कोल्हापूर (प्रतिनिधी) –
राज्यात केंद्र सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणाविरोधात संतापाची लाट उसळत असून, अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्षांकडून विरोध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक होत, आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदी सक्तीच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केलं. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. केंद्र सरकारचे हिंदी थोपवण्याचे धोरण महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात करणारे असून, मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनात शिवसेनेचे विशाल देवकुळे, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तर, रीमा देशपांडे, रिक्षा सेना जिल्हाप्रमुख राजू जाधव, तसेच रघुनाथ टिपुगडे, रणजित आयरेकर, बंडा लोंढे, अनिल पाटील, स्वरूप मांगले, सागर साळुंखे, सचिन मांगले, योगेंद्र माने, सुरेश कदम, रणधीर पाटील, प्रमोद डोंगरे, विक्की मोहिते, दिपाली शिंदे, पूनम फडदरे यांसारखे शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हिंदी सक्तीला विरोध करताना आंदोलनकर्त्यांनी “मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही”, “हिंदी सक्ती बंद करा”, अशा घोषणा देत परिसरात आंदोलनाच्या जोरदार लाट निर्माण केली.
शिवसेनेच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील मराठीप्रेमी नागरिकांमध्ये नवचेतना निर्माण झाली असून, यापुढेही हा लढा सुरूच राहणार असल्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

मुख्यसंपादक



