Homeमुक्त- व्यासपीठआणि वाढला आंब्यांचा गोडवा …

आणि वाढला आंब्यांचा गोडवा …


   सकाळचे दहा वाजले की पोरांची शाळेला जायची गडबड सुरू व्हायची. पण मी मात्र कुठेतरी दडून बसायच्या नादात ! गल्लीतली सगळी पोरं शाळेला गेली की हळूच येऊन परड्यात खेळायला जायचो. ताई मला सगळीकडे हुडकायची आणि शाळेत गेलो आहे असे समजून स्वतःच्या कामाला लागायची. पप्पा दुपारी कामावरून घरी यायचे. हातपाय धुवून ताईला पहिला प्रश्न विचारायचे ," पोरगं शाळेला गेलं का नाही ?"

“कधीच गेलाय तो “, ताई सांगायची.

मी दोन वाजेपर्यंतचा वेळ नुसता खेळून घालवायचो. मग हळूच येऊन घरात भातआमटी खायचो आणि परत खेळायला जायचो. पाच वाजता सगळ्या पोरांबरोबर परत ऐटीत घरात यायचो.रोज असच चालायचं.काही दिवसांनी ताईलाही कळून चुकलं की पोरगं शाळेला जात नाही.

त्यानंतर मात्र ती दहा वाजताच माझे हातपाय धुऊन , मला कपडे घालून शाळेला पाठवायच्या नादाला लागायची. पण शाळेला जायचं म्हटलं की माझ्या अंगावर काटा यायचा . मी रडायचो. कितीतरी दिवस हे असंच चालू होतं. 

 एक दिवस दहा वाजता शेजारचे कुंडलिक मामा ड्युटीवर निघाले होते. त्याचवेळी ताईचा मला शाळेकडे पाठविण्यासाठी आटापिटा सुरू असलेला त्यांनी पहिला.दारातूनच ताईला हाक मारत विचारले, " काय झालं वहिनी? शाळेला जायला नाही म्हणतोय का ह्यो ! थांबा जरा हा ."

त्यांच्या सायकलच्या कॅरियरला नेहमी दोरी बांधलेली असायची. सायकल स्टॅण्डवर लावून ते पुढे आले.मला पकडून सायकलजवळ नेले. दोरीने माझे दोन्ही हात कॅरियरला बांधले.”शाळेला येतोस का नाही ?” असं विचारत मला पाठीमागून ओढत नेऊ लागले.कसायच्या मागे नाईलाजाने फरफटणाऱ्या कोकरागत माझी अवस्था झाली. शाळा महादेवाच्या देवळात भरायची. रडत रडतच शाळेजवळ आलो. पण माझं आक्रंदन कुणीच ऐकलं नाही.मामांनी मला वर्गात नेला. वर्गशिक्षिका सुमनबाई आल्या होत्या. मामानी त्यांना बजावून सांगितले,” घरात लपून बसतो ,बोंबलत फिरतो, खेळतो.याला पाच वाजेपर्यंत घराकडे सोडू नका.” हे सांगतानाच हळूच स्वतःच्या खिशातील दहा पैसे काढून बाईंच्या हातात दिले.” नंतर त्याला खायला काय तर द्या,” असं सांगून ते निघून गेले.

http://linkmarathi.com/स्वतःच्या-व्यवसायाचा-ब्र/

त्यांनी बाईंना सांगितलेलं याला शाळेतून सोडायचा नाही, एवढेच वाक्य माझ्या लक्षात राहिले.अकरा वाजले. घंटा झाली. प्रार्थना सुरू झाली.

‘ ज्ञान पंढरीचे आम्ही वारकरी.. श्रद्धेची पताका घेऊ खांद्यावरी’ ! ही प्रार्थना तालासुरात झाली. मुलं बाहेर जाऊन आली.

सुमनबाईंनी मला बोलवून घेतलं. मायेन डोईवर हात फिरवला. अंजारलं गोंजारलं, " रडायचं नाही . शाळेत बसायचं बाळा! " असं सांगून त्यांनी पाच पैशाचे आंबा चॉकलेट खायला दिले.

” मला रोज खायला देणार का बाई ?” असा भाबडा प्रश्न विचारत म्हणालो, “मग मी रोज शाळेला येईन बाई !”

” होय . नक्की देईन . ” असं सांगून बाई म्हणाल्या ,” ह्या आंब्याचं झाड लाव परसात. घरातच आंबे खायला मिळतील.”

मी तेवढेच मनात धरून बसलो.नंतर बाईंनी आणखी एक आंबा दिला. मी दोन्हीच्या दोन्ही आंबे चोखून खाल्ले. त्यांच्या दांड्यांची प्लास्टिकची दोन पाने तशीच खिशात ठेवली.

शाळेतून पाच वाजता घरी परतलो. आल्याबरोबर खिशात हात गेला. प्लास्टिकच्या पानांच्या काड्या हातात आल्या. परड्यात गेलो . हे प्लास्टिकची पाने मी खड्डा काढून मातीत लावली. पाणी घातले. हात पाय धुऊन घरात आलो. संध्याकाळी परत जाऊन त्यांना पाणी घातलं. 

दुसऱ्या दिवशी कुंडलिकमामा यायच्या आधीच आवरून तयार झालो. ते दारात थांबण्यापूर्वीच त्यांच्या सायकलबरोबर चालायला लागलो. शाळेत पोहोचताच

मामांनी मला आजही पाच पैसे दिले.त्याचा मी आंबा घेतला.चोखून खाल्ला . प्लास्टिकची पाने तशीच खिशात ठेवली. पुन्हा त्या दिवशी शाळेतून परत आल्यावर मी त्या आंब्याचं पान पुरले. पाणी घातले. खेळायला गेलो.

http://linkmarathi.com/नशा-व्यसन-drugs/
 बाई छान छान शिकवत होत्या. गाणी, गप्पा, गोष्टी, खेळ, अभ्यास यात मी रंगत होतो. मला मनापासून शाळेचा लळा लागला होता. त्यामुळे नंतर नंतर मी कोणत्याही आमिषाशिवाय शाळेला जायला लागलो. 

आंब्यासाठी मात्र हट्ट करायचो. ताईकडून पाच- दहा पैसे घ्यायचो. आंबा चोखून प्लास्टिकची पाने मात्र नित्यनेमाने आणत होतो. ती खड्ड्यात पुरून पाणी घालत होतो. असं खूप दिवस चालले; पण आंब्याचे रोप काही वाढताना दिसत नव्हते.

दिवाळीची सुट्टी सुरू झाली. तसं एक दिवस मी ताईला विचारलं,”ताई, मी आंब्याची एवढी झाडं लावल्यात, पण आंब्याचे एकसुद्धा झाड वाढलेलं नाही. काय करू ग मी ?”

तशी ताईने माझी समजूत घातली. “यापुढे वाढतील तुझी आंब्याची रोपे.उन्हाळ्याच्या सुट्टीपातुर आंबे पण लागतील. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे जा. आंबा खाऊन ये.” दिवाळीच्या सुट्टीसाठी आजोळी गेलो. खूप धमाल केली. मामे भावंडांना , मित्रांना माझ्या आंब्यांच्या झाडांबद्दल सांगितले.

दिवाळीची सुट्टी संपवून परत गावाला आलो. खाल्ला आंबा की लाव झाड , असा माझा नित्यक्रम पुन्हा सुरू झाला.

http://linkmarathi.com/क्रिमरोल/

कित्येक दिवस असेच गेले . हळूहळू चांगली दोन हातापेक्षा जास्त जागा त्या आंब्याच्या देठानी माखून गेली. प्रत्येक झाडाला पाणी जाईल, अशी व्यवस्था मी केली. रोज पाणी घालायचं,पण आंब्याचे एकही झाड वाढताना दिसले नाही. आंब्याची झाडं वाढायची आशा मावळू लागली,परंतु शाळेला दररोज जायचं, ही माझी प्रबळ मानसिकता मात्र तयार झाली. आंब्याला शेवटपर्यंत आंबे लागलेच नाहीत, पण मी माझ्या मनात मात्र आंब्याच्या गोडी इतकीच शाळेची गोडी निर्माण झाली. जमिनीत न वाढलेल्या आंब्यांच्या रोपांची वाढ… माझ्या मनात मात्र चांगलीच वाढली…..

 • अविनाश अर्जुन चौगुले
 • पन्हाळा , कोल्हापूर
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular