Ashadhi Wari 2023 :-
७५ रुग्णवाहिका वारकऱ्यांचा सेवेसाठी सज्ज : पालख्यांच्या प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर आळंदी आणि देहू देवस्थानच्या ठिकाणी धूर फवारणी आणि पाण्याचे नमुने तपासणी करण्याकरिता अतिरिक्त विशेष पथके नियुक्त केली आहेत. तसेच, अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी रविवारी दिली.
देहू आणि आळंदी येथे वारकऱ्यांच्या औषधोपचासाठी प्रत्येकी दहा बूथ तयार करण्यात आले आहेत. सरकारी संस्थांमधून व निर्माण केलेल्या बूथ, तसेच वैद्यकीय पथकांकडून आतापर्यंत आळंदीमध्ये ११ हजार ८९६ व देहूमध्ये १० हजार ९८४ वारकऱ्यांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी ५६ वारकऱ्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
तसेच, १४ रुग्णांना संदर्भ सेवा पुरविण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. दोन्ही देवस्थानाच्या ठिकाणी एकूण एक हजार ८५१ हॉटेल्स व त्यातील सहा हजार ९५३ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. विहिरी, धर्मशाळा, नळाचे पाणी, घरातील पाणी अशा वेगवेगळ्या आठ हजार १५५ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
तीन चित्ररथ
संपूर्ण पालखीमार्गावर आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी खास तीन पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गावर आरोग्य विषयी माहितीसाठी तीन चित्ररथांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच, पंढरपूर येथे २८ आणि २९ जून या दोन दिवसांमध्ये महाआरोग्य शिबिराचे नियोजन केले आहे, अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखीमार्गांवर व त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत फिरती वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याअंतर्गत तात्पुरते दवाखाने, बूथ उभारण्यात आले आहेत. याबाबत दिंडीप्रमुखांना माहिती देऊन त्यांच्याशी समन्वय साधण्यात आला आहे.
वारकऱ्यांचा सेवेसाठी
पुणे जिह्वा : ५३ रुग्णवाहिका
सातारा जिह्वा : ६ रुग्णवाहिका
सोलापूर जिह्वा : १६ रुग्णवाहिका
पंढरपुर शहर : २९ जूनला (आषाढी एकादशी दिनी ) १५ स्वतंत्र रुग्णवाहिका
एकूण :७५ रुग्णवाहिका सज्ज (पंढरपुर मध्ये १०८ हे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे)