भारतभूमी विविध सण-उत्सवांनी समृद्ध आहे. या भूमीवर प्रत्येक ऋतू, प्रत्येक देवता, प्रत्येक परंपरेशी निगडित असे असंख्य सण साजरे केले जातात. त्यामध्ये गणेशोत्सवाला एक विशेष आणि अविस्मरणीय स्थान आहे. “सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची” अशी आराधना ज्याच्या चरणी केली जाते, त्या श्रीगणेशाचा हा उत्सव केवळ धार्मिकच नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय असा एकत्रित रंग घेऊन उभा राहतो.
गणेशोत्सव हा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. पेशवेकालीन पुणे, सातारा, मुंबई या भागात गणेशपूजा मोठ्या थाटामाटात होत असे. घराघरांत पूजाअर्चा होत असतानाच सार्वजनिक पातळीवर देखील उत्सवाचे दर्शन घडत होते. पण हा सण केवळ धार्मिक मर्यादेत राहिला होता.
१८९३ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला नवे रूप दिले. तत्कालीन ब्रिटिश सत्तेखाली दबलेल्या भारतीय समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी “सार्वजनिक गणेशोत्सव” हा उपक्रम सुरू केला. धर्माच्या माध्यमातून समाजात ऐक्य निर्माण करून राजकीय जागृती निर्माण करणे हा यामागील उद्देश होता. टिळकांच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सव हा जनसामान्यांचा सण बनला. पुण्यातील केसरी वाड्यावर झालेल्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने समाजमनात जागृतीची बीजे पेरली आणि “एकत्र येणं, संघटित होणं आणि समाजशक्ती दाखवणं” हा संदेश दिला.
गणेशोत्सव हा भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला विसर्जनाने पूर्णत्वास जातो. या दहा दिवसांत गणेशाची मूर्ती घराघरांत आणि मंडपांत प्राणप्रतिष्ठा करून पूजली जाते. दररोज आरती, भजन, कीर्तन, गजानन स्तोत्र, अथर्वशीर्ष पठण यांमुळे वातावरण पवित्र होते. श्रद्धाळू भक्त ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आपली भक्ती अर्पण करतात.

गणेशाला मोदक प्रिय असल्याने या काळात घराघरांतून उकडीचे मोदक तयार होतात. “एकदंता, चतुर्भुजा, लम्बोदर” या रूपातील देवतेची आराधना करताना भक्त आपली कुटुंबीय सुख-समृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि विघ्ननाशासाठी प्रार्थना करतात.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवामुळे समाजात बंधुभाव निर्माण झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्य, जाती-धर्माच्या पलीकडील समरसता या माध्यमातून रुजवली गेली. शाळा, वाचनालये, समाजउपयोगी कार्यक्रम, नाटके, कीर्तने, व्याख्याने या सर्व माध्यमातून शिक्षण, कला आणि समाजजागृतीचा प्रचार झाला.
आजही अनेक मंडळे रक्तदान शिबिरे, वैद्यकीय तपासण्या, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन यांसारखे उपक्रम राबवतात. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण न राहता सामाजिक बदल घडवून आणणारे व्यासपीठ बनला आहे.
गणेशोत्सव हा भारतीय कला-संस्कृतीचा महोत्सव आहे. नृत्य, गायन, नाटक, स्पर्धा, चित्रकला, संगीत या सर्व कलांना यामध्ये वाव मिळतो. ढोल-ताशे, लेझीम, दिंडी, मिरवणुका, सजावट, रंगभूषा या सगळ्यातून नवचैतन्य संचारते. पुण्याचे गणेशोत्सव मिरवणुकीतील डोल-ताश्यांचा निनाद, मुंबईतील लालबागचा राजा, सिध्दीविनायक, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती या मंडळांनी उत्सवाला वैश्विक ओळख मिळवून दिली आहे.
विद्यार्थ्यांना व तरुणांना यातून नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, जबाबदारीची जाणीव यांचा अनुभव येतो.

आजच्या काळात गणेशोत्सव अधिक व्यापारीकरणाकडे झुकताना दिसतो. भव्य दिव्य पंडाल, लाखो रुपयांची रोषणाई, डीजे संस्कृती, आरडाओरडा यामुळे मूळ अध्यात्मिक भाव हरवत आहे. याशिवाय प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रंगीत केमिकल्स, नॉन-बायोडिग्रेडेबल सजावट यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. नद्यांमध्ये, समुद्रात होणाऱ्या विसर्जनामुळे प्रदूषणाची पातळी वाढते.
म्हणून आजची गरज आहे ती “इको-फ्रेंडली गणेशोत्सवाची”. मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंग, कृत्रिम विसर्जन कुंड, कमी आवाजातील साधी आरती, पर्यावरणपूरक सजावट या माध्यमातून हा सण अधिक शुद्ध आणि अर्थपूर्ण होऊ शकतो.
आज गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. परदेशातही भारतीय समुदाय मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतो. अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया, दुबई इथे गणेशोत्सवाला वेगळेच महत्त्व आहे. गणेशोत्सव हा भारतीय संस्कृतीचा जागतिक दूत ठरला आहे.
गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती, समाजजागृती, संस्कृती आणि ऐक्य यांचा संगम आहे. लोकमान्य टिळकांनी दिलेलं सार्वजनिक स्वरूप आजही जपलं पाहिजे. समाजाच्या हितासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी, शिक्षण आणि आरोग्य यासाठी या उत्सवाचा वापर केला पाहिजे.
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” हा जयघोष केवळ भावनिक नाही, तर तो आपल्याला पुन्हा एकदा चांगल्या बदलांसाठी सज्ज होण्याची प्रेरणा देतो.
गणेशोत्सव खऱ्या अर्थाने तेव्हाच यशस्वी ठरेल जेव्हा तो धार्मिकतेसोबतच सामाजिक एकात्मता आणि पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश देईल. श्रीगणेशाची कृपा लाभली तर सर्व विघ्नांचा नाश होईल आणि प्रत्येक घरात सुख-समृद्धीचे आगमन होईल.
✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर -आण्णा
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

समन्वयक – पालघर जिल्हा



