HomeUncategorizedकोरोना, ओमीक्रॉन आणि कृष्ण

कोरोना, ओमीक्रॉन आणि कृष्ण

कृष्णाचं जीवन हा एक संदेश आहे. आपल्यासमोर अनेक वायरस येत आहेत, निरनिराळी संकटं कायम येत असतात. अशावेळी कृष्ण धीर देऊ शकतो. कसं ते सांगत आहेत निरेन आपटे.

एक पेशंट डॉक्टरकडे गेला आणि म्हणाला,
” डॉक्टरसाहेब मला खूप सर्दी आहे. औषध द्या. “
डॉक्टर म्हणाला, ” एक काम करा. बाहेर धो धो पाऊस पडत आहे. त्यात जाऊन उभे राहा. “
पेशंटने विचारले, ” त्यामुळे माझी सर्दी जाईल?”
डॉक्टरने उत्तर दिले, ” नाही, त्यामुळे तुम्हाला न्यूमोनिया होईल. मग माझ्याकडे या. कारण माझ्याकडे न्यूमोनियावर औषध आहे, सर्दीवर नाही.”

वरवर पाहता हा विनोद आहे, पण आता हीच वस्तुस्थिती होऊ लागली आहे. नवनवीन आजार निर्माण होत आहेत आणि त्यावर नेमकी लस नसल्याने लक्षणांवर उपचार करावे लागतात.

गेल्या काही वर्षात नवीन आजारांनी थैमान घातले.

http://linkmarathi.com/मानसिक-आरोग्य-म्हणजे-काय/

इबोला, निपा, झिका, डेंगू, चिकनगुनिया, एड्स, कोरोन आणि आता नवीन व्हेरिएन्ट. आजार पसरवणारे इतरही विषाणू होते आणि ह्यापुढेही येत राहतील. आजारांचे इतके प्रचंड आक्रमण पाहून सामान्य माणूस घाबरून गेला तर नवल नाही.

ह्याच संदर्भात श्रीकृष्णाची कथा काय सांगते?

श्रीकृष्णालाही सतत मरणाच्या सावटाखाली जगावे लागले.

श्रीकृष्ण जन्माला येण्याआधी त्याला मारायची तयारी झाली होती. त्याचा जन्म झाला तो कारागृहात…. जेलमध्ये!

आपणही अज्ञानाच्या कारागृहात जन्माला येतो आणि तिथून निघायचे असते ज्ञानाकडे. कृष्ण जन्माला येताच त्याचा मामा कंस त्याला ठार करणार होता. कोणताही जीव आईच्या गर्भात असतो तिथेच त्याचा बळी घेण्याची अनेक कारणेही तयार झालेली असतात. बाळाच्या नाळेतील गुंतागुंत हे बाळ गर्भाशयात दगावण्याचे सर्वात मोठे कारण आहे. मृत्यू ३६ आठवडे बळावर टपून बसलेला असतो. कृष्णावरही मामा टपून बसला होता. कृष्णाने फक्त जन्म घ्यायचा होता की त्याचं डोकं दगडी भिंतींवर आपटलं जाणार होतं. पण त्यातून कृष्ण वाचला.
आपणही असेच वाचलो आहोत.

पण ही कायमची सुटका नाही. कृष्ण तरी कुठे कायमचा सुटला होता. कारागृहातून सुटत नाही तर यमुना नदी आडवी आली. नदीला पूर आला होता. तिथेही तो वाचला.

पूर, दुष्काळ, भूकंप, अपघात अशी अनेक कारणे आपल्यालाही आवाहन देतात.

कृष्ण मोठा होत गेला आणि मृत्यूच्या घिरट्या वाढत गेल्या. पुतना मावशी मृत्यू बनून आली. ती त्याला विष पाजायचा प्रयत्न करत होती. अशी विषबाधा, दूषित अन्नाची बाधा त्यातून होणारे आजार आपल्यालाही आवाहन देत असतात.

कृष्णाला कालिया मर्दनाशी लढावे लागले.

आपणही पोलियो, कावीळ, मलेरियाशी लढतो. तृणावर्त, महाभयंकर अघासुर हे कृष्णासमोर उभे ठाकले तसे कॅन्सर, हृदयाचे विकार, ट्युमर आपल्यासमोर उभे राहतात. त्यांच्याशी दोन हात करायला युक्त्या कराव्या लागतात. कृष्णाने नेहमीच शक्तीपेक्षा युक्ती वापरली आणि तो वाचत राहिला. काहीवेळा तर मैदान सोडून पळूनही गेला. पळून जाण्याचा विक्रम कृष्णाने केला. म्हणून त्याला रणछोडदास असेही म्हणतात. काहीही करून स्वतःचा जीव वाचवायचा हे त्याने ठरवूनच ठेवले होते.

आपल्यालाही स्वतःचा जीव वाचवायचा आहे. काही आजार असे आहेत की लढायला जायचे नाही, लपून बसायचे आहे.

अर्थात, शेवटी कृष्णाचाही अंत झाला. हा महायोद्धा होता, पण मृत्यू फारच क्षुल्लक कारणाने झाला. कृष्ण एका झाडाखाली बासरी वाजवत बसला होता. एका शिकाऱ्याने सावज समजून बाण सोडला आणि तो कृष्णाला लागला. कृष्णाचा अंत झाला.

कृष्णाचे जीवन एक संदेश आहे आणि मृत्यूही संदेश आहे. कोणी कितीही कर्तबगार असला, खूप शिक्षण घेतलं असलं, भरपूर संपत्ती निर्माण केली असली, मोठी पदे मिरवली असली तरी एक अत्यंत छोट्या कारणाने त्याचा मृत्यू होतो.

मरण अटळ आहे खरे, तरीही जीवन सुंदर आहे.
मंगेश पाडगावकरांनी लिहिले आहे,
“या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी.
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे.
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.”

आपण जन्माला आलो, जिने आपल्याला पोसले ती माती हजारदा चुंबुन घ्यावी अशी आहे. इथल्या जगण्यासाठी अनंत मारणे झेलून घ्यावी असे जीवन आहे, कृष्णानेही अनंत मरणे झेलून घेतली. नदीच्या पुराने त्याचा बळी जाणारच होता. पण पिंपळपणाने त्याला तारले.
कोरोनाच्या संकटात आपणही तरून जाऊ.
जे जगू, ते कृष्णाला अर्पण करू!!

कृष्णाची ही जीवन कथा संकटात सापडलेल्या अनेकांना धीर देईल. म्हणून हा लेख .

लेखक: निरेन आपटे

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

महाराष्ट्रात लोकप्रिय होत असल्येल्या Link मराठी पोर्टल मध्ये स्वतःच्या नाव सह आपले लेख- कविता प्रकाशित करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी फॉर्म भरावा आणि आपल्या लेखन कॉपी-पेस्ट होण्याच्या चिंता दूर करावी. आमची टीम लवकरच संपर्क साधेल.

www.linkmarathi.com

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular