Homeघडामोडीमिरजगाव येथील श्रमदानप्रेमींनी सलग शंभर दिवस श्रमदान करून आदर्श उभा केला.

मिरजगाव येथील श्रमदानप्रेमींनी सलग शंभर दिवस श्रमदान करून आदर्श उभा केला.


आज संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान वृक्षारोपण अभियान राबविले जात आहे. भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘क्लीन इंडिया ग्रीन इंडिया’ नारा दिला आहे. दरवर्षी ही मोहीम सुरूच आहे. संत गाडगेबाबा , महात्मा गांधी यांनी समाजाला स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. संत गाडगेबाबा यांनी तर स्वच्छता हाच परमेश्वर मानला. हाती खराटा घेऊन गावेची गावे स्वच्छ केली. त्याचबरोबर लोकांना चांगले विचार देऊन मनातील घाण साफ केली. त्यांनी आयुष्यभर कीर्तन, प्रवचन, भजन यातून स्वच्छतेचा प्रचार प्रसार केला. तरीही आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षात पाहिजे तशी प्रगती झाली नाही. दरवर्षी स्वच्छतेचा नारा दिला जातो. दरवर्षी गांधी जयंती, संत गाडगेबाबा जयंतीला श्रमदान, स्वच्छता राबविले जाते. झाडे लावा झाडे जगवा संदेश दिला जातो . यासाठी लाखो करोडो रुपये खर्च केला जातो. मोठे कार्यक्रम पार पाडले जातात. कार्यक्रमाला गर्दीही जमते. परंतु बरचसे कार्यक्रमात झाडे लावताना स्वच्छता करताना फक्त फोटो काढले जातात. हे फोटोसाठी असलेले कार्यक्रम कधी स्वच्छ भारत सुंदर भारत करणार ?.
आज समाजात घोषणांची नाही तर कृतीची गरज आहे. तेव्हाच बदल शक्य आहे. हे करून दाखविले आहे मिरजगाव शहरातील श्रमदान प्रेमींनी . सलग 100 दिवस श्रमदान करून सगळ्यांपुढे आदर्श उभा केला आहे . मिरजगाव तसे अस्वच्छ गाव म्हणून ओळखले जात होते. गावात गल्लीगल्लीत कचरा फेकलेला , सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक , बाटल्या, मावा तंबाखू गुटखा खाऊन थुंकलेले असते. सगळीकडे घाणीचे साम्राज्य होते. गावातील अनेकांना हे पहावत नव्हते. माझे गाव मिरजगाव स्वच्छ सुंदर व्हावे असे प्रत्येकाला वाटत होते. पण हे कसे करायचे? कुठून करायचे ?कोणी करायचे ? असे अनेक प्रश्न मनात होते. आपले तालुक्याचे ठिकाण असणारे कर्जत शहर स्वच्छ सुंदर हरित झाले. कर्जतने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी बाजार पेठ म्हणून मिरजगावची ओळख आहे. मिरजगाव सुद्धा स्वच्छ सुंदर व्हावे . असे वाटणे स्वाभाविक होते.
गावातील मेडिकल असोसिएशन संघटना यांनी आपल्या गावात स्वच्छतेचे काम करू असे ठरवले. असोसिएशनचे अध्यक्ष श्री.सोमनाथ साबळे यांनी पुढाकार घेतला. एक दिवस कर्जत येथे श्रमदान करणारी टीम मिरजगाव मध्ये आली आणि या शुभ कार्याचा श्री गणेशा झाला. आठ दिवसातून एकदा श्रमदान करण्याचे ठरले, परंतु माणसं जोडत गेली आणि बघता बघता सलग श्रमदानाचे शंभर दिवस झाले. या शंभर दिवसात स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले. गावातील सार्वजनिक ठिकाणे ही घाणीचे केंद्र बनले होते . ते स्वच्छ करण्यात आले. मंदिर परिसर, गावातील आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव, भारत विद्यालय, गावाची ऐतिहासिक वेस, जुनी विहीर, फिरंगाई देवी परिसर , नूतन शाळेसमोरील सभागृह, फुले शाहू आंबेडकर सांस्कृतिक सभागृह परिसर, सध्या गावाच्या स्मशानभूमीत स्वच्छतेचे वृक्षारोपणाचे कार्य चालू आहे.
१०० व्या दिवसाचे औचित्य साधून स्मशानभूमीत १०० झाडे लावली आहेत .
१०० व्या दिवशी वृक्षारोपण व गावात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , अधिकारी,पदाधिकारी,उद्योजक , शाळा कॉलेजचे शिक्षक ,विद्यार्थी , वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी व ज्यांनी सलग १०० दिवस हे श्रमदानाचे कार्य केले अशी आमची श्रमदान टीम होती. अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पडला. शंभर दिवस पूर्ण झाल्याचा आनंद आणि कामाचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते. असे कार्य अखंड चालू ठेवण्याचा निर्धार सर्वांनी केला.
गावात माझी वसुंधरा अभियान सुरू आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत व श्रमदान संघटना मिळून गाव स्वच्छ सुंदर हरित होत आहे.
अतिशय स्तुत्य उपक्रम चालू आहे. या या श्रमदान संघटनेत अधिकारी पदाधिकारी उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी आहेत. या कामासाठी वेगवेगळे साहित्य लागते ते गावातील दानशूर मान्यवरांनी दिले आहे.
या कामामुळे गाव तर नक्कीच स्वच्छ सुंदर होईल. झाडे लावल्याने परिसर हिरवागार होईल. जसे निसर्ग जपला जाईल तसे गावाच्या वैभवात भर पडेल.
या कामामुळे गावचे तरुण, ग्रामस्थ ,राजकीय मंडळी यांच्यात एकीची भावना निर्माण झाली आहे. पक्ष संघटना, गट – तट ,विसरून सारे गावासाठी एकत्र येत आहेत.
स्वच्छतेची मशाल पेटली
स्वच्छ होत आहे मिरजगाव शहर
वृक्ष वाढवित आहेत शोभा
श्रमदानाचे कार्य चालू निरंतर ……
बघता बघता दिवस शंभर
नक्कीच होतील हजार
विश्वास आहे मनामनात
गाव होईल स्वच्छ सुंदर हिरवेगार ……
माझ्यासाठी देश काय करतो यापेक्षा मी या माझ्या मातृभूमीसाठी या देशासाठी काय करतो हे खूप महत्त्वाचे आहे. मी कचरा घाण करणार नाही. माझे घर अंगण परिसर स्वच्छ ठेवीन . इतरांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देईल. हे प्रत्येकाने ठरविले तर गावात स्वच्छता राहील. मिरजगावकरांनी जो विकासाचा, स्वच्छतेचा, एकीचा, नेकीचा आदर्श उभा केला आहे. याबद्दल सगळीकडे या कार्याचे कौतुक होत आहे. गावोगाव अशी कार्य उभे राहिले तर आपला देश स्वच्छ सुंदर होईल. असे प्रेरणा देण्याचे कार्य मिरजगाव करत आहे .

      शब्दांकन
   श्री. किसन आटोळे सर
    मिरजगाव तालुका कर्जत
    जिल्हा अहमदनगर 
   
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular