Homeघडामोडीत्या दोन्ही घटनांचा परिवर्तनवादी पक्ष,संघटनेच्या वतीने निषेध

त्या दोन्ही घटनांचा परिवर्तनवादी पक्ष,संघटनेच्या वतीने निषेध

आजरा(हसन तकीलदार):-भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याची केलेली कृती तसेच सोनम वांगचूक या अभियंता, शास्त्रज्ञ आणि लडाख मधील सामाजिक व शैक्षणिक चळवळीचे संस्थापक यांना केलेली अटक या घटना निषेधार्थ असून सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकणाऱ्या या व्यक्तिवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून तातडीने अटक करावी आणि सोनम वांगचूक यांना केलेली अटक ही चुकीची असून त्यांची तात्काळ सुटका करावी अशा मागणीचे निवेदन परिवर्तनवादी पक्ष, संघटना, आजरा यांचेमार्फत आजरा तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपिठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरु असताना वकील राकेश किशोर याने पिठाच्या दिशेने बूट फेकला. सुरक्षा रक्षक त्याला पकडून घेऊन जात असताना त्याने “सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्तान “अशी घोषणाही दिली. हा देश भारतीय संविधानाच्या पायावर उभा असून धर्मनिरपेक्षता हे त्यातील महत्वाचा गाभा आहे. खरेतर हा केवळ सरन्यायाधीश असलेल्या व्यक्तीचा अपमान नसून तो भारतीय संविधान, न्यायव्यवस्था आणि लोकशाहीचा अपमान आहे. राकेश किशोर याची कृती अत्यंत निंदनीय असून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्याला कठोर शासन झाले पाहिजे.
याबरोबरच लडाख मधील अभियंता आणि शास्त्रज्ञ असलेले सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीचे प्रणेते सोनम वांगचूक यांना देशद्रोही ठरवून केलेली अटक ही लोकशाहविरोधी आहे. सोनम वांगचूक यांचा इतिहास पहिला असता त्यांनी केलेले कार्य हे प्रत्येक भरतीयाला अभिमान वाटावे असेच आहे. विविध भाषिक समूहातून आलेल्या मुलांसाठी प्रमाणभाषा ही शिक्षणातील अडसर ठरते. हे ओळखून त्यांनी भाषा, शिक्षण आणि संस्कृतीच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन करून लडाखमध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळ उभी केली. त्यांनी देशाला दिलेले योगदान अतुलनीय आहे आणि अशा व्यक्तीला अटक करणे ही घटना लोकशाही विरोधी आहे तसेच कायदा धाब्यावर बसवणारी आहे आणि एक प्रकारची हुकूमशाहीच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आज देशातील परिस्थिती पाहता देशात सरकारला प्रश्न विचारणाऱ्या, चुकीच्या निर्णयावर आवाज उठवणाऱ्या व्यक्तींचा, संघटनांचा आवाज सत्तेच्या आधारे दडपला जात आहे. त्यांना अर्बन नक्षल किंवा देशद्रोही ठरवून अटक केली जात आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांचा निषेध करीत राकेश किशोरला तात्काळ अटक व्हावी आणि सोनम वांगचूक यांची ताबडतोब सुटका व्हावी अशा मागणीचे निवेदन आजरा तहसीलदार यांना परिवर्तनवादी पक्ष, संघटना यांचेमार्फत देण्यात आले आहे.
निवेदनावर कॉ. संपत देसाई, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, कॉ. शांताराम पाटील, कॉ. संजय घाटगे, प्रकाश मोरूस्कर, काशिनाथ मोरे, दशरथ घुरे, नारायण भडांगे आदींच्या सह्या आहेत.

📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

युट्युब लिंक 👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=8CVnKR338XXteBA3

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular