मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये चक्क परराज्यातील बोगस लाभार्थींचे रॅकेट समोर आले आहे. लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून बोगस लॉगिन आयडी तयार केले आणि त्याद्वारे चक्क ११७१ अर्ज दाखल केले. अर्ज दाखल केलेल्यांमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमधील रहिवासी दाखवले आहेत.
प्रत्यक्षात हे भामटे उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील असल्याचे पोलिस, महसूल आणि महिला व बालविकास विभागाच्या तपासात पुढे आले आहे. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ज्या दोन लॉगइनवरून ११७१ अर्ज दाखल झालेले आहेत, त्यापैकी २२ अर्ज हे एकट्या बार्शी तालुक्यातील आहेत. या अर्जदारांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे.
कसे आले उघडकीस?
अर्जांची छाननी करताना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका गावामध्ये मुस्मिम महिलांची नावे लाडकी बहीण योजनेत आढळली. प्रत्यक्षात त्या गावात एकही मुस्लिम नसल्याचे महिला व बालविकास विभागाच्या एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी आधार क्रमांकाशी लिंक असलेले बँक खाते तपासले, ते खाते सेंट्रल बँकेचे होते. त्यानुसार सेंट्रल बँकेतून संबंधित खातेदाराचा पत्ता आणि मोबाईल काढला असता ते चक्क उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, राजस्थान येथील असल्याचे आढळले.
सांगली, लातूरच्या नावाने बनवले लॉगीन आयडी
शासनाने योजना अंमलात आणताना www.ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन आयडीचा पर्याय दिला. येथे कुणीही आयडी तयार करून त्याआधारे अर्ज करू शकतो. एकदा तयार झालेल्या आयडीवरून स्वत:सह अन्य कितीही महिलांचे अर्ज त्या आयडीद्वारे करता येतात. याचाच गैरफायदा घेत उत्तर प्रदेशातील व्यक्तीने मुनमुन ठाकरे, अंगणवाडी वर्कर, हजारवाडी, ता. पलूस, जि. सांगली व अनवरा बेगम, अंगणवाडी वर्कर, बोरगाव बु., ता. जि. लातूर या नावाने, पत्त्याने आयडी बनवला. या दोन आयडींवरून तब्बल ११७१ अर्ज भरण्यात आले. प्रत्यक्षात लातूर आणि सांगली जिल्ह्यांतील या गावांमध्ये वरील नावाच्या अंगणवाडी वर्कर अस्तित्वातच नाहीत.
कागदपत्रे अस्पष्ट, आधार क्रमांकाच्या आधारे फसवणूक
ऑनलाईन अर्ज करताना आधार क्रमांक टाईप करून त्याखाली आधार कार्डची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागत होती. त्यानुसार आधार क्रमांक टाकल्यानंतर आधार कार्डची अस्पष्ट दिसणारी कॉपी त्यावर अपलोड केली. जेणेकरून प्रत्यक्ष ऑनलाईन कागदपत्रांची पडताळणी होईल, तेव्हा आधार कार्डवरील पत्ता दिसणार नाही, अशी ही शक्कल होती.
सर्वजण बाहेरील राज्यातील
याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आधारशी लिंक असलेले बँक खाते तपासले. त्या बँकांच्या स्थानिक शाखेत जाऊन संबंधित खात्यांना लिंक असलेले मोबाईल क्रमांक आणि पत्ते काढले. त्यात काही उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, राजस्थान येथील पत्ते आहेत. शिवाय ज्या आयडीवरून हे अर्ज भरले आहेत, ते देखील बाहेरील राज्यातीलच असल्याचे समोर आले आहे. यातील आरोपी निष्पन्न करून त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यसंपादक