“हॅलो दादा, कसा आहेस?”
“मी बरा आहे ग. तू सांग. तुझा आवाज नेहमीसारखा फ्रेश वाटत नाही. काय झालय?”
“काही नाही रे. जरा छोटा प्रॉब्लेम झालाय….”
निलिमाने छोटा पॉझ घेतला.
” विक्रम गोखलेसारखे पॉझ कसले घेतेस निलू . सांग चटचट काय ते.”
“तस काही विशेष नाही रे. अरे माझी तब्बेत जरा बरी नाहीये. काही टेस्ट्स करायच्या आहेत. या शनिवार रविवारला लागून सुट्टी आहे ना., तेव्हाची अपॉइंटमेंट घेतलीय मी. नेमके तेव्हाच यांना टूरवर जायला लागणार आहे. हे प्रयत्न करतायत टूर कॅन्सल करायचा पण तुला आजकालची परिस्थिती माहीत आहे ना. जरा मॅनेजमेंटच्या मनाविरुद्ध काही केले तर हातात नोकरीवरून काढून टाकल्याचे पत्र ठेवतात. एकदा वाटले टेस्ट्स पुढे ढकलाव्यात पण मग.. “
” ते काही नाही. उगाच तब्बेतीच्या बाबतीत हेळसांड नको. मी तुझ्या वहिनीला पाठवून देतो. ती घरचे बघेल आणि तुला सोबतही होईल. “
मला मध्येच तोडत दादा म्हणाला.
” अं अं… म्हणजे दादा… “
” तुला पैसे हवेत का? ते तर मी असेही पाठवणार होतोच. पन्नास हजार पुरतील की आणखी पाठवू? “
अरे नाही रे. पैसे वगैरे नकोयत.अं म्हणजे तुला पण यायला जमेल का रे वहिनी बरोबर? तसे अगदी यायलाच पाहिजे असे नाही. पण एखाद वेळेस मला रात्री हॉस्पिटलमध्ये रहावे लागले तर मग वहिनी एकटी काय करेल ना? आणि ऋषी, ऋता दोघे तसे लहानच आहेत ना! “
” मी! मला कसे जमेल? इथे आईआबांबरोबर कोण?”
इतका वेळ बाबा आणि आत्याचा संवाद ऐकणारी ऋचा खाणाखुणा करायला लागली?
” बाबा, काय झालय? “
” अग, मी आत्याशी जरा कामाचे बोलतोय ना? “
” बाबा ऐका ना! आत्या तुम्हाला तिच्याकडे बोलावते आहे का?”
” तुला काय माहित. “
” नाही म्हणजे तुमचे बोलणे मी ऐकतेय ना. म्हणून विचारले.”.
“थांब ग तू. मला जरा आत्याशी बोलू दे.”
हे बघ निलू, मी तुला थोड्यावेळाने पुन्हा फोन करतो. काळजी करू नको. काहीतरी मार्ग काढतो.”
“दादा, शक्यतोवर तू येच. तू असलास की मला काहीच टेंशन नसते.”
“मी प्रयत्न करतो म्हटले ना. चल ठेऊ फोन? आणि हो उगाच टेंशन घेऊ नको. होईल ठीक सगळे.”
दादाने फोन ठेवला.
“बाबा, आता सांगा काय झालय ते.” ऋचा बाबांच्या फोन ठेवण्याची वाटच बघत होती. एरवी मोहनने तिला लहान समजून उडवाउडवीची उत्तरे दिली असती किंवा लहानांनी मोठ्यांच्यात पडू नये असे काहीतरी सुनावले असते पण अचानक मोहनला आपल्या लेकीला सारे सांगावेसे वाटले. ‘केवढी मोठी दिसतेय ही. अगदी आत्यासारखीच उंच झाली आहे.’ मोहनच्या मनात आले.
त्याने त्याच्यातला आणि निलिमातला संवाद ऋचाला सांगितला.
“त्यात काय बाबा! मी आहे ना! कॉलेजला सुट्टीच आहे ते तीन दिवस. मी थांबेन आजी आबांबरोबर आणि आपल्या पोळ्यावाल्या सारजाकाकूंना
तेवढे दिवस सगळाच स्वैपाक करायला सांगू. तुम्ही जा आत्याकडे. इकडची काही काळजी करू नका.”
ऋचाने सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवले.
“आजीआबांना आत्याला बरं नसल्याचे सांगू नका. तुम्ही परत आल्यावर काय ते सांगू. उगाच टेंशन घेईल ती” ऋचा म्हणाली.
मोहनलाही वाटले की आत्ता बहिणीला आपली गरज आहे तर आपण जावेच. तीनच तर दिवसांचा प्रश्न आहे.
त्याने चित्राला म्हणजेच त्याच्या बायकोला पण सारे सांगितले आणि ऋचा घरातली काळजी घेईल असेही तो म्हणाला.
” निलूवन्स अशा कधीच बोलवत नाहीत. शक्यतोवर आपले प्रॉब्लेम आपणच सोडवतात. यावेळी अगदी फोन करून त्यांच्या दादालाही बोलावतायत. काहीतरी तितकेच गंभीर असणार.” चित्रा मनातल्या मनात विचार करत होती.
“घरी आई आणि आबा पण तसे वयस्कर आहेत. त्यांचे पथ्यपाणी, त्यांना वेळेवर खायला देणे हे सारे ऋचाला जमेल का? तशी केअरटेकर येते म्हणा पण आई तशा अगदी जागेवरच आहेत अर्धांगवायू झाल्यापासून.” चित्राचे विचार काही थांबत नव्हते.
तरीही घरात चार जास्तीचे पदार्थ बनवून, पोळ्या करणाऱ्या बाईंना आणि ऋचाला हजारभर सूचना देऊन शनिवारी पहाटे ते दोघे निलिमाकडे रवाना झाले.
निलिमाकडे जाईपर्यंत त्यांच्या जीवात जीव नव्हता. सकाळी दहाच्या सुमारास ते दोघे निलिमाकडे पोहोचले.
अभिजीतने निलिमाच्या नवऱ्याने दरवाजा उघडला. त्याला बघून मोहन आणि चित्राला आश्चर्यच वाटले.
“अरे, तुम्ही घरी कसे काय? गेला नाहीत का टूरवर? निलू कुठे आहे? बरी आहे ना?” मोहनने दरवाजातूनच एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती केली.
“एक मिनीट थांबा,” निलू आतून ओवाळणीचे ताट घेऊन आली. तिने त्या दोघांवरून भाकर तुकडा फिरवून त्यांची दृष्ट काढली आणि त्यांना ओवाळले.
” अहो वन्स , हे काय करताय?तुम्ही बऱ्या आहात ना? “चित्रा म्हणाली.
” आधी घरात या. फ्रेश व्हा. मी तोपर्यंत चहा नाष्ट्याचे पहाते. मग आपण बोलू. “
” नक्की काय चाललय. मला काहीही कळत नाही.” मोहन पण एकदम गडबडून गेला होता.
दादा, सांगते मी. तू आधी फ्रेश तर हो.”
निलिमाने दोघांना बळेबळेच गेस्टरुमकडे रवाना केले.
दोघेही हातपाय तोंड धुवून खाली आले. तर गरमागरम मिसळ डायनिंग टेबलवर त्यांची वाटच बघत होती.
“वहिनी, तुम्हाला आवडते तशी मिक्स कडधान्यांची मिसळ आहे आणि वरून नाशिकचा कोंडाजी चिवडा घालते. तुम्हाला फरसाण आवडत नाही ना म्हणून.
दादा तुझ्यासाठी तर्री पण आहे रे झणझणीत. “
“ताई, अहो तुम्ही कशाला एवढा त्रास घेताय? तुमची तब्येत बरी नाही ना?”
चित्रा म्हणाली.
निलू फक्त गालातल्या गालात हसली.
आवडती मिसळ खाऊन आणि फक्कड चहा पिऊन झाल्यावर निलू दादा वहिनीसमोर बसली. अभिजीतही तिथेच तिच्या शेजारी बसला. मुले मामांनी आणलेला गेम खेळायला पळाली.
” दादा, वहिनी पहिल्यांदा मी तुमची माफी मागते. मला काहीही झालेले नाही आणि अभिजीतला पण कुठेही टूरवर जायचे नाही.”
“अग ढमाले, तुझे नक्की काय चाललेय? “दादा म्हणाला.
“हे बघा दादा वहिनी. गेली कित्येक वर्षे आईआबांमुळे तुम्हाला कुठेही जाता आले नाही. त्यात वहिनीचे माहेर गावातल्या गावात होते त्यामुळे वहिनी तुम्ही तर उभ्या उभ्या माहेरी जाऊन यायचात. गेल्या वर्षी तुमचे आईबाबा तुमच्या भावाबरोबर कायमचे जर्मनीला गेले आणि तुमचे माहेरी जाणे बंदच झाले. मग मी विचार केला की भावाने आणि वहिनीनेच का बरं नेहमी बहिणीचे माहेरपण करायचे? बहीणीने भावाचे बहीणपण करायला काय हरकत आहे.
अभिजीत आणि ऋचा ने ही आयडिया उचलून धरली आणि आबांनी अनुमोदन नव्हे उत्तेजन दिले. म्हणून आज तुम्ही इथे बहीणपणाला आलेले आहात.”
” अग, काय तू? असं कोणी करतं का?आणि आबा ऋचा पण यात सामील आहेत? “
दादाचा कंठ दाटून आला होता आणि वहिनीच्या तर डोळ्याला धार लागली होती.
तिने उठून निलूला मिठीच मारली.
” सो इथून पुढे दोन दिवस वहिनी तुला किचन मध्ये यायची बंदी आहे. तू आणि दादा मस्त फिरून या. जीवाचे नाशिक करा. दिवसभर कुठेही जा. हवा तेवढा वेळ फिरा. फक्त रात्री जेवायला घरीच यायचे.”
“नका हो दोघांनीच फिरायला वगैरे. आपण दोघी मिळून पटकन स्वैपाक करू आणि मग एकत्रच फिरायला जाऊ.” वहिनी म्हणाली.
“अजिब्बात नाही. आज तुम्ही दोघेच फिरायला जाणार आहात आणि दॅट इज फायनल.” निलिमा म्हणाली.
“दादा वहिनी तुम्हाला माहीत आहे ना तुमची बहीण किती हट्टी आहे ती. आज तुम्हाला तिचे ऐकायलाच लागेल. “अभिजीत म्हणाला.
पुढचे तीन दिवस मोहन चित्रासाठी मंतरलेले दिवस होते. भरपूर फिरणे, मनाजोगत्या गप्पा आणि प्रचंड लाड.
निलूने वहिनीला छान तेल लावून न्हायला घातले. त्या दोघांसाठी स्पा आणि मसाजची अपॉइंटमेंट घेतलेलीच होती. सोमवारी दुपारी मस्त पुरणावरणाचा बेत होता. त्यानंतर निलूने आवर्जून मेहंदी काढणारीला घरी बोलावले होते. कामाच्या धबडग्यात वहिनीला कधीच निवांत मेहंदी काढायला मिळायची नाही. वहिनीने मेहंदी काढून घेतल्यावर बांगड्या सुद्धा भरायला लावल्या.
मोहन चित्रा अगदी भरून पावले .
मंगळवारी पहाटे परतताना दोघांचा पाय निघत नव्हता.
असे आगळेवेगळे माहेरपण करणारी नाही नाही बहीणपण करणारी ढमाली बहीण मला जन्मोजन्मी मिळूदे असा विचार करत मोहनने गाडी सुरू केली.
घरी जाऊन आपल्या मोठ्या झालेल्या समंजस लेकीला कधी भेटतेय असे चित्राला झाले होते..
- समिधा गांधी
मुख्यसंपादक