प्रत्येकाला स्वतःच्या धर्माचा अभिमान असावा. प्रत्येकाने आपल्या धर्माप्रमाणे वागून समाजहित जोपासावे . परंतु आपलाच श्रेष्ठ आणि दुसऱ्यांचा कनिष्ठ ही प्रवृत्ती घातक असते. सर्वधर्म मानवतेची शिकवण देतात. धर्म हा आपल्या आस्थेचा श्रद्धेचा भाग आहे. परंतु आज समाजात श्रेष्ठ-कनिष्ठ वाद पेटत आहे. यामुळे समाजाची शांतता भंग होते. काही माथेफिरूमुळे दंगली भडकतात. याची झळ सर्वांनाच सोसावी लागते. श्रीराम व हनुमान जयंती मिरवणुकीवर दगडफेक होणे . ही गोष्ट निषेधार्थ आहे. तसे भोंग्यावरून पेटणारा वाद घातकच आहे. देश हा कायद्यानुसार चालला तरच समाजात सुव्यवस्था राहते. आज राष्ट्रभक्ती , सामाजिक प्रश्न, सुधारणा हे विषय बाजूला पडले आहेत. धार्मिक प्रश्नाने रणकंदन माजले आहे. हे प्रश्न कायद्याने मिटवावेत. ज्यावेळेस या प्रश्नांवरून राजकारण सुरू होते. तेव्हा पुढारी आपली पोळी भाजण्यासाठी धर्माचा आधार घेतात. केवळ सत्तेसाठी राजकारण सुरू होते. मूलभूत प्रश्न बाजूला पडतात. आज सुज्ञ जनतेने धार्मिक उत्सव अवश्य साजरे करावेत. परंतु एक दुसऱ्याला याचा त्रास नको. राष्ट्रहित प्रथम व नंतर धर्म असावा. आपले संत महापुरुष यांना जातिभेद धर्मभेद मान्य नव्हता. त्यांनी मानवतेची शिकवण दिली आहे.
संत परंपरेतील थोर संत शेख महंमद महाराज यांनी चारशे वर्षांपूर्वी हिंदू-मुस्लीम यातील द्वैत नाहीसे करण्यासाठी महान कार्य केले. मालोजीराजे भोसले यांनी शेख महंमद महाराजांना गुरु मानले होते. संत तुकाराम, संत रामदास, संत जयराम स्वामी , प्रल्हाद महाराज, राऊळ महाराज अशा तत्कालीन संत मंडळीत शेख महंमद महाराजांना मानाचे स्थान होते. त्यांच्या दिव्यज्ञानापुढे झुकून औरंगजेब बादशहाने वाहिरा गावी त्यांना इनामी जमीन दिली आहे. संत शेख महंमद महाराज आपल्या योगसंग्राम ग्रंथात हिंदू-मुस्लीम धर्मातील गुण दोष सांगतात. आज याच विचारांची गरज आहे. अध्याय क्रमांक 11 मधील ओव्या ..
आता अल्ला म्हणा वो तुम्ही वाचे / हरी म्हणता तुमचे काय वेचे / हरी अल्ला न म्हणतील ते काचे/ अघोरी जाणावे //94// ऐका हरी अल्ला जरी दोन असते / तरी ते भांडभांडोच मरते / ओळखा काही ठाव उरो न देते / येरून येराचा पैं //95//
या ओवीतून ते म्हणतात , आता तुम्ही वाचेने अल्लाच म्हणावे. मग हरी म्हणताना तुमचे काय जाईल ? जे हरी आणि अल्ला म्हणणार नाहीत ते मूर्ख अघोरी आहेत असे जाणा. ऐका, हरी आणि अल्ला जर दोन असते तर ते भांडून भांडूनच मेले असते. त्यांनी एकमेकांचा ठावच नाहीसा केला असता. आजच्या घडीला सुज्ञ विचारवंतांनी , सर्व समाजाने संत साहित्य अभ्यासावे. वारकरी संप्रदायाची विचारधारा जोपासावी. धर्मा धर्मातील द्वेष अहंकार गळून जाईल. संत विचार हे मुलांना शालेय वयापासून अभ्यासात हवे. जेणेकरून ते विचार त्यांच्यामध्ये रुजतील. मुलं लहानपणापासून नैतिक मूल्य शिकतील. मोठे होऊन ते आचरणात आणतील. भेदाभेद अमंगळ आहे हे प्रत्येकाला कळेल. तशी प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव होईल. सर्व माणसं ईश्वराची लेकर आहेत . हे सर्वांना कळेल. मानवता वाढीस लागेल. मग ना भोंग्याचा आवाज वाढेल. ना मिरवणुकीवर दगडफेक होईल. भोंगे , डिजे , मिरवणुका जरूर असाव्यात . उत्सव आनंदात साजरे व्हावे . परंतु याचा त्रास इतरांना होऊ नये. याची काळजी प्रत्येकानी घ्यावीच लागेल ..
या देशाची एकता, अखंडता ही आपली ताकद आहे. ही एकता अखंडता टिकून रहावी. आपल्या देशाचा तिरंगा जगात डौलाने फडकवत रहावा. यासाठी जाती-धर्मात बंधुत्वाचे नाते जपले जावे. प्रत्येकाच्या ओठी ‘ सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा .. मेरा भारत महान .. भारत माता की जय हेच नारे प्रथम हवे .. ज्या देशातील लोक राष्ट्राभिमानी असतात . तेथे असे जातीय धार्मिक प्रश्न उद्भवत नाहीत. यासाठी संत महापुरुष यांच्या विचारांचा आदर्श हवा. प्रत्येकाच्या मनोमनी, हृदयात, नसानसात, रक्तारक्तात राष्ट्राविषयी अभिमान हवा. तेव्हाच ही धार्मिक तेढ नाहीशी होईल. सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतील. ‘भारत माता की जय’ चा नारा सातासमुद्रापार जाईल.
जय हिंद जय भारत
*लेखक - श्री किसन आटोळे सर*
मलठण ता.कर्जत जि.अहमदनगर
मुख्यसंपादक
[…] धार्मिक तेढ समाजासाठी घातक … […]