Homeघडामोडीजिद्द आणि चिकाटीचे यश : शेटगे यांची ग्राम महसूल अधिकारीपदी निवड

जिद्द आणि चिकाटीचे यश : शेटगे यांची ग्राम महसूल अधिकारीपदी निवड

आजरा ( अमोल चव्हाण ) – : आजरा तालुक्यातील श्रीधर शेटगे यांनी अनेक अपयशांना सामोरे जात अखेर आपल्या जिद्दीच्या बळावर ग्राम महसूल अधिकारी पदावर निवड मिळवून यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

श्रीधर शेटगे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण माऊली माध्यमिक हायस्कूल, धनगरमोळा येथे झाले. त्यानंतर त्यांनी आजरा महाविद्यालय, आजरा येथे शिक्षण घेतले आणि पुढे विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथून गणित विषयात बी.एस्सी. पदवी प्राप्त केली.

त्यांचे वडील सेना दलातून निवृत्त असून आई गृहिणी आहेत. तसेच त्या गणेश महिला दूध संस्थेच्या संस्थापक असून त्यांच्याकडूनच सामाजिक सेवेची प्रेरणा मिळाली. त्यांची पत्नी सौ. माया श्रीधर शेटगे या प्राथमिक शिक्षिका आहेत. तर मोठे बंधू देविदास शेटगे हे सार्वजनिक आरोग्य विभागात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

पदवी शिक्षणानंतर श्रीधर शेटगे यांची भारतीय वायुदलात निवड झाली होती; मात्र उच्च पदासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने त्यांनी वायुदलात रुजू न होता स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडला. त्यांनी सेना दलातील अधिकारी पदासाठी पाच वेळा प्रयत्न केले तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये थोड्या फरकाने यश हुकले. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सहा वेळा पात्र ठरूनही अंतिम यश हुलकावणी देत होते, तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही.

अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले आणि त्यांची ग्राम महसूल अधिकारी पदावर निवड झाली. सध्या ते पुढील ध्येय गाठण्यासाठी अभ्यास सुरू ठेवत असून महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसमधील ACF (Assistant Conservator of Forest) पदासाठीच्या MPSC मुख्य परीक्षेसाठीही पात्र ठरले आहेत.

त्यांच्या या जिद्दीच्या प्रवासामुळे अनेक स्पर्धा परीक्षार्थींना प्रेरणा मिळत आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular