Homeमुक्त- व्यासपीठपंढरीची वारी आणि वारकरी संप्रदाय

पंढरीची वारी आणि वारकरी संप्रदाय

‘वारी’ हा शब्द कानी पडताच आठवण येते ती पंढरपूरला होणाऱ्या आषाढीवारीच्या सोहळ्याची. महाराष्ट्रातून आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर, सासवड, एदलाबाद, पैठण, शेगाव इ. प्रसिद्ध संतांच्या गावांहून त्यांच्या पालख्या आषाढी एकादशीस पंढरपूरला जाण्यास हजारो भक्तांसह प्रस्थान ठेवतात. सर्वजण श्रीविठ्ठलाचे दर्शनासाठी भूवैकुंठ पंढरपूरला निघतात ते हरिनाम घोष करत. ऊन, वारा, वादळ, पाऊस कशाचीही पर्वा न करता. तसेच कार्तिकी एकादशीसही आळंदी व पंढरपूर येथे मोठय़ा प्रमाणावर भक्तांची रीघ लागते. दिंडय़ा, पताका, टाळ नि मृदुंग यांनी हा सोहळा लक्षवेधी, भक्तीरसानंदाचा होतो.

विशिष्ट दैवताचे भक्तगण जेव्हा एकत्र येऊन प्रस्थान ठेवतात त्यास दिंडी म्हणतात. या दिंडय़ा अनेक ठिकाणांहून निघतात व त्या आराध्यदैवताच्या परमभक्ताच्या ठिकाणी- गावी एकत्र येऊन त्या परमभक्ताच्या पालखीबरोबर आराध्य दैवताच्या ठिकाणी जातात. या भारतवर्षांत अशा पद्धतीने अनेक देवदेवतांच्या वाऱ्या करणारे आहेत.

जे आषाढी व कार्तिक शुद्ध एकादशीस पंढरपूर व वद्य एकादशीस आळंदीस नियमितपणे जातात त्यांना ‘वारकरी’ म्हणतात. पुष्कळ वारकरी प्रत्येक महिन्याचे शुद्ध ११ ला पंढरपूर व वद्य ११ ला आळंदीस जातात. त्यामुळे या संप्रदायास ‘वारकरी संप्रदाय’ संबोधिले जाते. हे वारकरी गळ्यात नेहमी तुळशीची माळ घालतात. त्यामुळे त्या संप्रदायास ‘माळकरी संप्रदाय’ असेही म्हणतात. भगवंतास सर्वस्व अर्पण करणारा तो भक्त अशी भक्ती याच पंथात सांगितली आहे म्हणून त्यास ‘भागवत संप्रदाय’ असेही संबोधन आहे.

वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व तुकारामाची गाथा हे प्रमुख ग्रंथ मानतो. त्यात ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ कारण याच ग्रंथातील वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान अन्य दोन ग्रंथांत म्हणजे एकनाथी भागवत व तुकाराम गाथा यात विस्ताराने आहे. या संप्रदायाचे संपूर्ण तत्त्वज्ञान श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या ‘अमृतानुभव’ व ‘हरिपाठ’ तसेच ‘चांगदेव पासष्टी’ यात आहे. या वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान सार संक्षेपाने ज्या प्रमुख पाच भागांत विभागले गेले आहे ते पाच भाग- १) परमात्मा परब्रह्म २) विश्व/ जगत ३) जीव ४) माया व ५) मुक्ती/ मोक्ष.

या संप्रदायाचे एक वैशिष्टय़ म्हणजे यांतील दोन संत श्रीज्ञानेश्वर व एकनाथ ज्यांनी याचा प्रचार केला प्रसार केला त्यांचा गुरूउपदेश वा गुरूपरंपरा अन्य संप्रदायांतील होता. श्रीज्ञानेश्वर माऊलींची गुरूपरंपरा ही नाथ संप्रदायातील तर एकनाथांची दत्तसंप्रदायातील, तरी पण हे दोघे महान विठ्ठल भक्त होते. वारकरी संप्रदायात श्रीराम व श्रीकृष्ण ही दैवते समाविष्ट आहेत. कारण दोन्हीही श्रीविष्णूंचेच अवतार आहेत.

वारीचा इतिहास –

पंढरीची वारी हे एक वारकऱ्यांचे व्रत आहे व त्यात ते खंड पडू देत नाहीत. पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत ।।
हे श्री तुकाराम महाराजांनी सांगूनच ठेवले आहे. तशी वारीची ही प्रथा फार जुनी. ज्ञात परंपरा साधारण ७०० वर्षांची मानली जाते, पण तसे नाही ज्ञानोबारायांचे आजोबा, माता पितासुद्धा पंढरीची वारी करीत होते असे उल्लेख नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये सापडतात. हजार -दोन हजार वर्षांपूर्वीची वारीची परंपरा आहे. फक्त आज असा सोहळा असतो तसा तो नव्हता.

नामदेवराय, चोखोबाराय, परिसा भागवत, नरहरी सोनार, सावता माळी, गोरबा कुंभार, कुर्मदास, सज्जन कसाई, या संतांनी वारीला एक सामाजिक चळवळीचे स्वरूप दिले. एकही जात अशी राहिली नाही की ज्यात वारकरी संत झाले नाहीत, सगळ्यांना सामावून घेऊन वारीचा महिमा वृद्धिंगत केला.

पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली.संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात- “पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे.” ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला; परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते. या इतिहासाचे पुढील कालखंडांत विभाजन करता येईल-
ज्ञानदेवपूर्व काळ-भक्त पुंडलिकाचा काळ
ज्ञानदेव-नामदेव काळ
भानुदास-एकनाथांचा काळ
तुकोबा-निळोबा यांचा काळ
तुकारामोत्तर तीनशे वर्षांचा काळ.

वारीचे प्रकार –

  1. आषाढी वारी – सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपापल्या गावाहून पंढरपुरात येतात.
  2. कार्तिकी वारी – संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात.
    या जोडीने माघी व चैत्री वाऱ्याही होतात.

वारीचे /पालखी सोहळ्याची वैशिष्ट्ये –

रिंगण-
वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्ध्येय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने “माऊलीचा अश्व” असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे.

धावा-
धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular