या मुलांच्या उंचीवर जाऊ नका बरं का ? ऊस जरी त्यांच्या उंचीच्या तिप्पट असला तरी तरी त्याची जिद्द आभाळ इतकी उंच आहे. मी कॉलेजमध्ये असताना हाइट कम फाईट ज्यादा असा डायलॉग मारायचो त्याचा प्रत्यय आज प्रत्यक्ष आला.
कु. अंकुश सुभाष उगडे (यवतमाळ ) हे १५ ते १६ वर्षाचं पोर खेळण्याशी खेळायच्या वयात सफायतदार पणे ऊसावर कोयता चालवतो . पण काम करताना कामाला काम न समजता स्वतःशीच गुणगुणत आनंदाने काम करतो . वडिलांचे छत्र लहानपणी गेले तरी त्याला देवाशी कसलाच राग चेहऱ्यावर दिसत नाही. सर्वांशी प्रेमाने बोलत आणि वागत आपल्या टोळीतील आणि माझ्यासारख्याही कधीतरी शेतात जाऊन सेल्फी काढणाऱ्या शेतकऱ्याना तो कधी लळा लावतो कळतच नाही. टोळीतील लोकही त्याला सहकार्याची भावना दाखवत पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करतात.
माझ्या मनात त्याला जुने कपडे द्यावे असे आले आणि ती इच्छा मी माझ्या आईजवळ बोलून दाखवली ; तर आई म्हणाली मी मगाशीच त्याला त्याबद्दल विचारलं होते पण त्यांने काही महिन्यांपूर्वी माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नात खूप कपडे खरेदी केलेत तेव्हा मला आता नकोत असे नम्रपणे बोलून दाखवले आणि तात्काळ आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाला. त्यांच्या या बोलण्यामुळे मी निःशब्द झालो . इतक्या कमी वयात त्याने घेतलेल्या अनुभवामुळे आणि त्यांच्या आईने केलेल्या संस्कारातून हे शक्य झाले असावे असे वाटते.
त्याच्यासाठी मी काय करू शकतो असे मनात विचार येत होतेच पण मदत तर तो घेणार नाही आणि ती देऊन मी त्याला वैचारिक दृष्टीने पांगळा करणार नाही या हेतूने प्रोत्साहन देण्यासाठी हे लिहीत आहे. अश्या अंकुश ना लिंकमराठी कडून मानाचा मुजरा. तुझ्या आयुष्यात मेहनतीने तू तुला हवे ते मिळवशीलच पण देवाने ही तुला साथ द्यावी ही सदिच्छा....
- अमित अशोक गुरव (आजरा )
मुख्यसंपादक