायला हवा ही अक्कल मानवी बुद्धीला निसर्गाने दिली व तिचाच चांगला परिणाम म्हणजे मानव निर्मित समाज कायदा.

(२) हा कायदा संपूर्ण जगासाठी तसा एकच हवा कारण त्यात संपूर्ण मानव समाजाचे हित आहे. पण खुळचट माणसांनी या चांगल्या निर्मितीचेही तुकडे करून हा ब्रिटिशांचा कायदा , हा अमेरिकेचा कायदा, हा भारताचा कायदा , अशी नावे दिली. इंडियन पिनल कोड हा फार जुना कायदा कोणी केला तर ब्रिटिशांनी. पण तो ब्रिटिशांनी केला म्हणून वाईट का तर त्या ब्रिटिशांनी भारताला अनेक वर्षे गुलाम करून ठेवले होते. भारत त्यांचा गुलाम झाला यात त्यांची चूक होती की भारताची म्हणजे भारतात राहणाऱ्या तत्कालीन लोकांची चूक होती?परकीय लोकांना विश्वासाने जवळ करायचे, त्यांचा मूळ हेतू समजून घ्यायचा नाही व मग हे लोक आपल्या डोक्यावर बसले की त्यांच्या नावाने खडे फोडत रहायचे याला अक्कल कसे म्हणावे? का चालू आहे तो इंडियन पिनल कोड कायदा अजूनही भारतात हे जर नीट समजून घ्यायचे असेल तर तो कायदा जरा नीट वाचा म्हणजे त्या ब्रिटिश कायद्याचे महत्व कळेल. आपली भारताची संसदीय लोकशाही पद्धत तरी कोणाची, ब्रिटिशांचीच ना! पण लोकांशी या मुद्यावर वाद घालण्यात अर्थ नाही. प्रश्न कायद्याचा आहे व तो सर्व जगासाठी एक हवा हे माझे म्हणणे कारण मानवी न्याय हा इंग्लंड, अमेरिकेत वेगळा व भारतात वेगळा असे नसते. आणि हाच तो कायद्याचा मुख्य मुद्दा आहे.

(३) या कायद्याचा हल्ली लोकांनी विचका करून ठेवलाय. त्याची चेष्टा चालवलीय. हे कसे कोणाच्याच लक्षात येत नाही की, बारावी नंतर पाच वर्षे किंवा पदवीधर झाल्यावर तीन वर्षे कायद्याचा सखोल अभ्यास करून त्याची प्रॕक्टिस करायला पात्र झालेले वकील घरी बसलेत आणि सरकार दरबारी एजंट लोकांचा सुळसुळाट झालाय. कायद्याचे नुसते ज्ञानच नव्हे तर कायद्याशी प्रामाणिक असलेले वकील घरी व हे एजंटस बाहेर हा काय प्रकार आहे? दस्तऐवज नोंदणी कार्यालये बघा. तिथे वकील कमी व एजंटस जास्त का दिसतात ? कायद्याची देवाणघेवाण करायची आहे ना मग नोंदणी निबंधकांनी खरेदी विक्रीचे दस्तऐवज नोंदणी करून घेताना कायदेविषयक शंका आली तर ज्या वकिलाने हा दस्तऐवज बनवला त्या वकिलाला घेऊन या असे ते का बरे म्हणत नाहीत? वकिलांनी सुद्धा मालमत्तेचे मालकी प्रमाणपत्र देताना तथाकथित शोध कारकूनांवर का विसंबून रहावे? काय पात्रता असते त्यांची? साधा लिस पेंन्डेन्स या शब्दाचा अर्थ तरी कळतो का त्यांना?

(४) खरे बोलले की लोकांना राग येतो? पण का येतो? कारण त्यांचे हितसंबंध अशा कटू सत्यात गुंतलेले असतात. वकिली क्षेत्राचे महत्व वकिलांना तरी नीट कळलेय काय? कायद्याची पात्रता जवळ असणे सोडा त्याचे साधे ज्ञान नसलेले एजंटस लोक वकिलांऐवजी सरकार दरबारी काय करतात याची सखोल न्यायालयीन चौकशी होऊन जाऊ द्या! त्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. मी कायदा, न्याय, वकिली या क्षेत्रात जागल्या बनून रहायचे पवित्र कार्य काय आताच करीत नाही. जेंव्हापासून वकिली सुरू केली तेंव्हापासून हे कार्य सुरू आहे. पण या जागलेपणाचा काहीच उपयोग होत नाही हे जेंव्हा माझ्या लक्षात आले तेंव्हा मी जास्त झोपा काढू लागलो. सुरूवातीच्या काळात मी वकिलांच्या बार कौन्सिलला सरळ पत्रच लिहिले होते की ज्याप्रमाणे प्रत्येक उद्योग धंद्यातील हिशोबाचे लेखा परीक्षण सी.ए. कडून करून घ्यावे लागते त्याप्रमाणे प्रत्येक उद्योग धंदा हा कायद्यानुसारच चाललाय का याचे कायदा परीक्षण (लिगल अॉडिट) वकिलाकडून करून घेतले पाहिजे. पण त्या पत्रावर बार कौन्सिलने काहीच हालचाल केली नाही.

(५) नंतर मी असेही लिहिले होते की, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी रात्रंदिवस वकील हवेत म्हणजे हवेतच! इतकेच नव्हे तर न्यायाधीशांची संख्या वाढवून न्यायालये सुद्धा रात्रंदिवस चालू राहिली पाहिजेत. कायद्याशिवाय पान सुद्धा हलता कामा नये. किती लोकांना माझी ही तळमळ कळली? उलट लोकांनी मलाच मूर्खात काढले असे म्हणून की मला वकिली कळत नाही. धन्य बाबांनो! लावा कायद्याची वाट आणि व्हा मोकाट! पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जे लोक कायद्याच्या बुडालाच आग लावत आहेत ते एके दिवशी अराजकाच्या वणव्यात जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाहीत!

  • ॲड.बी.एस.मोरे©

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular