आजरा (हसन तकीलदार ):-आजरा -बुरुडे -महागाव रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य पसरले असून याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला तसेच काम करणाऱ्या कंपनीला भेटून संबंधित रस्त्याच्या व संताजी पुलाची दुरुस्तीची मागणी करुनसुद्धा आजपर्यंत दुरुस्ती झालेली नाही. यासाठी शिवसेना उबाठा तर्फे तहसीलदार, आजरा पोलीस स्टेशन आणि सर्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली आहे.

आजरा -बुरुडे -महागाव रस्त्यावर अक्षरशः खोल खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांच्या खोलीची वाहन चालकांना अंदाज येत नाही. रात्री अंधारात खड्डे चुकवणे अडचणीचे व घातकी झाले झाले आहे. या खडड्यांचे अंदाज न आल्याने दोन तीन दुचाकीस्वार पडून अपघातही झाले आहेत असे सांगण्यात येत आहे. शेवटी तेथील रहिवाश्यानी या खड्ड्यात चिरे उभे केले आहेत जेणेकरून वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज यावा. इतकी धोकादायक खड्डे पडूनसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला हे खड्डे दिसत नाहीत. वारंवार या विभागाला पुलाची व रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करुनसुद्धा याकडे सर्वांचेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे आणि उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली संबंधित रस्त्यावर व संताजी पुलावर दि. 30/05/2025 रोजी वृक्षारोपण आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे तात्काळ रस्त्याच्या दुरुस्तीबाबत लेखी आश्वासन मिळालेशिवाय हे आंदोलन थांबवले जाणार नाही असेही या निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदनावर तालुका प्रमुख युवराज पोवार, तालुका संघटक संजय येसादे, शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, उपतालुका प्रमुख शिवाजी आढाव, सुनील डोंगरे, उपशहर प्रमुख समीर चांद, वैषाली गुरव (सरपंच बुरुडे ), सुनील बागवे (उपसरपंच बुरुडे ), प्रमिला पाटील (उपसरपंच हत्तीवडे ), विलास जोशीलकर (सरपंच मेंढोली ), महेश पाटील, चंदर पाटील, दिनेश कांबळे, सुयश पाटील, गीता देसाई, संजय कांबळे आदींच्या सह्या आहेत.
लिंक मराठी व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून लिंक मराठी Live चे अपडेट पाहू शकता .
*Follow Us*
