HomeघडामोडीRajshree Shahu Maharaj : राजर्षी शाहू महाराजांसाठी कोल्हापूर 100 सेकंद स्तब्ध राहील,...

Rajshree Shahu Maharaj : राजर्षी शाहू महाराजांसाठी कोल्हापूर 100 सेकंद स्तब्ध राहील, लोक जिथे असतील तिथे थांबतील.

Rajarshi Shahu Maharaj: राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर १०० सेकंद स्तब्ध होणार आहे. कोल्हापूरकर लाडक्या राजाला अनोखं अभिवादन करणार आहेत.

कोल्हापूर: लोकराजा राजर्षी शाहूंसाठी आज सकाळी दहा वाजता कोल्हापूर शंभर सेकंद स्तब्ध राहून आदरांजली वाहणार आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना १०१ व्या स्मृती दिनानिमित्त प्रत्येक कोल्हापूरकरानं आहे त्या ठिकाणी शंभर सेकंद स्तब्ध राहून अभिवादन करूया असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर देखील कोल्हापुरात दाखल झाले असून शाहू स्मृती समाधी स्थळावर ते अभिवादन करणार आहेत.

२०२२-२३ हे वर्ष लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता पर्व साजरी करण्यात येत आहे गेल्या वर्षभरात शाहू महाराजांचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. आता याची सांगता होत असून यासाठी विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्हा प्रशासनाने आज ६ ते दि. १४ मे या कालावधीत कृतज्ञता पर्वाचे आयोजन केले आहे, त्याचा प्रारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सकाळी सव्वादहा वाजता शाहू मिल येथे होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळावर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

यानंतर सकाळी दहा वाजता शंभर सेकंद उभे राहून राजर्षी शाहूंना अभिवादन केले जाणार आहे. सकाळी दहा वाजता जिथे कुठे असाल, त्या ठिकाणी शंभर सेकंद उभे राहून शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. यानंतर शाहू समाधी स्थळ येथे दहा हजार शाहू प्रतिमांचे वाटप केले जाणार आहे. शाहू स्मारकमध्ये सामाजिक न्याय परिषद होणार आहे. तर ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहे.

शाहू मिल येथे नऊ दिवस चालणाऱ्या कृतज्ञता पर्वाचे सकाळी सव्वादहा वाजता पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यानंतर शाहू मिल येथे सकाळी दहा ते रात्री दहा या कालावधीत दिवसभर तीन सत्रांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात कार्यशाळा, दुपारी मराठी चित्रपट, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

यासह नऊ दिवस शाहू मिल येथे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रसिद्ध वस्तू, विविध उत्पादने यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. यामध्ये गूळ, कापड, चप्पल, चांदी व सोन्याचे दागिने, माती व बांबूच्या वस्तू, घोंगडी, दुग्ध उत्पादने, खाद्यपदार्थ, तांदूळ, मिरची, मध, काजू, रेशीम, तृणधान्य व वन उत्पादनांसह आंबा महोत्सवही होणार आहे. याखेरीज जिल्ह्यातील पर्यटनस्थळांबद्दल माहिती देणारे, कोल्हापूरचा औद्योगिक, शिक्षण, आरोग्य, क्रीडा इत्यादी क्षेत्रांचा विकास दर्शविणारे व विविध शासकीय योजनांसंबंधी माहिती देणारी दालने नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहेत.

दरम्यान आज आहे त्या ठिकाणी शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करूया, शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे विचार आणि कार्य सर्वांपर्यंत पोहोचवूया. या उपक्रमात सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक, तरुण मंडळांचे प्रतिनिधी, बँकर्स, ग्राहक, बचत गटांचे सदस्य, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांनी या उपक्रम सहभागी व्हावे व इतरांनाही सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular