गांधींजींचे बोलणे- सलगी देणे
म.गांधींजींचे बोलणे- सलगी देणेही शाश्वतमूल्यांची जाणीव करून देणारे.म.गांधींच्या वागण्यामध्ये जसा साधेपणा होता,सहजता होती त्याप्रमाणे वक्तृत्वामध्येही एक साधेपणा होता सहजता होती. सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दांची निवड होती.तेथे शब्दफुलोरा नव्हता ,नव्हता डामडौलही ! कोणताही अभिनिवेशही नव्हता… होता एक ठामपणा ! त्यामध्ये सत्य होते, कळकळ होती.त्यामुळे त्यांचे वक्तृत्व हा लोकांच्या विश्वासाचा विषय ठरला होता.गांधीजींचं वक्तृत्व म्हणजे सामान्य लोकांशी साधलेला सुसंवाद होता, मारलेल्या गप्पा होत्या, केलेल्या गुजगोष्टी होत्या आणि या सर्वबाबी जणू भारतभूमीच्या चरणी अर्पण केलेल्या होत्या.
त्यांच्या भाषणात भारतवर्षातील छोटे-मोठे विषय ,सर्वसामान्यांची दुःख होती.अतिशय ठामपणे अतिव आपुलकीने आणि सुह्रदयतने आपले म्हणणे ते मांडत .
*गांधींचे प्रभावी शब्द व त्यामागील त्यांची तळमळ , आपुलकी लोकांची मने हेलावून सोडी. त्यांच्या भाषणाने लोक विलक्षण प्रभावित होत,ते त्यांच्याजवळ मोठे वक्तृत्व होते म्हणून नव्हे !अगदी मृदू, सौम्य आवाजात ते बोलत.त्यात आवेश नसे पण एक साधेपणा होता, सत्य होते. लोकांना ते भावे. ते लोकांशी आपुलकीने बोलत .लोकांना त्यांचे बोल ,आपलीच भाषा वाटे. समुदायातील प्रत्येक व्यक्तीचा गांधींच्या शब्दावर विश्वास असे, गांधीजींचा प्रत्येक शब्द लोकांच्या हृदयाला जाऊन भिडे !*
‘गांधीजींचा आवाज मृदू व सौम्य होता परंतु त्यात पोलादाचे सामर्थ्य होते. त्यांच्या शब्दांमुळे आम्ही रोमांचित होत असू ,अशी ग्वाही गांधींच्या शब्दातील जादू विषयी पंडित नेहरूंनी दिली आहे’
भारतीय संस्कृतीतील ऋषीतुल्य वारसा
गांधींची उज्ज्वल विचारसरणी, एखाद्या सामान्य गरीब शेतकऱ्यासारखी त्यांची राहणी ,सर्व सुखाचा त्याग केलेले साधुसंतासारखे त्यांचे जीवन वैरागी, गोरगरीब बद्दल त्यांना वाटत असेल असलेली कणव आणि गोड वाणी ,सारे अद्भूत होते.संताप्रमाणे लोकांच्या कल्याणाबद्दल त्यांची असलेली सततची धडपड व आपल्या कृतीमध्ये आणि शब्दांमध्ये असलेले एकत्व यामुळे गांधीजींचे बोलणे सर्वसामान्यांच्या हृदयाला जाऊन भिडे. गांधीजी सर्वसामान्यांची भाषा बोलत. सर्वसामान्यांची दुःख आपल्या भाषेतून व्यक्त करत. एखादी कृती. राजकीय संत आणि लोकनेता गांधीच्या कडे एखादं आंदोलनाचं नेमकं नियोजन असे आणि त्यांना समुदायाकडून काय करून घ्यायचं याचेही पक्के नियोजनही महात्मा गांधींच्याकडे असे ! त्यामुळे आपल्या नेमक्या शब्दांनी योग्य स्फूर्ती ते जनसामान्यांना देत आणि योग्य तो परिणाम घडून येई.’करेंगे या मरेंगे ‘ या एकाच शब्दाने सारा देश १९४२ च्या चलेजाव आंदोलनात पेटून उठला होता ! अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचा अधिकार गांधींनी आपल्या कृतीने मिळवला होता . त्यांच्या शब्दाने चैतन्य दाटे, अनेकांना स्फूर्ती देण्याची ताकद त्यात होती.त्यांचा तो शब्द ,कोणी खाली पडू देत नव्हते
म गांधी लोकांना त्यांच्या हक्काबद्दल, अधिकाराबद्दल अचूक जागं करतात.त्यांना स्वच्छतेचे धडे देतात, त्यांना शिक्षण देतात. लोकांची आपल्या हक्काबद्दल जागृत होते.आपल्या हक्कासाठी लढा गांधी शिकवतो आणि स्वतःही त्या लढ्यात सामील होतो. जनतेच्या न्याय हक्कासाठी, स्वतःचा प्राणही पणाला लावतो. जनतेलाही हे सारे अभूतपूर्व होतं .*गांधींच्या कृतिशील वागण्याने, अभिनव प्रयोगाने, सारा भारत जणू अभिमंत्रित होतच राहिला.
अखिल भारतीय नेते
महात्मा गांधी आधुनिक काळातील पहिले अखिल भारतीय नेते असावेत.आत्ताचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश , म्यानमार असा सारा भाग त्यांच्या नेतृत्व आणि प्रभावाने व्यापला होता.महात्मा गांधी सर्वांना जवळचे वाटले याचे आणखी एक कारण गांधीजींची सर्वसमावेशकता.भारतासारखा अवाढव्य देश एका तत्वरेषेत आला महात्मा गांधींच्या सर्वसमावेशकतेनेच. म गांधींच्या कार्यामध्ये कुठेही अभिनिवेश नव्हता , जाहिराती थाट नाही, गांधींच्या कामात आहे साधेपणा, सत्य , सर्वंकष सातत्य सहिष्णुता, संयम ,समतोलसंवर्धन, सर्वसमावेशकता. गुणांमध्ये दांभिकतेचा अंश नाही. अनेक धर्मांचा म गांधींचा अभ्यास आहे आणि विचारसरणी ही धर्मातीत आहे .भारत वर्षात जणू गुलामीची परंपरा इंग्रजांपर्यंत होती पण गांधींच्या मनात निर्भयता होती गुलामगिरी, परंपरा मोडण्याची इच्छाशक्ती होती .छोट्या-मोठ्या अनेक गोष्टीचा ,धार्मिक कर्मकांडी गोष्टींचा अवलंब करून, परंपरेचा हवाला देऊन कितीतरी प्रकारची भीती भारतीय लोकांमध्ये रुजलेली. पण महात्मा गांधी परंपरांना सन्मार्ग देतात .परंपरेच्या जागी उत्तम मार्ग दाखवतात. ती वाट कशी चालायची हे दाखवतात आणि त्यात सतत सुधारणा करतात.परंपरेचे आंधळे अनुकरण गांधीजींना नको होतं .जुन्यातील सोनं जरूर घ्यावे पण त्या सोन्यासाठी वर्तमानातील सोन्यासारखे जीव तोशीस लावू नये हीच गांधींची भावना असावी.
म.गांधी म्हणतात, ‘ पूर्वजांचे परंपरेचा अभिमान जरूर बाळगा पण परंपरेचे आदर्श घेऊन वाहत जाऊ नका. इतिहासातील आदर्श वेगळे, आजचा दिवस वेगळा ,तत्व वेगळी. त्याचा अभ्यास करा, त्यांचा आदर्श घेऊन स्वतः कार्यक्रम आखा,स्वतःची ओळख तयार करा .स्वतःचा इतिहास तयार करा आपल्या पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण करा. ‘
युपीएसी एमपीएसी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या
काही होतकरुकडे मी गांधीजींचे फोटो पाहिजे. मी त्यांना विचारलं की, ” आपण गांधीजींचे फोटो बरोबर का ठेवता? ” त्यातल्या दोघांची उत्तर अशी होती .एक म्हटला *गांधीजी आम्हाला शिकवतात, कमीत कमी वस्तू वापरून आपलं आयुष्य समृद्ध कसे करायचे. साहित्याचा अवडंबर न करता जीवन कसं जगायचं.!* दुसरा म्हणाला आपल्या मिनिटामिनिटाचे नियोजन कसं करायचं, हे मी म गांधींच्याकडून शिकलो. स्पर्धा परीक्षा ही जीवघेणी स्पर्धा आहे यातील मिनिटामिनिटाला महत्व आहे आणि नियोजनाच्या दृष्टीने महात्मा गांधी हे सर्वोच्च आदर्श असावेत
नित्य वळणावरचा गांधी
म.गांधीजींच्या कामाचा व्याप एवढा मोठा , त्यांचे अवकाश एवढं मोठं, कित्येक विषयांना स्पर्श केलेलं ! जीवनातील अनेक बाबींचा अनुभव घेताना त्याच्या कडेला कुठेतरी आपल्याला म गांधी भेटतातच ! गांधीजींचे हे मोठेपण आहे ,ज्या क्षेत्रात गांधीजीनी आपलं काम हाती घेतलं त्या -त्या क्षेत्रात गांधीजींनी आपल्या कामाची स्वतःची पद्धती विकसित केली आणि त्यामुळे त्या कामाला गांधींचा एक मिडास टच राहिला आहे.
म गांधींचे सर्वव्यापीत्व, महानत्व अभ्यासूंना , जागतिक स्थरावरील मेंडेला , बराक ओबामा ,मार्टीन ल्यूथर किंग इ. ना जाणवते एवढे ते विशाल, अवाढव्य, सर्वस्पर्शी !.
गांधींच्या चळवळीची नुसता व्याप्ती पहा ! किती मुद्दे जीवनस्पर्शी आहेत ! एखादा मुद्दा घेऊन जमावाची डोकं फिरवायची अशी भावना नाही. एकच एक मुद्दा घेऊन झेंडा नाचवायचा अशी प्रवृत्ती नाही. चळवळीचे मुद्दे मानवी जीवनाशी कशी निगडी करता येतील, चळवळीचे महत्त्व प्रत्येक माणसापर्यंत कसे जाईल, आपल्या विचारांशी समोरच्या माणसाच्या विचाराशी समरस कसे होतील .आपल्या मार्गाने इतरांच्या हृदयाच्या तारा कशा छेडल्या जातील, ह्यासाठीच गांधीजींचे योगदान चिरंतन आहे ,जगभरच्या लोकांना नेहमीच आदरणीय राहिले आहे. आधी केले मग सांगितले हे गांधींचे आचारपद्धती साधी राहणी, उच्च विचार उपभोगशून्य नेता, जनतेसाठी सर्वस्व देणारा नेता या आणि भूमिकेतून गांधीजी करोडोंभारतीयांच्या मनात आणि जगभरातील तत्वचिंतकाच्या, नेत्यांच्या, समाजसुधारकांच्या, संत – महात्म्यांच्या मनात रुतून बसले आहेत.जयहिंद !
राजेंद्र गुरव.
मुख्यसंपादक