आम्हाला खात्री होती की, या इंजेक्शनमुळे आपला भाई लवकर बरा होईल. त्याच्या मुलीला मी सांगितले की, “तू घाबरु आणि टेन्शन सुद्धा घेऊ नको. तू आता जी धावपळ करत आहेस त्यावरून भाईची मुलगी बनून नाही तर मुलगा बनून काम करत आहेस. भाई लवकर बरा होणार आहे.” आमचा मित्र शितलनाथ याने तिला सांगितले की, कधीही इंजेक्शन हवे असेल तर फोन कर, आम्ही आणून देईन. आज इंजेक्शन मिळाले म्हणून आम्हा दोघांना एक वेगळेच समाधान मिळत होते.
दुसऱ्या दिवशी परत भाईच्या मुलीचा फोन आला आणि भाईला ताबडतोब दुसरे इंजेक्शन हवे होते. परत आम्ही दोघे जाऊन इंजेक्शन आणून दिले. भाईला जेवण जात नव्हते कारण त्याचा घसा खूप दुखत होता. छातीत दुखत होते. त्याला दुपारी फोन करून मी सांगितलो की, “भाई तुला काही झाले नाही, कफमुळे तुला थोडा त्रास होत आहे. तू खात जा भरपूर.” त्याला बोलता पण येत नव्हते त्याने फक्त हां म्हटला. अशा वेळी मानसिक आधार देण्याची खूप गरज असते. संध्याकाळी शितलनाथने भाईला फोन केला आणि तो अगदी खणखणीत बोलू लागला. आम्हाला तो बोलत आहे हे ऐकुन खूप आनंद झाला. भाईच्या मुलीने आम्हाला सांगितले की, तुम्ही वरचेवर फोन करत जा त्यांना, ते लवकर बरे होतील.
थोड्या दिवसांनी परत भाईची प्रकृती बिघडली. भाईच्या मुलीने आम्हाला फोन करून सांगितले की, तुम्ही डॉक्टरांसोबत ऐकदा भेटून बोलाल का? आम्ही दोघांनी क्षणाचा विलंब न करता ताबडतोब त्या दवाखान्यात गेलो. भाईच्या मुलीला येण्यास थोडा वेळ लागणार होता कारण तिला भाईला जेवणाचा डब्बा घेऊन यायचा होता.
तोपर्यंत मी आणि शितलनाथ इतर विषयांवर गप्पा मारत होतो. तेथील कोवीड सेंटरची बिल्डिंग खूप मोठी होती. गेटवर २ कर्मचारी डोळ्यात तेल घालून पहारा ठेवत होते. फक्त एकाच व्यक्तीला आतमध्ये जर अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच पाठवत होते. आम्ही बाहेर गप्पा मारत होतो आणि अचानक पुढे एक अंदाजे ३५ वयाची स्त्री फोन वर बोलत होती, ती अगदी घाबरून हातानेच हातवारे करत, गेली असे तिच्या समवेत असणाऱ्या दोन व्यक्तींना सांगितले. आणि जोरात म्हटली की, आई गेली. लगेच त्याच्या समवेत आलेले दोन व्यक्ती तिच्याकडे गेले. तिला काहीच समजत नव्हते, इतकी ती घाबरली होती. आणि तिने आई..म्हणत ती तिच्या पप्पांना बिलगली. ते सर्व पाहताना माझे मन गहिवरून आले. मी त्यांना थोडेसे पुढे जाऊन त्या स्त्रीला खाली बसवून थोडे पाणी प्यायला द्या असे सांगायला जाणार होतो तितक्यात, ती धक्क्याने खाली पडली. तिचा बाप धैर्याने हे दुःखद क्षण हाताळत होता. पण थोड्याच क्षणात ते आ वासून रडू लागले. त्या दोघांना त्यांचा नातलग जवळ करून त्यांना धीर देत होता. थोड्याच वेळात त्यांची दोन मुले तेथे आले आणि ते हंबरडा फोडून रडत होते. ती मेलेली व्यक्ती ना माझ्या परिचयाची होती ना ते नातलग. पण हे सर्व दुःखद क्षण तसेच त्या चौघांना रडताना पाहून मला सुद्धा रडू आले. एकाची आतापर्यंत साथ दिलेली पत्नी तर तिघांची आई कायमची सोडून त्या वॉर्डातील बेडवर निपचित पडून सर्वांना कायमचा निरोप दिला होता.
तितक्यात भाईची मुलगी आली आणि तिने सांगितले की, एकट्यालाच सोडतात आतमध्ये. मी क्षणाचा विलंब न करता म्हटलो की, मी जातो आणि डॉक्टरांच्यासंगे बोलतो. तिच्या हातामधील डब्बा घेऊन मी दोन मास्क आण फेस शिल्ड घालून आतमध्ये गेलो. आतमध्ये रुग्ण ऑक्सिजनवर होते तर काहीजण व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत होते. चौथ्या मजल्यावर अत्यंत गंभीर पेशंट होते. तेथे डब्बा ठेवून कागदावर भाईचे नाव लिहून त्यांच्या कडे दिले. तेथील सेक्युरिटीला सांगितले की, मला डॉक्टरांना भेटायचे आहे. ते म्हटले की, ५ मिनिट भेटू शकता. मी त्या केबिन जवळ गेलो आणि पुढे अंदाजे २० पेशंट ऑक्सिजन वर होते. त्यातील काहीजण झोपून होते. तर काहीजण व्हेंटिलेटरवर पूर्ण ताकदीने श्वास घेत होते. मी हे सर्व बाहेर थांबून बघत होतो. पुढेच एक पेशंट अंदाजे ४० वयाचा असेल त्याला एक महिला डॉक्टर ऑक्सिजन काढून त्याला ग्लासने पाणी पाजवत होत्या. मला तेथे सर्व डोळ्यादेखत पाहून समजले की, येथे पूर्णपणे पेशंटची काळजी घेतात.
क्रमशः
- लेखन – श्री. सनी चंद्रकांत कुंभार.
मुख्यसंपादक