हुळिकट्टी (ता. सौंदत्ती) | प्रतिनिधी
बेलगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हुळिकट्टी येथील सरकारी शाळेच्या पाण्याच्या टाकीत विष घालून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा कट रचल्याचा आरोप श्रीराम सेनेचा तालुका अध्यक्ष सागर पाटील याच्यावर असून त्याच्यासह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत या कटामागील उद्देश शाळेतील मुस्लिम मुख्याध्यापक सुलेमान गोरनायक यांची बदली घडवून आणणे हा असल्याचे समोर आले आहे.
प्रकार कसा उघडकीस आला?
हा प्रकार १४ जुलै रोजी घडला. शाळेच्या पाण्याच्या टाकीत विष घातल्यानंतर ११ ते १२ विद्यार्थी आजारी पडले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि सुदैवाने सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी तपास सुरू करताच हा घातपाताचा कट उघडकीस आला.
आरोपींनी मुलालाच बनवले प्यादे
तपासात उघड झाले की सागर पाटीलने कृष्णा मदार आणि नागनगौडा पाटील यांना या कटात सामील करून घेतले. त्यांनी मुन्नवळी येथे जाऊन कीटकनाशक आणले. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे या कीटकनाशकाचे पाणी टाकीत ओतण्यासाठी एका अल्पवयीन मुलाचा वापर करण्यात आला. त्या मुलाला ५०० रुपये, खाऊ आणि चॉकलेट देऊन हे घृणास्पद काम करून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
उद्देश: मुस्लिम मुख्याध्यापक हटवणे
मुख्य आरोपी सागर पाटील याने गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या मुस्लिम मुख्याध्यापक सुलेमान गोरनायक यांना हटविण्यासाठी हा कट रचल्याचे चौकशीत मान्य केले आहे. या घटनेमागे धार्मिक असहिष्णुता व जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची तीव्र प्रतिक्रिया
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “निरपराध विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळून धार्मिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न अत्यंत घृणास्पद आहे. हा प्रकार मोठ्या प्रमाणावर हत्याकांड ठरू शकला असता,” असे ते म्हणाले. त्यांनी पोलिसांच्या तातडीच्या कारवाईचे कौतुक केले आणि अशा घटना राज्यातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचा कट असल्याचे स्पष्ट केले.
पुढील कारवाई
आरोपींवर खुनाचा प्रयत्न, कटकारस्थान, बालकाचा गैरवापर आणि अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणातील आणखी सहकार्यांचा शोध घेत आहेत.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



