बघ संकेत तू आता लहान नाहींयस तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगायला, तुझ्या बरोबरीची मुलं कष्ट करून आज नाव कमवून बसले आहेत, आणि तू आजही तसाच आणि नको त्या वळणावर गेलायस, लाज वाटली पाहिजे रे तुला…..
वासंती आपल्या मुलाला खूप समजावत होती पण तो ऐकेल तर शपथ….
संकेत, लहानापासून मोठा होईपर्यंत लाडाने वागवलेला मुलगा, आज काहीतरी करून आई वडिलांना मदत करायची सोडून हा मित्रांबरोबर उनाडक्या करत बसतो आणि खायला फक्त घरी येतो…..गावात हिंडायचं, पोरींना छेडायचं, कोणाच्या तरी घरची चोरी करायची आणि बसायचं गावाच्या वेशीवर जाऊन, हळकट पोरांबरोबर…..
आज एकदम संकेतने कहरच केला, चार-पाच मित्रांना घेऊन घरी आला आणि आईला म्हणाला, आज माझे मित्र आणि मी इथेच थांबणार आहे, आमच्यासाठी जेवण बनव आई……
वासंतीने एवढं ऐकलं आणि चुलीजवळ पडलेलं लाकूड उचललं आणि घातलं त्याच्या डोक्यात….
दोन पैसे कमवायची अक्कल नाही आणि जेवण पाहीजेय त्याला, आणि ह्या नालायकांना पण अक्कल नाहीय, आई बापाने शिकवलंय काय, की नाही मेल्यांना….
लाकूड मजबूत होतं त्यामुळे संकेतचं डोकं फुटलं आणि तो दोन मिनिटांतच रक्तबंबाळ झाला….
वासंती बडबड करत असतानाच तिचं लक्ष त्याच्याकडे गेले आणि लागली ओरडायला…
पण ह्याचे मित्र सगळे त्याला त्या अवस्थेत बघून, गेले पळून…
वासंतीचे ओरडणे आणि रडणे ऐकून, आजूबाजूचे लोक धावत आले आणि संकेतला डॉक्टरकडे नेले….
गावातले डॉक्टर म्हणाले, याच्या मेंदूला मार लागल्यामुळे इथे याची ट्रीटमेंट होणार नाही, परंतु तुम्ही याला जिल्ह्याला घेऊन जा, तिथे उत्तम इलाज होईल….
वासंतीला कोणीतरी सांगितलं, लवकर जिल्ह्याला न्यावे लागेल, नाहीतर याच काही खरं नाही…
शेवटी आईच ती…
आपल्या पोरावरून जीव ओवाळून टाकायलाही तयार होती ती…
पण पैशाची चिंता होतीच….
तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून गावातलाच एक चांगला मुलगा पुढे आला नि म्हणाला – काकी काही काळजी करू नका आधी आपण संकेतला तिथे घेऊन जाऊ….
संकेतला गाडीत टाकून जिल्ह्याला नेलं आणि ऍडमिट केलं….
पण डॉक्टरांनी मेंदूला मार लागल्यामुळे गॅरंटी नाही दिली….
वासंती हाय मोकलून रडू लागली, काय माझ्या डोक्यात आलं नि मी फेकून मारलं रे देवा….
तिला काहीच कळत नव्हते, काय करू नि काय नाही, सगळीकडे काळजीने नाचत फिरत होती….
वर आकाशाकडे बघून….अहो, बघताय ना आपल्या पोराचं काय झालं ते, आता मी काय करू….
रडून रडून तिने पूर्ण हॉस्पिटल डोक्यावर घेतले होते….
तिचा तांडव बघू तो गावातला मुलगा, तिच्याजवळ आला नि तिला शांत केलं, पाणी प्यायला दिलं….
काकी…मी संजय, संकेतच्या शाळेत त्याच्याबरोबर शिकायला होतो, माझ्या वडिलांनी इथे गावातच एक फॅक्टरी उभी केलेय, त्याच फॅक्टरीत कामासाठी संकेतला बोलवायला आज तुमच्याकडे आलो होतो तर मला हे बघायला मिळालं….असो.
तू संजय, त्या रंजन काकांचा मुलगा काय रे तू…
हो काकीं…
अरे ते मुंबईला गेले होते ना….
हो काकीं पण वीस दिवस झाले आम्ही ईकडे आलोय कायमचं…
तुम्ही आराम करा मी काहीतरी खायला घेऊन येतो…
असं म्हणून संजय बाहेर गेला…..
वासंती आता बऱ्यापैकी सावरली होती….
पण….संकेतच्या हॉस्पिटलचा खर्च, गोळ्यांचा खर्च कसा करायचा हे तिला काहीच कळत नव्हते…
तिने वर आकाशाकडे बघितलं आणि बोलायला लागली…
आज ही परिस्थिती ओढावली ती मी त्याला मारल्यामुळे आहेच पण आज तुम्ही असतात तर असं नसतं झालं…..
वासंती आणि शांताराम यांचं लग्न बावीस वर्षापूर्वी झाले, दोन वर्षांनी संकेत झाला आणि शांतरामला मित्रांच्या नादाने दारूची सवय लागली, रोज रोज दारू पिऊन यायचा पण कोणालाच कसलाही त्रास द्यायचा नाही….
वासंतीने खुप वेळा त्याला समजावले पण नाही, काहीच उपयोग झाला नाही.
मी एक वेळ जीव सोडेन पण दारू सोडणार नाही असं उत्तर तो वासंतीला देत होता.
हे सर्व संकेत मोठा होत असताना पाहत होता आणि बापाच्याच वळणावर जायचा प्रयत्न करत होता….
संकेतलाही वासंती समजावत होती पण कोण ऐकेल तर शपथ…
संकेत पंधरा वर्षाचा असताना शांताराम एकदा रात्रीचा खूप दारू पिऊन आला आणि जेवण न करताच झोपला तो सकाळी उठलाच नाही…
गेला शांताराम वासंती आणि संकेतला सोडून, दारूच्या अधीन होऊन कायमचा या जगातून निघून गेला….
वासंतीला हे सर्व आठवत होत नि, मी समजावून पण तुम्ही ऐकला नाहीत आणि आता हा लेक पण तेच दिवे लावतोय…
पण लगेच तिला घडलेल्या घटनेची जाणीव झाली आणि पुन्हा रडू लागली…..
तेवढ्यात डॉक्टर आणि कोणीतरी एक जण बाहेर येऊन आवाज देऊ लागले…..संकेत…संकेत..
वासंती लगेच धावत गेली…..
अहो, तुमचा हा मुलगा या दारू, सिगरेट, गुटखा अशी व्यसन करतोय, आणि आता त्याचं लिव्हर खराब होत चाललेले आहे, औषध चालू करून बघू त्यावर….
पण आता जे काही घडलंय त्यामुळे त्याच्या मेंदूला फार जखम झाली आहे, ऑपरेशन करावे लागेल, त्यासाठी दीड लाख रुपये लागणार आहेत…
डॉक्टरांचे बोलणे ऐकून वासंती पडणार इतक्यात संजयने धावत येऊन तिला पकडले…..काकी… काकी
काय झाले डॉक्टर, काय झालं….
आपण कोण ??
मी संकेतचा मित्र …..
बरं, त्याचं ऑपरेशन करावं लागणार आहे, त्यासाठी पैसे…..
डॉक्टरांचे म्हणणे मधेच तोडत संजय म्हणाला…..
डॉक्टर पैशांची काळजी नका करु, आपण फक्त ऑपरेशन चालू करा पैसे जमा होतील….
वासंती स्वतःला सावरत, संजयच्या पायाच पडली….
अहो, काकी तुम्ही माझ्या आईसारख्या आहात पाया काय पडताय….उठा आधी….
वासंती उठून उभी राहिली आणि त्याच्या तोंडावरून हात फिरवत म्हणाली, अरे बाबा हे तुझे उपकार कसे फेडू रे मी….
काकी, हे उपकार नाही मी माझे कर्तव्यच करतोय….
म्हणजे ? — वासंती प्रश्नार्थक नजरेने संजयकडे बघत विचारती झाली….
काकी, काही नाही, नंतर सांगतो……
संजयने वडिलांना फोन करून सर्व घडलेली हकीकत सांगितली आणि पैशासाठी ही सांगितलं…..
थोड्याच वेळात संजयच्या घरातून एक माणूस पैसे देऊन गेला ….
ते पैसे संजयने हॉस्पिटलला भरले, आणि ऑपरेशन सुरू झालं…
काकी जास्त विचार करू नका, संकेत बरा होईल….
वासंती पुन्हा रडू लागली, आईचा जीव कासावीस होत होता, काय होईल पुढे, संजय मदत करतोय पण तेच पैसे फेडायचे कसे, हा तर उनाडक्या करतो….
काकी, काय झालं, माझे पैसे कसे द्यायचे हा विचार करत असाल तर, तर ते पैसे मला परत द्यायचे नाही आहेत….
संकेच्या वडिलांकडून माझ्या बाबांनी एक जमीन घेतली होती, ज्यावेळी घेतली, त्यावेळी बाबांनी त्यांना खूपच कमी पैसे दिले होते….
बाबांना त्यांच्या दारूच्या व्यसनाची सवय माहीत होती, म्हणून बाबांनी ती रक्कम तशीच ठेवली होती…
आणि आज तीच रक्कम मी आज बाबांकडून हॉस्पिटल मध्ये भरण्यासाठी मागवली होती……
इतक्यात डॉक्टरही बाहेर आले आणि म्हणाले….
ऑपरेशन झाले आहे….अगदी व्यवस्थित…..
वासंतीच्या चेहऱ्यावर थोडं समाधान दिसत होतं….
आज जे काही घडलंय ते या संजय मूळे हे तिला समजत होते, त्याच्याचमुळे आज आपला पोरगा वाचला होता, त्याच आयुष्य त्याच्याच जीवावर घडणार होत हे तिला मनोमन समजलं होत….
संजय मात्र वासंतीचा समाधानाचा चेहरा वाचत होता….
पोरा आज तुझ्यामुळे हे दिवस दिसले बघ, नाहीतर मी कुठून आणणार होतो रे एवढे पैसे….मला तर धडकीच भरली होती बघ….
काकी संकेतला बरं वाटुदे नंतर पुढचं बघू आपण…..
झालं, संकेत हॉस्पिटल मधून घरी आला, त्याचे नालायक मित्रही त्याला बघायला आले, पण वासंतीने एकालाही दरवाजात उभं केलं नाही…..
जो कोण बघायला यायचा तो संकेतला सांगून जायचा, अरे पोरा आता तरी सुधारून दाखव आईच्या कष्टाचं चीज कर….
संकेतला आता सगळं काही चांगलं समजत होतं…..
आपण कुठेतरी मोठी चूक केली हे त्याला मनापासून वाटत होते….
आई मला माफ कर, मी खूप मोठी चूक केलेय, मला माफ कर,….
तू खूप समजावून सांगितलंस मला पण मला अक्कल नाही आली, पण मी आता सुधारेन, काहीतरी करून दाखवेन आई….
वासंतीला आपल्या पोराची ही भाषा ऐकून गहिवरून आलं….
त्याला कुशीत ओढून घेऊ म्हणाली, लेकरा खूप मोठा हो रे….
आई, या संजयने मला त्या दिवशी गाडीतून घरी येताना, खूप काही सांगितले आहे, त्यानेच मला एक नवीन मार्ग सांगितलाय, मी त्याच्या फॅक्टरीत काम करायचं ठरवलं आहे…..आई..
आपला मुलगा खरंच सुधरला असे वाटून वासंतीला खूप आनंद झाला आणि तिने गणेशला खूप खूप आशिर्वाद दिले…
पोरा आज तुझ्यामुळे माझा मुलगा या व्यसनाच्या चिखलातून बाहेर आलाय, खरंच रे पोरा तुझे उपकार कसे फेडू…..
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
संकेत बघ, आज तुला जीवदान मिळालंय ते माझ्यामुळे नाही, तुझ्या कर्मामुळे मिळालंय त्याच सोनं कर, म्हणतात ना देव तयारी त्याला कोण मारी….असंच तुझ्या बाबतीतही झालंय, तू ज्या रस्त्यावर आधी चालत होतास तो रस्ता चुकीचा आहे हे माहीत होतं, तरीही तू त्या रस्त्याने जात होतास.
मग आता विचार बदल, या नवीन मिळालेल्या संधीचं सोनं कर, आणि दाखवून दे जगाला, मीही काहीतरी करून मोठा होऊ शकतो, खराब रस्ता सोडून चांगल्या रस्त्याने गेल्यास आपले ध्येय आपल्याला गाठता येतेच, हे सिद्ध करून दाखव…..
हो संजय, मी चुकलो होतो, आईलाही खूप त्रास दिला, परंतु या घटनेने मी पूर्ण बदललोय, आणि मी उद्यापासून तुझ्या फॅक्टरीत कामाला येतोय….
आणि हो मला हा यशाचा मार्ग दाखवला पण यापुढेही माझा मार्गदर्शक म्हणून माझ्या बरोबर उभा राहा…..
संकेत, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस” मी फक्त मार्ग दाखवलाय चालायचं कसं हे फक्त नि फक्त तुझ्याच हातात आहे…..
★★★★■■■★★★★★★★★■■■★★★★★
आज संकेतने संजयच्या फॅक्टरीला परदेशातही नाव कमवून दिले आहे आणि स्वतःचंही नाव तितकंच कमावलं आहे….
हे फक्त नि फक्त संजयच्या दाखवलेल्या मार्गावर चालल्यामुळे घडलंय हे कोणालाही सांगायला संकेत कधीही कमीपणा समजत नाही…..
★ ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे, फक्त नावात बदल केला आहे★
लेखक -
- विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )
मुख्यसंपादक