Homeघडामोडीवायंगणी समुद्रकिनारा ऑलिव्ह रिडले कासव महोत्सव

वायंगणी समुद्रकिनारा ऑलिव्ह रिडले कासव महोत्सव

पहाटेची वेळ आणि फेब्रुवारी महिना टाटा बायबाय करत आला होता. हिवाळा जाऊन उन्हाळ्याच्या सुरुवातीचा काळ. पण कोकण किनाऱ्यावरील या निवांत गावामध्ये अजूनही थंडावा आसमंतात दरवळतच होता. सकाळची वेळ असली तरीही अनेक गाड्या पार्क झालेल्या दिसल्या. काहीजण टॉर्च घेऊन लगबगीने किनाऱ्याकडे निघालेले दिसले. लोकांनी गर्दी केलेली दिसली. वायंगणी समुद्रकिनारा – वायंगणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे.ऑलिव्ह रिडले कासव यांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेला वायंगणी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी आता आकर्षक ठरत आहे वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कुडाळ कासव जत्रेच्या निमित्ताने वायंगणी गाव सहयोगातून हे सुंदर चित्र आपणास पाहण्यास येत आहे अनुभवण्यास येत आहे. वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी संरक्षित केलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या पिल्लांची सिंधुदुर्गात या हंगामातील पहिलीच बॅच गुरुवारी घरट्यातून बाहेर आली. या सर्व पिल्लांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या व स्थानिकांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले दुर्मीळ कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली असल्याने ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना पाहण्याची पर्यटकांना पर्वणी असणार आहे. तालुक्यातील वायंगणी सुरक्षित समुद्र किनाऱ्यावर समुद्री कासव प्रजनन काळात अंडी लावण्यासाठी किनाऱ्यावर येतात. ही अंडी कासवमित्र सुरक्षित ठिकाणी संरक्षित करून सभोवताली कुंपण करून समुद्राच्या पाण्यापासून तसेच कुत्रे, घार, कावळे, खेकडे यांसारख्या हिंस्र प्राण्यांपासून ४५ ते ५५ दिवसापर्यंत संरक्षण करतात. अड्ड्यातून बाहेर पडलेल्या पिल्लांना वनविभागाच्या सहकार्याने नैसर्गिक अधिवासात समुद्रात सोडून या दुर्मीळ कासवांना जीवदान देतात.वायंगणी समुद्रकिनारी येथील कासव मित्र तसेच ऑलिव्ह रिडले संस्थेचे सहकारी यांच्या उपस्थितीत या सर्व पिल्लांना सुखरूप समुद्राच्या पाण्यात सोडून जीवदान देण्यात आले.काही दिवसात पर्यटकांसाठी मोठी पर्वणी शांत व निसर्गरम्य या समुद्रकिनारी कासव अंड्यांचे संवर्धन केले जात असल्याने. येत्या काही दिवसातच किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना पाहण्याची पर्यटकांना मोठी पर्वणी असणार आहे. तर समुद्रकिनारी भागातील स्थानिकांनी या ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांच्या संरक्षण आणि संवर्धन कार्यात वनविभागास सहकार्य करण्याचे आवाहन वनविभागामार्फत करण्यात येत आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात रहिवासी सहकार्य करतही आहेत. ऑलिव्ह रिडले कासवांची दुर्मिळ प्रजाती देशात ओरिसा, गोवा आणि कोकणात आढळते. त्यांची पैदास डिसेंबर ते मार्च या कालावधीत होते.या निमित्ताने मऊशार वाळूवर स्वच्छंदीपणे धावणारी कासवांची पिल्ले समुद्राच्या लाटांवर हेलकावे घेण्यासाठी सुरू असलेली त्यांची पळापळ …..कासवांच्या लिलांचे दर्शन याची देही, याची डोळा घेण्याची संधी निसर्गप्रेमी पर्यटकांना उपलब्ध होत असते. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी गावात गेली काही वर्षे ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाचे काम करत आहेत. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात ही कासवे किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात. एकावेळी 50 ते 100 अंडी असतात. या अंड्यांपासून बनवलेल्या पदार्थांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये खूप मागणी असते.त्यामुळे अंडी चोरीला जाऊ नयेत तसेच कुत्रे किंवा अन्य प्राण्यांपासून त्यांचे भक्षण होऊ नये म्हणून सुहास तोरसकर त्यांचे सहकारी वायंगणी ग्रामस्थ विशेष काळजी घेतात. कासवांची अंडी ज्या ठिकाणी घातली आहेत तिथे जाळी बसवली जातात. 55 ते 60 दिवसांनंतर वाळूतून पिल्ले बाहेर आल्यावर त्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली समुद्रात सोडले जाते.किरात ट्रस्ट, वायंगणी ग्रामस्थ यांचे नियोजन, म्याग्रू फाऊंडेशन आणि लुपिन फाऊंडेशनच्या सहकार्याने दरवर्षी या गावात कासव जत्रा हा निसर्ग उपक्रम 2012 ते 2018 पर्यंत राबविला गेला.कासवांच्या पिल्लांचा जन्मसोहळा पाहण्याबरोबरच मांडवी किनाऱ्यावरची डॉल्फिन सफर ,खाडीतील मासेमारीचा अनुभव ,वायंगणी जंगल ट्रेल, कासव संवर्धनाचे स्लाईड व फिल्म शो ,पक्षी-प्राणी तज्ञांशी गप्पा ,खाडीतील सफर, दशावतार ,अस्सल मालवणी पदार्थांची मेजवानी ,सांस्कृतिक कार्यक्रम या कासव जत्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात येतात. सन 2019 मध्ये शासनाने हा उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविण्यात येण्यासाठी ग्रामपंचायतीचला पर्यटन महोत्सव राबविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. सन 2019 मध्ये पर्यटन महोत्सव-कासव जत्रा हा उपक्रम वायंगणी किनाऱ्यावर राबवण्यात आला होता.भारतात ओरिसाच्या समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासव लाखोंच्या संख्येने अंडी घालण्यासाठी येतात.फार मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या कासवांच्या संख्येने या घटनेला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. हा किनारा खास कासवांसाठी सुरक्षित झाला आहे. सततच्या या प्रयत्नामुळे कासवांचा नैसर्गिक जन्मदर जो जेमतेम चाळीस ते पन्नास टक्के होता तो आता सुमारे 70 टक्‍क्‍यांवर जाऊन पोहोचला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्या प्रमाणे देवगड येथील प्राणी मित्र प्राध्यापक दप्तरदार यांचेही या कामात मार्गदर्शन मिळते .कासव जत्रा या निसर्ग उपक्रमात मुंबई-पुणे,नाशिक महाराष्ट्र तसेच भारतभरातून असंख्य निसर्गप्रेमी पर्यटकांनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. वायंगणी गावात पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था इथल्या स्थानिक घरांमध्येच केली जाते. नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान कासवांच्या पिल्लांचाजन्म सोहळा आपणाला देखील पाहण्याची इच्छा असेल तर इथे पूर्वनियोजित संपर्क करून आपणही आपली सहल आयोजित करू शकता.ऑलिव्ह रिडले कासवांच्या इवल्याशा पिल्लांना समुद्रात सोडण्याचा सोहळा पाहायला ही पर्यटक मंडळी आलेली होती. तिथं किनाऱ्यावरच जाळी लावून आतमध्ये कासवांच्या घरट्यांतील अंडी सुरक्षित ठेवण्यात आली होती. आणि आज त्यातून किती पिल्ले अंडी फोडून आयुष्याचा श्रीगणेशा करायला तयार आहेत हे पाहायला पर्यटक उत्सुक होते. निसर्ग संवर्धन, पर्यावरण पूरक पर्यटन आणि यांच्या मिलाफातून स्वयंरोजगार याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोकण किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडली कासवांचे संवर्धन आणि त्यामध्ये असलेला स्थानिकांचा सहभाग. ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या कवचामुळे त्यांना हे नाव दिलं गेलं असावं. पूर्ण वाढ झाल्यानंतर ही कासवे साधारणपणे २ फूट लांब आणि ५० किलो वजनाची होतात. ही कासवे मांसाहारी असतात. यांचे खाद्य म्हणजे जेलीफिश, मासे, त्यांची अंडी, कालवं, गोगलगायी खेकडे इत्यादी. त्यांचे संपूर्ण आयुष्य खोल समुद्रात जाते आणि अन्न शोधणे व प्रजननन यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास ही कासवे आयुष्यभर करतात. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे अंडी घालण्यासाठी मादी त्याच किनाऱ्यावर येते जिथं अंड्यातून ती पिल्लू म्हणून बाहेर पडलेली असते. ५-७ दिवसांच्या कालावधीत अनेक माद्या ठरलेल्या किनाऱ्यावर येतात आणि सुमारे अर्धा फूट खोल खड्डा खणून एकावेळी ८० ते १२० अंडी घालतात. तज्ज्ञ असे मानतात की अंडी फोडून बाहेर पडलेल्या १ हजार पिल्लांपैकी एकच प्रौढ कासव म्हणून जगते. ही पिल्ले ४५-६० दिवसांच्या अंतराने अंड्यांतून बाहेर पडतात आणि मग समुद्र किनाऱ्यावरून काही मीटर्स चा प्रवास करून सागरात आपल्या आयुष्याचा श्रीगणेशा करतात. किनाऱ्यावरून पाण्यात जाणारी पिल्ले कोल्हे, कुत्रे, खेकडे, तरस, शिकारी पक्षी यांच्या भक्षस्थानी पडतात. त्यामुळे अनेकदा मादी एका हंगामात दोनदा अंडीही देते.ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन खूप मोठ्या प्रमाणावर ओडिशा राज्याच्या किनाऱ्यावर होते. महाराष्ट्रात हे प्रमाण तितकं मोठं नसलं तरीही सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने लावलेल्या संवर्धनाच्या रोपट्याचा आता वृक्ष झाला आहे हे नक्की. आता हे काम गावखडी, आंजर्ले, कोळथरे, केळशी अशा ठिकाणीही वाढले आहे. मादीने अंडी घातल्यानंतर ही अंडी जाळीने संरक्षित केलेल्या हॅचरीत आणून ती दोन महिने जपावी लागतात आणि मग पुढं यातून पिल्ले बाहेर येतील त्याप्रमाणे काळजीपूर्वक समुद्रात सोडावी लागतात. गावकरी हे काम आनंदाने करतात. यासाठी किनाऱ्यावर रात्रभर गस्त घालण्याची मेहनतही घ्यावी लागते. पण यातून पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना मिळत आहे ही एक मोठी सकारात्मक गोष्ट आहे.समुद्रात सोडलेल्या पिल्लांचे फोटो काढत असताना अनेकदा सूचना देऊनही फ्लॅश सुरूच असतात . हे बंद ठेवण्याची सक्त ताकीद इथे कासव मित्र यांनी केली आहे शिवाय पिल्लांना मातीतून प्रवास करत समुद्राकडे सुरक्षित जात आहे ना याची ही दक्षता घेतली जाते. पिल्ले समुद्रात 15-20 मिनिट गेल्या नंतरच पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करू शकता अशीही ताकीद दिली जाते. कारण पिल्ले समुद्रकिनारी लाटेमार्फत पुन्हा येतात आणि त्यावर कोणाचाही पाय न पडावा कोणत्याही पिल्लाला हानी न व्हावी या दृष्टीने लक्ष दिले जाते. शिवाय आपले हि पर्यटकांचे कर्तव्य आहे निसर्गाला काही हानी होईल असे काही वर्तवणूक होता कामा नये. धन्यवाद ..!

सौ. रुपाली स्वप्नील शिंदे ता. आजरा

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular