पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या आंब्याला विकसित देशांची बाजारपेठ उपलब्ध होण्याकरिता, निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने उपलब्ध करुन दिल्या आहेत.
आंबा हंगाम 2023 मध्ये (Mango) राज्यात उत्पादित होणाऱ्या आंब्याला विकसित देशांची बाजारपेठ उपलब्ध होण्याकरिता निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याअंतर्गत 8 एप्रिल रोजी जपानला आणि 11 एप्रिल रोजी अमेरिकेला पहिला आंबा पाठविण्यात आला. त्यामुळे पुण्यातील आंब्याची चव आता जपान आणि अमेरिकेतील नागरिक चाखू शकणार आहे
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील व्हेपर हीट ट्रिटमेंट सुविधेवरुन 8 एप्रिल 2023 रोजी केशर आणि बैगनपल्ली असा एकूण 1.1 मेट्रिक. टन आंबा जपानला रवाना करण्यात आला. अशाचप्रकारे 11 एप्रिल रोजी मंडळाच्या वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन 6.5 मेट्रिक. टन हापूस, केशर आणि बैगनपल्ली या आंब्याची पहिली कन्साईनमेंट अमेरिका येथे निर्यात करण्यात आली.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ, बंदराचे फळे आणि भाजीपाला निर्यातीसाठी असलेले स्थान महत्व लक्षात घेता कृषी पणन मंडळाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आवश्यक निकषांची पूर्तता करुन निर्यातभिमुख विकिरण सुविधा, भाजीपाला प्रक्रिया केंद्र आणि व्हेपर हीट ट्रीटमेंट या अद्ययावत सुविधांची उभारणी वाशी, नवी मुंबई येथे करण्यात आलेली आहे.
प्रक्रिया केलेले आंबे रवाना
जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, युरोपीय देश आणि रशिया या आयातदार देशांच्या निकषांनुसार, निर्यातीपूर्वी आंब्यावर बाष्प उष्णता प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. फळमाशीचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. कृषी पणन मंडळाच्या अत्याधुनिक बाष्प उष्णता उपचार सुविधेमुळे हे शक्य झाले आहे. आंबा हंगाम-2022 पासून, केंद्र सरकारच्या NPPO विभागाच्या निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया करून आणि प्रक्रिया प्रमाणित करून त्यांचे निरीक्षक न पाठवता जपानने आंब्याच्या आयातीला परवानगी दिली आहे.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, अर्जेंटिना यांसारख्या आयातदार देशांच्या नियमांनुसार, निर्यातीपूर्वी आंब्यातील कोक्सीड्स आणि कीटकांचे उच्चाटन करण्यासाठी विकिरण प्रक्रिया अनिवार्य आहे. कृषी पणन मंडळामार्फत निर्यातदारांच्या मागणीनुसार राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि अपेडा यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथे इरिडिएशन सुविधा केंद्र सुरू केल्यामुळे ही सुविधा शक्य झाली आहे. कोबाल्ट-60 किरणांचा वापर किरणोत्सर्गासाठी रेडिएशन सुविधेवर केला जातो.
या सुविधेसाठी आवश्यक असलेले एनपीपीओ, अणुऊर्जा नियामक मंडळ, अणुऊर्जा विभाग, भारत सरकार इत्यादींचे प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर, यूएसएला आंब्याच्या निर्यातीसाठी आवश्यक असलेले USDA-AFIS प्रमाणपत्र पूर्ण झाले. सुविधेवर रेडिएशन प्रक्रियेदरम्यान यूएस निरीक्षक प्रत्यक्ष उपस्थित असतात. अमेरिकेसाठी आंब्याची पहिली खेप मंगळवारी कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत रवाना झाली.
समुद्रमार्गे आंबा अमेरिकेला…
समुद्रमार्गे अमेरिकेला आंब्याची निर्यात गेल्या वर्षी यशस्वीपणे करण्यात आली. आंबा हंगाम-2023 मध्ये सागरी मार्गाने आंब्याची व्यावसायिक निर्यात करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. पणन मंडळाच्या सर्व आंबा सुविधा शेतकरी आणि मॅगोनेटमध्ये नोंदणीकृत पॅकहाऊस संगणकीकृत प्रणालीद्वारे जोडल्या जातात. यामुळे आयातदाराला आंब्याच्या गुणवत्तेची खात्री मिळते आणि निर्यात वाढण्यास मदत होते.