चंद्रावर जाण्याची स्वप्नं बघणाऱ्या माणसाला अजून पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर जायलाही बरीच मेहनत घ्यावी लागते. आजही पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर जाण्याची कल्पना एकमद धाडसी वाटते. विमानाने या ठिकाणावरून प्रवास करणे तर आव्हानात्मक मानले जाते. यामार्गे प्रवास करायचा असल्यास विमान कंपन्या देखील कुशल वैमानिकांनाच पाठवतात. भारताच्या एअर इंडियाने नुकतंच आपल्या क्रूवरील महिला कप्तानांना याठिकाणी पाठवले होते. सॅन फ्रान्सिस्को वरून बंगळूरूकडे येणारे हे विमान उत्तर ध्रुवावरून आले.
एअर इंडियाच्या महिला कप्तानांनी खरा तर हा एक नवा इतिहास रचला आहे. जगातला सर्वात मोठा हवाई मार्ग म्हणून हा मार्ग ओळखला जातो. विशेष गोष्ट म्हणजे या प्रवासात विमान चालवणाऱ्या सगळ्या वैमानिक महिला होता. ९ जानेवारी रोजी सॅन फ्रान्सिस्को वरून निघालेले हे विमान ११ जानेवारी रोजी सुखरूपपणे बेंगळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. उत्तर ध्रुवावरून आलेल्या विमानाने एकूण सोळा हजार किलोमीटरचे अंतर पार केले आहे.
एअर इंडियासाठी हा दिवस अत्यंत अभिमानाचा दिवस आणि ऐतिहासिक दिवस असल्याचे कॅप्टन झोया अग्रवाल म्हणाल्या. या विमानातील सर्व वैमानिकांच्या गटाचे नेतृत्व त्यांच्याकडे देण्यात आले होते. झोया अग्रवाल या सगळ्यात कमी वयाच्या वैमानिक आहेत आणि या ऐतिहासिक प्रवासाचे नेतृत्व करून त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. झोया यांनी त्यांच्या टीमचे अभिनंदन तर केलेच पण या टीमचा सदस्य होण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या.
“अनेकांनी तर उत्तर ध्रुव फक्त नकाशातच पहिला असेल. पण, मला तो जवळून पाहता आला याचा खूप आनंद वाटतो आहे. बोईंग 777 एसएफओ-बीएलआर विमानाचे नेतृत्व करण्याचा अनुभव तर भन्नाट होता. जिथे कंपास देखील १८० अंशात वळतो, त्या उंचीवरून उड्डाण करण्याचा हा अनुभव थरारकच होता,” असे झोया सांगतात. कमी वयात बोईंग विमान चालक असण्यासोबतच एअर इंडियाची पहिली विमान कमांडर जिने उत्तर ध्रुवावरून प्रवास केला हा इतिहासही तिच्याच नावावर नोंदवला जाईल.
शिवानी महांस या देखील या प्रवासात सहभागी वैमानिक होत्या. त्या म्हणाल्या, “हा संपूर्ण प्रवासच आम्हाला खूप रोचक वाटला. आम्ही अगदी उत्साहानं भारावून गेलो होतो. असा प्रवास करणाऱ्या पहिल्याच महिला टीमचा भाग होण्याची संधी मिळाली म्हणूनही या संपूर्ण प्रवासाची उत्सुकता होतीच. आम्ही यशस्वीपणे हा प्रवास पार पडला याबद्दल आनंद वाटत आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी आम्हाला १७ तास लागले.” या प्रवासात थानामाई पापागरी, आकांक्षा सोनावणे आणि शिवानी महंस या सहभागी वैमानिक होत्या. व्यावसायिक वैमानिकांसाठी असा प्रवास करण्याची संधी मिळणं हे एखाद्या स्वप्नासारखंच असतं.
हवाई उड्डाण तज्ञांच्या मते उत्तर ध्रुवावरून विमान उड्डाण करणे हे तांत्रिकदृष्ट्याही आव्हानात्मक असते. याला उत्तर धृवावरील भोगोलिक वातावारणही कारणीभूत आहे. म्हणूनच या मार्गावरून जर विमानाला प्रवास करायचा असेल तर कोणतीही हवाई कंपनी फक्त कसलेल्या वैमानिकांचीच या प्रवासासाठी निवड करते. एका उत्तम वैमानिकाला देखील या मार्गावरून विमान उड्डाण करणे आव्हानात्मकचे वाटते. यासाठी विमान चालवण्याचे उत्तम कौशल्य आणि अनुभव असणे आवश्यक आहे. पण, आपल्या महिलांनी हे आव्हानही पेलून दाखवले. अवघडातील अवघड कामगिरीही त्यांनी यशस्वी करून दाखवली. आपल्या महिला शक्तीसाठी देखील ही अभिमानाची बाब आहे.
अमेरिका ते दक्षिण भारत यांच्या दरम्यानचा हा पहिलाच न थांबता सलग केलेला प्रवास आहे. भारतीय हवाई क्षेत्रात या प्रवासाला म्हणूनच खूप महत्त्व आहे. या आधी भारताच्याच एअर इंडियाच्या टीमने उत्तर ध्रुवावरून प्रवास करण्याचा इतिहास रचला होता. आता हा दुसरा प्रवास फक्त महिला कप्तानांचा होता हेच याचे वैशिष्ट्य.
मुख्यसंपादक