Homeमुक्त- व्यासपीठमाझ्या वकिलीची ३३ वर्षे !

माझ्या वकिलीची ३३ वर्षे !

बरोबर ३३ वर्षापूर्वी दिनांक १९ मार्च, १९८८ रोजी माझी वकिली सुरू झाली. बायकोने तिच्या बहिणीकडून उसने आणलेल्या पैशात फोर्टच्या दुकानात जाऊन वकिलीचा काळा कोट विकत घेतला. तो घेताना सोबत बायको होतीच. आज १९ मार्च, २०२१ म्हणजे त्या दिवसाला ३३ वर्षे झाली. केवढा मोठा काळ मध्ये निघून गेलाय. मी कायद्याची प्रॕक्टिस कशी केली व त्यातून मी स्वतः काय शिकलो याविषयी जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. सरकारच्या तीन अवयवांपैकी त्यातल्या त्यात स्वायत्त असलेला सरकारी अवयव म्हणजे न्याययंत्रणा. बाकीचे कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ हे दोन अवयव तसे एकमेकांना चिकटून असतात. न्याययंत्रणा या स्वायत्त अवयवाच्या सान्निध्यात राहून कायद्याची प्रॕक्टिस करणे म्हणजे वकिली! वकिली हा व्यवसाय आहे, पेशा आहे. न्याय या संकल्पनेशी तो संबंधित असल्याने त्याला उदात्त व्यवसाय म्हणतात. या उदात्त वकिलीला आज ३३ वर्षे पूर्ण झाली

अंडरवर्ल्ड डॉन तेंव्हाही होते आणि आताही आहेत. राजकारणातील नेते (म्हणजे राजे) तेंव्हा होते आणि आताही आहेत. त्यामुळे अंडरवर्ल्ड मधली गुंडगिरी तेंव्हाही होती आणि आताही आहे. तसेच राजकारणातील भ्रष्टाचार तेंव्हाही होता तसा आताही आहेच. पोलीस चकमकी तेंव्हाही होत्या आणि आताही आहेत. छापील पुस्तकांत असलेली आंबट चित्रांची पोर्नोग्राफी आता अॉनलाईनवर लाईव्ह झालीय एवढाच काय तो फरक. पण पोर्नोग्राफी ही तर तेंव्हाही होती आणि आताही आहे. शरीर विक्री म्हणजे वेश्या व्यवसाय तेंव्हाही होता आणि आताही आहे. त्यावेळचे हनी ट्रॕप हे डायरेक्ट होते, आता ते अॉनलाईन झालेत. मग काय मोठी सुधारणा झाली समाजात माझ्या वकिली प्रॕक्टिसने? काहीच नाही! चोर, शिपाई हा शाळेतील खेळ प्रत्यक्षात तसाच चालू आहे. समाज पोर्नस्टार्सना डोक्यावर घेऊन नाचतोय, मग नैतिकता कुठे शोधायची? विज्ञान, धर्म व कायदा यांच्या त्रिकोणात राहून मी निसर्गाचा, अध्यात्माचा व समाजाचा बराच अभ्यास केला. पण अजूनही ज्ञानाची पाटी कोरीच वाटते व कायद्याच्या प्रॕक्टिसमध्ये जोर आल्यासारखे वाटत नाही. आता तर ६४ वय झालंय. आता जोर कसला? जोर नाही आणि उगाच घोर करीत बसायचे, याला काही अर्थ नाही. हे सर्व असेच चालू राहणार. ते स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. अधूनमधून थोड्या उड्या मारीत रहायचे व त्यातून आपण काहीतरी मोठा बदल घडवून आणतोय असे मनाला समजावायचे. हे मानसिक समाधान काय कमी आहे!

  • ॲड.बी.एस.मोरे
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आपले वकिलीची 33 वर्षे हे मनोगत वाचले. राजकारणातील भ्रष्टाचार वगैरे जो दिसतो त्याला बऱ्याच अंशी आपल्या देशाने स्वीकारलेली लोकशाही व्यवस्था कारणीभूत आहे असे मला वाटते. भारतीय लोकशाहीबाबत माझ्या विचारांचा लेख इ- मेल द्वारे पाठवित आहे.

- Advertisment -spot_img

Most Popular