माझ्या माहेरच्या घराला दोन गॅलऱ्या होत्या. त्यातल्या मागच्या गॅलरीत उभे राहिले की समोर शेजारच्या बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये लावलेली गुलमोहराची तीन झाडे दिसायची.
कधीही कंटाळा आला किंवा थोडेसे डिप्रेस्ड वाटत असले की मी त्या गॅलरीत गुलमोहोराकडे पहात उभी रहायचे.
भरपूर हिरवीगार, सळसळणारी पाने.. अनेक पक्षांचा मुक्त वावर, त्यांचा किलबिलाट.. अन्न शोधायची किंवा इतर कसलीतरी अनाकलनीय लगबग.. हे पहात असताना मन आपोआप शांत होत असे.
जानेवारी, फेब्रुवारीत त्याची पानगळ सुरू व्हायची. त्या महिन्यात शाळेत उत्साहाचे वातावरण असायचे. गॅदरींग, बक्षीस समारंभ, सव्वीस जानेवारीची परेड यामुळे या दिवसात गुलमोहोराकडे फारसे लक्ष जायचे नाही. पुन्हा मार्च महिना आला की त्याला नवीन पोपटी पालवी फुटायची आणि एखाद महिन्यात ते झाड फुलांनी डवरून जायचे. उन्हाळ्यात कुठे बाहेर जाऊन आले की या झाडापाशी जायचे डोळे अगदी निवून जातात.
बाहेर कितीही वाईट परिस्थिती असली तरी आपण मात्र नेहमीच सकारात्मक कसे रहायचे.. इतकेच नाही तय इतरांना आनंद कसा द्यायचा हे या गुलमोहोराकडून शिकावे.
गुलमोहोराचे फूलही थोडे वेगळे. चार पाकळ्या एकाच रंगाच्या पण एकच पाकळी वेगळ्या रंगाची आणि आकाराचीही.सगळी माणसे सारखी नसतात. आपण मात्र प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वेगळेपणासहीत आपल्यात सामावून घेतले पाहिजे. तो वेगळेपणा आपोआप खुलून दिसतो. ही शिकवण ते फूल आपल्याला देते.
गुलमोहोर स्वतःच्या अस्तित्वाचाच उत्सव करत असतो. एखाद्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली गुलमोहराची झाडे उन्हाळ्यात आपल्याला सावली तर देतातच पण त्याच बरोबरीने त्यांची फुले आपल्यासमोर लालपिवळ्या रंगाच्या पायघड्याही घालतात आणि आपल्याला आपल्या स्वप्नातल्या देशाचे अनभिषिक्त सम्राट बनवतात.
ते झाड परदेशी की स्वदेशी? उपयुक्त की उपद्रवी ? या प्रश्नांचा उहापोह करण्यात मला काडीचाही इंट्रेस्ट नाही
ते झाड मला खूप आनंद देते आणि बरेच काही शिकवते एवढे मात्र नक्कीच.
परदेशात काही ठिकाणी गुलमोहोर महोत्सव आयोजित करतात. आपल्या साताऱ्यातही एक मे या दिवशी मोठ्या प्रमाणात गुलमोहोर महोत्सव साजरा होतो.
ज्या कोणाला गुलमोहोर महोत्सव करावा असे वाटले असेल त्याच्या कल्पकतेला आणि रसिकतेला शतशः सलाम
- डॉ. समिधा गांधी
मुख्यसंपादक