आजरा (अमित गुरव ) : आजरा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड मंगळवारी पंचायत समिती सभागृहात पार पडली. या निवडीत सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या जयश्री गाडे (भादवण) तर उपसभापतीपदी शिवसेना (ठाकरे गट) यांच्या यशोदा पोवार (देऊळवाडी) यांची बिनविरोध निवड झाली.
निवड सभेचे अध्यक्षस्थान तहसीलदार समीर माने यांनी भूषवले. यावेळी गटविकास अधिकारी सुभाष सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई व शिरीष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड
सभापती पदासाठी जयश्री गाडे यांचा तर उपसभापती पदासाठी यशोदा पोवार यांचा प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला. दोन्ही पदांसाठी अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार समीर माने यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली.
विकासकामांना गती देण्याचे आवाहन
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई यांनी शासनाच्या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर असल्याचे सांगितले. पंचायत समितीवर मागील चार वर्षांपासून प्रशासक असल्यामुळे विकासकामांवर काही मर्यादा आल्या होत्या. आता त्या मर्यादा दूर करून विकासकामांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई यांनी सर्व सदस्यांनी एकत्रितपणे काम करत आजरा तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. तसेच महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंदे यांनी पंचायत समितीत विकासकामांना गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्याने काम करण्याची गरज व्यक्त केली. चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, मात्र चुकीच्या कामांना विरोध करण्यात मागे हटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई, माजी सभापती वसंतराव धुरे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, कारखाना संचालक दीपक देसाई, अशोक तर्डेकर, रचना होलम, दिवंगर देसाई, गोविंद पाटील, शिवाजी नांदवडेकर, संजय गाडे, युवराज पोवार, संजय येजरे, राजू होलम, वसंत कोंडुसकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेचा विश्वास संपादन करण्याचा निर्धार
नवनिर्वाचित सभापती जयश्री गाडे आणि उपसभापती यशोदा पोवार यांनी आपल्या मनोगतातून जनतेचा विश्वास संपादन करत आजरा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

भादवण गावात गाडे घराण्याचा राजकीय प्रभाव
दरम्यान, भादवण गावात गाडे घराण्याचा राजकीय प्रभाव अधिक दृढ झाल्याची चर्चा सुरू आहे. गावातील राजकीय विरोधक असले तरी सरपंच पदावरही गाडे कुटुंबाचा प्रतिनिधी असून आता आजरा पंचायत समितीच्या सभापतीपदीही गाडे यांची निवड झाल्याने गावात गाडे कुटुंबाची राजकीय पकड अधिक मजबूत झाली आहे.
भादवण गावातून पहिल्यांदाच पंचायत समिती सभापतीपदाची संधी मिळाल्याने गावासाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. तसेच गावात महिला नेतृत्व पुढे येत असल्याने हा योगायोग भादवणच्या जनतेच्या विकासासाठी सकारात्मक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
युट्युब लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=SdVUmcT_1JcFWWGb

मुख्यसंपादक



