वांगणी स्टेशनवर एक्स्प्रेस समोर आलेल्या लहान मुलाचे प्राण वाचवताना मयूर शेळकेने दाखवलेल्या हिमतीला तोड नाही. मात्र त्या मुलाचे प्राण वाचवण्याचे श्रेय मयूर सोबत आणखी एका व्यक्तीला देखील जाते. जी व्यक्ती आजपर्यंत कधीच पुढे आली नाही. त्यांना कोणीही शाबासकी दिली नाही, त्यांना कुणीही पुरस्कार दिले नाहीत. मात्र त्यांनी जर समयसूचकता दाखवली नसती तर मयूर सोबत त्या लहान मुलाचे प्राण देखील गेले असते. ती व्यक्ती म्हणजे त्या एक्स्प्रेसचे लोको पायलट विनोद जांगिड.
विनोद जांगिड त्यादिवशी उद्यान एक्सप्रेस चालवत मुंबईच्या दिशेने येत होते. वांगणी स्टेशनच्या आधी एक खूप मोठे वळण आहे. त्यामुळे वांगणी स्टेशन दिसत नाही. असे असतानाही गाडी 105 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगात घेऊन येताना, वळण पूर्ण झाल्यानंतर अचानक समोर ट्रॅकवर विनोद यांना तो लहान मुलगा आणि त्याच्या समोर धावताना मयूर शेळके नजरेस पडला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता समयसूचकता दाखवली आणि आधी इमर्जन्सी ब्रेक दाबले. त्यामुळे 105 किलोमीटर प्रतितास एवढ्या प्रचंड वेगात असणारी एक्स्प्रेस अवघ्या तीन सेकंदात 80 ते 85 किलोमीटर प्रति तास या वेगावर येऊन पोहोचली. आणि याचाच फायदा मयूर शेळकेला झाला. ब्रेक दाबल्याने ती गाडी पुढे स्थानकात येऊन थांबली. त्यावेळी विनोद यांना संपूर्ण प्रसंग समजला आणि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
असे अनेक प्रसंग विनोद यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनुभवले आहेत. मात्र आजपर्यंत त्यांना कुणी साधी शाबासकी देखील दिली नाही. लोको पायलट आणि मोटर बंद अशा घटना झाल्यानंतर देखील मन स्थिर ठेवून हजारो प्रवाशांचे प्राण सुरक्षित राखून गाडी चालवत असतात. अनेक वेळा जनावरे रेल्वे ट्रॅकवर येतात, त्यांनी बाजूला व्हावे यासाठी लोको पायलट हॉर्न वाजवतात. मात्र शेवटी त्या जनावराला धक्का लागतोच आणि ते मरते. अशा वेळी देखील गाडी चालवणारे कर्मचारी दुःखी होतात. जर चुकून एखाद्या व्यक्तीला ट्रेनचा धक्का लागून तो मृत झाला तर दो- तीन दिवस झोप येत नाही, असे विदारक अनुभव विनोद यांनी सांगितले. त्यामुळे विनोद सरांचे कार्यदेखील खूप मोठे आहे
साभार -अक्षय भाटकर
पोस्ट- सोशल मीडियावर व्हायरल..
मुख्यसंपादक