२८ नोव्हेंबर इ.स.१८९०
महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन!
शके १८१२ च्या कार्तिक व. १ रोजीं महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक व स्वयंस्फूर्तीने समतावाद प्रतिपादिणारे महात्मा ज्योतिबा गोविंद फुले यांचे निधन झाले.
सातारा जिल्ह्यांतील कटगुण हे यांचे मूळ गाव. यांचे आजोबा शेटीबा हे उदर- निर्वाहासाठी म्हणून पुण्यास आले. यांच्या तीनही मुलानी माळी कामांत कौशल्य दाखवून पेशव्यांच्या येथे फुले देण्याच्या कामगिरीत लौकिक संपादन केला, म्हणून यांचे नांव फुले असे पडले. शिक्षणास सुरुवात झाल्यावर ज्योतिबांनी वा.ब.फडके यांचे मांग जातीचे गुरु लहूजीबुवा यांचेजवळ दांडपट्टा व नेमबाजी यांचे शिक्षण घेतले. ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या सेवावृत्तीने व कार्यनिष्ठेनें हे चांगलेच भारावले गेले होते. बहुजन समाजाला साक्षर करावे व त्याला सत्यधर्माचे ज्ञान करून द्यावे असा विचार यांच्या मनांत येऊ लागला. सन १८५१ मध्ये यांनी बुधवार पेठेतलि चिपळुणकरांच्या वाड्यांत मुलींची शाळा काढली. या कामी यांना व यांच्या पत्नींना समाजाकडून अत्यंत त्रास झाला; परंतु यांच्या या अभिनव कार्याबद्दल यांचा जाहीर सत्कार झाला. व सरकारने यांना दोनशे रुपयांची शालजोडी अर्पण केली. त्यानंतर सन १८५३ मध्ये वेताळ पेठेत अस्पृश्यांकरिता दोन शाळा यांनी स्वतःच्या खर्चाने काढल्या. विधवाविवाहाचा प्रसार करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी तसा एक विवाह घडवून ही आणला. तसेच पतित मुलींच्या हातून भ्रूणहत्येचे पातक घडू नये म्हणून यांनी बालहत्या-प्रतिबंधक गृह काढले. यानंतरची यांची महत्वाची कामगिरी म्हणजे १८७३ मध्ये यांनी आपल्या विख्यात अशा सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्राह्मणांची मध्यस्थी दूर होऊन सामाजिक गुलामगिरी दूर व्हावी असा उद्देश या समाजाचा होता. समाजशास्त्राज्ञांनी अभ्यासपूर्वक जे सिद्धान्त शोधून काढले ते यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिपादिले. ब्राह्मण व वेदपुराणादि ग्रंथांवर प्रखर हल्ला करून सबंध समाजरचनाच बदलून टाकण्याची दिशा यांनी दाखविली. ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘जातिभेदविवेकसार’, इशारा’, ‘शेतक-्याचा आसूड’ वैगे पुस्तकें यांनीं लिहिलीं आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍🏼 लेखन :- राहुल बोरसे – पाटील
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मुख्यसंपादक