जन्म देऊन
लहानाची मोठी केली
याचा मोबदला म्हणून
अनेकींना स्वप्नांचा चोळा मोळा करून
फेकून द्यावा लागतो
आठवणींच्या अडगळीत…
पोरगी जेवली नाही की बापही जेवत नाही
म्हणून ” जेवणात ” पोरीच्या
आवडीची भाजी करणाऱ्यांना
पोरीच्या ” जीवनात “
पोरीच्या आवडीचा माणूस
वाढता येत नाही..?
जेवणाच्या प्रश्नाला महत्व देणारे
जीवनाचा प्रश्न आला की
नेमकी ” जीवाची ” धमकी देतात..?
” तू बोट ठेवशील ते तुझं “
ही धमक दाखवणारे
तिला काहीच कमी पडू देत नाही
पण तिने तिच्या प्रेमावर बोट ठेवलं
की तिचा हातच दुसऱ्याच्या हाती देतात
समाजाच्या भीतीपोटी
पोरीच्या निवडीवर विश्वास असूनही
हिंमत होत नाही
तिच्या अभिव्यक्तीला किंमत देण्याची..?
स्वप्नांच्या पावलांना
प्रतिष्ठेचं पैंजण घालून
मनाविरुद्ध दुसऱ्याच्या उंबऱ्यावरचं माप लाथाडायला
लावणाऱ्या बापाला
ती कधीच माफ करत नाही..
कारण त्यांनी तिच्या
स्त्रीजन्माचचं माप काढलेलं असतं..?
आईला समजत असते प्रत्येक लेकीची घुसमट
पण
” तुला काय कळत
अक्कल नाही
पायातली चप्पल पायातच “
” आई ” होण्याआधी “बाई “म्हणून
तिनेही भोगलेली असते
स्त्री असण्याची जन्मजात सजा..?
विदाईच्या क्षणाला बापाच्या मिठीत
धाय मोकलून रडताना
बापाला वाटतं
पोरीनी लवकर जावं…जास्त रडू नये..
आणि पोरीला वाटतं
शेवटची मिठी आहे बापाने असा
एकाएकी हक्क सोडू नये..?
” लेक ” नावाच ओझं उतरून बाप हलका होतो
आणि लेकीची पावलं जड..
लहानपणापासून
डोळ्यांच्या धाकात वाढलेल्या
पोरीच्या डोळ्यांत डोळे घालून
बाप पाहू शकत नाही ..
कारण
“बाप” म्हणून बरोबर असलेला बाप,
“माणूस” म्हणून चुकलेला असतो..?
सुमित गुणवंत
मुख्यसंपादक