ऍनिव्हर्सरी …. ?
हल्ली नवीन बऱ्याच गोष्टी उदयास आलेल्या आपणा सर्वाना दिसत आहेत आणि का न असावे वेळ बदलत असते तसे आपण ही बदलायला हवं हे ही योग्य आहे च. पूर्वी वाढदिवस ही श्रीमंताच्या घरी साजरे व्हायचे पण सध्या लग्न वाढदिवस म्हणजेच आपण त्याला ऍनिव्हर्सरी असेही संबोधतो ते ही प्रचंड प्रमाणात साजरे होताना आढळतात.
मुळात या ऍनिव्हर्सरी चा कालावधी म्हणजे एप्रिल मे आणि त्यांनतर नोव्हेंबर आणि डिसेंबर . स्टेटस वर फक्त जोडप्यांचे फोटोझ आणि शुभेच्छा . लग्न एक ओळखीचाच पण अनोळखी सोहळा सर्वांच्या आशीर्वादाने भर भरून किंव्हा कधी कधी बिना आशीर्वादाचा ही असतो. लग्न म्हणजे साखरेच्या पाकातल्या बुंदिनी सजलेला असा मोतीचूर लाडू जो खाल्यावर ही पच्छाताप होतो आणि नाही खाल्ला तरी पच्छाताप ठरलेला च …. हा पण असतो नक्की.
“भाजीत भाजी मेथी ची आणि राणी माझ्या प्रीतीची” या नाव घेण्यापासून दाम्पत्याचे आयुष्याला सुरुवात होते.
वाढ दिवस म्हणजे फक्त वाढता दिवस च नव्हे आपल्या नात्याचा १ वर्ष म्हणजे एक पावसाळा आणि त्यातील आलेले सुखद अनुभव सुखाने दिवस जात असतात नव्याचे नऊ दिवस कसे अगदी तसे जसे बाळ जन्माला येते आणि बालपण सुरु होते अगदी सुखाचे दिवस , कुणाचे काही घेणे देणे नसते मस्त सुखात जात असणारे दिवस असतात ते .. नाही का . ? हळू हळू बाळ शाळेत जाऊ लागते , कॉलेज जाऊ लागते तसे तसे अनुभव आणि जगण्यातला अनुभव येऊ लागतो अगदी तसे लग्नानंतर ही अनुभव असतात .
वेळ वाढत जात असतो तशी नात्यातील गोडी वाढत असते. अनेक पावसाळे पाहिल्यानंतर त्या वेळेचा अनुभव वेगळा , वेळ वाढेल तसे अनुभवांची वजा बेरीज अगदीच तोंड पाठ झालेली असते.
नात्यातील गोडवा , नात्यातील वाद विवाद , त्यांच्या आवडी निवडी , सवयी , सद्गुण , वाईट गुण , व्यसनं , ही काही नवीन राहत नाहीत या सर्वांची सवय होऊन जाते.
लग्न म्हणजे नेमकं काय असत हो कुणी सांगेल का जरा ….
दोन अनोळखी जीव एकमेकांना भेटले की एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न. माझे हसवणे , तुझे रुसणे , तुझे हसणे मी मनवणे मी स्वप्न बघणे तू सत्यात उतरवणे मी पाहणे आणि तो दिसणे.
मी रोज नवनवीन पदार्थ बनवणे आणि तुझं मन भरून खाणे कौतुक करणे पण मी आजारी असले की मात्र तू बनवलेल्या अळणी खिचडी त ही मला पंचपक्वानांचा आस्वाद मिळणे लग्न म्हणजे दोन जणांनी एकत्र येऊन चार भिंतींना घर बनवणे जरी चुकला एक तर दुसऱ्याने त्या चुकावर पांघरून घालणे.
मी आहे म्हणून टिकले दुसरी असली तर कधीच सोडून गेली असती पासून तर तू आहेस म्हणून मी आहे असे म्हणणे .
लग्न म्हणजे सुसाट सुटलेल्या तुझ्या बाईकच्या बॅक सीट वरून एक हात तुझ्या खांद्यावर येणे आणि अचानक तू बाईकचा स्पीड कमी करणे .
लग्न म्हणजे घरी कोणीतरी वाट बघतोय याची जाणीव असणे वाफेदार त्या चहाची गच्चीत बसून मजा घेताना कोणीतरी सोबत असणे तू बस आज मी चहा बनवून पाजतो आणि चहा कुठे साखर कुठे आलं कुठे हे सांगण्यापेक्षा मी चहा बनवणे सोपे असे मला वाटते .
मी तुला म्हणावे चल आज तुझ्यासाठी शॉपिंग करू आणि येताना चार साड्या तूच मला घेऊन दे. लग्न म्हणजे ” और तिखा भैया और तिखा करत पाणीपुरी खाणे आणि मला आवडते म्हणून तू पण एखादी खाऊन तुझ्या कानातून धूर निघणे.
माझे रोज तुला जेवायला काय बनवू विचारणे आणि तुझे रोजच्याप्रमाणे बनव काहीपण म्हणणे. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणाऱ्या मला मात्र तू चिडलास की भीती वाटणे आणि मी चिडले की तू फालतू जोक करून मला हसवणे.
आजारपणात मी खंबीरपणे उभे राहणे पण माझ्या आजारपणात एरवी पर्वता सारख्या कणखर तुझे लहान मुलासारखे रडणे लग्न म्हणजे स्वतःपेक्षाही जास्त तुझ्यावर विश्वास असणे आणि तुझ्या त्या विश्वासाला कधीच तडा न जाऊ देणे आरशातही नाही दिसणार असं माझं प्रतिबिंब तुझ्या डोळ्यात दिसणे आणि आजवर जेवढा मी स्वतःला नाही ओळखू शकले तेवढे तुम्हाला ओळखणे म्हणजे लग्न .
तू मला अगदी रडवेली होईपर्यंत चिडवणे पण कुणी दुखावलं मला की हळूच तुझ्या माझ्या डोळ्यातलं पाणी टिपणे जा तू काही दिवस माहेरी आराम कर , मी करेन माझे थोडे दिवस म्हणून दुसऱ्याच दिवशी फोन करून कधी येते विचारणे . दवाखान्यात माझ्या प्रसूती वेदनांचा आवाज ऐकून तुझे रडणे , मी कितीही म्हटलं की अहो तूम्ही झोपा तसे बाळ तुझ्याकडून नाही झोपणार तरी तू माझ्या सोबत रात्रभर जागे राहणे.
लग्न लग्न म्हणजे नेमकं काय हो भांडणं हो या आनंद सहजीवन सहवास हेच तर आहेत रक्ताच्या नात्यांपेक्षाही नवरा बायकोच्या नात्यांचा पारडं जड आहे थोडं कडू थोडं तिखट असं हे नातं पण एकदम खुसखुशीत जबरदस्त आणि भन्नाट.
आज एक उखाणा घ्यावाच म्हणते आज माझी ही ऍनिव्हर्सरी च. म्हणून च लिहिण्याचा योग जुळून आला.
“
गड कसा अगदी भक्कम उभा आहे डोंगर दऱ्या खोऱ्या चिरून,
स्वप्नील रावांचा हात पकडून यावेळी रायगड सर केला श्री छत्रपती चे नाव घेऊन ,
रायरी ची पायरी चढत चढत त्या काळच्या मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा आमच्याकडुन,
शिकण्यास खूप काही मिळालं अन् समजलं आयुष्य ही असच जगावं आपल्या चांगल्या आणि दृढ निश्चयी विचारांना धरून . ..
धन्यवाद …
सौ . रुपाली शिंदे
(भादवन , आजरा )
मुख्यसंपादक