(१) महात्मा गांधी यांची सत्यप्रिय व्यक्ती म्हणून जडणघडण कशी झाली हे सांगणारे “माझे सत्याचे प्रयोग” हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. सत्य व अहिंसा या दोन तत्वांवर महात्मा गांधी आयुष्यभर ठाम राहिले. त्यांच्या कालच्या लिखाणात व आजच्या लिखाणात विसंगती आढळली तर काल जे लिहिलेय ते विसरून जा व आज जे लिहिलेय ते खरे माना, असे ते म्हणायचे. अर्थात दररोज स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणण्याचा ते प्रयत्न करीत राहायचे. यालाच ते सत्याचे प्रयोग म्हणायचे.
(२) आता चांगले म्हणजे काय आणि वाईट म्हणजे काय? महात्मा गांधीना जे चांगले वाटत गेले ते खरोखरच १००% नैसर्गिक सत्य आहे काय? प्रत्येक मनुष्याला निसर्गाने विवेक बुद्धी दिली आहे. पण तरीही चांगले काय व वाईट काय याबाबतीत लोकांचे एकमत का होत नाही? याचे कारण म्हणजे सर्वांची भावनिक वृत्ती व सर्वांची विवेक बुद्धी सारखी नाही. हेच कारण असावे की महात्मा गांधीच्या हत्येला खून न म्हणता वध असे म्हणावे असा आग्रह धरीत या हिंसेचे समर्थन करणारी काही मंडळी आपल्याच समाजात आढळतात. महात्मा गांधी यांचा जन्म दिनांक २ अॉक्टोबर १८६९ रोजी झाला व दिनांक ३० जानेवारी १९४८ रोजी नथूराम गोडसे यांनी म. गांधी यांचा खून केला.
त्यांची अशी हिंसक हत्या केली म्हणून का त्यांचे महान विचार संपणार आहेत ?
(३) महात्मा गांधी यांचा खून झाला त्यावेळी त्यांच्या बँक खात्यात किती रक्कम शिल्लक होती? आजच्या राजकारणी लोकांना महात्मा गांधीसारखे असे स्वच्छ, तत्वनिष्ठ राजकारण झेपेल काय ? महात्मा गांधींचा फोटो भारतीय चलनाच्या नोटांवर आहे त्या नोटाच जास्तीत जास्त आपल्या खिशात कशा येतील हेच ध्येय मनात बाळगून भ्रष्टाचारी आचरणाची जराही तमा, लाज न बाळगणारे लोक महात्मा गांधी नावाच्या महात्म्याला नोटांच्या रूपात खिशात घेऊन फिरतील पण त्यांच्या आदर्शाला जवळ करणार नाहीत, हृदयात स्थान देणार नाहीत. गांधी जयंती दिवशी वरवर त्यांना अभिवादन करतील पण त्यांचे आदर्श लांब ठेवतील कारण ते त्यांना झेपूच शकणार नाहीत.
(४) पुढील अनेक पिढ्या या सत्यावर कदाचित विश्वास ठेवणार नाहीत की महात्मा गांधीरूपी हाडामांसाचा माणूस या पृथ्वीतलावर चालत होता, बोलत होता, हे वाक्य कोणी म्हटले तर प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईंस्टीन यांनी. एवढा महान शास्त्रज्ञ महात्मा गांधीविषयी हे असे वाक्य उच्चारतो यातच खूप काही आले. त्या काळात जवळजवळ संपूर्ण जगावर साम्राज्य प्रस्थापित केलेली ब्रिटिश सत्ता महात्मा गांधी यांच्या अहिंसक स्वातंत्र्य चळवळीपुढे नमली की सुभाषचंद्र बोस यांच्या लष्करी क्रांतीपुढे व भगतसिंग व इतर क्रांतिकारकांच्या हिंसक चळवळीपुढे नमली हा वादाचा विषय आहे. पण दोन्ही पद्धतीने उठाव झाला तेंव्हाच ब्रिटिश लोकांना आपले आता भारतात काही खरे नाही हे कळून चुकले हे मान्य करावे लागेल. स्वातंत्र्य चळवळीत जहाल व मवाळ असे दोन्ही गट होते हे तर सर्वांना माहीतच आहे. पण तरीही म. गांधी यांची अहिंसक चळवळ ही अद्वितीय होती यावर कोणाचेही दुमत होण्याचे कारण नाही. भारत पाकिस्तान फाळणी ही शोकांतिका व आपत्ती होती जिचे शिल्पकार होण्याचे पातक महात्मा गांधीना पाण्यात बघणाऱ्या बॕ. जिना यांच्याकडे जाते हे वाक्य न्या.एम.सी.छागला यांनी त्यांच्या रोजेस इन डिसेंबर या आत्मचरित्रपर पुस्तकात पान क्रमांक ७९ व ८० वर लिहिलेले आहे. यातून फाळणीला कोण जबाबदार होते हे लक्षात घ्यावे.
(५) महात्मा गांधी म्हणाले की ट्रूथ इज गॉड म्हणजे सत्य हाच ईश्वर! त्यांच्या या वाक्यात खूप सखोल वैज्ञानिक अर्थ दडलेला आहे. म. गांधी म्हणतात त्याप्रमाणे संपूर्ण विश्व हे सत्याने भरलेले आहे. विश्व म्हणजेच निसर्ग! देवाची करणी आणि नारळात पाणी या म्हणीचा अर्थ हाच की नारळ हे विश्व किंवा निसर्गाचे प्रतीक होय आणि त्यातील पाणी हे विश्वातील किंवा निसर्गातील सत्य ईश्वराचे प्रतीक होय! याच अर्थाने मी निसर्गाला देव म्हणतो व निसर्गाच्या विज्ञानाला धर्म म्हणतो. निसर्ग सत्य आहे व त्याचे विज्ञान हेही सत्य आहे. सत्य निसर्गातील सत्य ईश्वर कसा आहे तर तो निसर्गाप्रमाणेच आहे. निसर्गाचे नैसर्गिक सत्य हाच ईश्वर आहे हे एकदा का मनात ठामपणे पक्के केले की मग देवाविषयीच्या अंधश्रध्दा आपोआप दूर होतात. या अर्थाने ईश्वरावर श्रध्दा असणाऱ्या महात्मा गांधी यांचा ईश्वराविषयीचा दृष्टिकोन हा पूर्ण वैज्ञानिक होता हे मान्य करावेच लागेल.
(६) महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात काही मतभेद होते. दोन्हीही महान व्यक्तीमत्वे त्यामुळे संघर्षही तेवढाच तीव्र झाला व त्यातून पुणे करार साकार झाला. पण केवळ या मतभेदांमुळे महात्मा गांधी यांची महानता बिलकुल कमी होत नाही. अशा या महात्म्यास माझे आज २ अॉक्टोबर गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
- ॲड.बी.एस.मोरे©

मुख्यसंपादक
धन्यवाद संपादक श्री. अमित गुरवजी
Sir, tumache lekhan mi nehami vachte . tumche baki lekha pramane ha sudha khup info. deto . tumhi mahila kaydevishyak lekh post karu shakta kay. jyamule azyasarkya mahilana GK milel .