एक चूक

    आपल्या दैनंदिन जीवनात रोज नवे अनुभव आपल्या सर्वांनाच येत असतात. जो तो आपल्या परीने जीवन जगताना दिसतो. कुणी आहे त्या परिस्थितीशी जुळवून आनंदी जीवन जगताना दिसतात, तर ज्यांच्या जवळ सर्व सुख असूनही दुःखी आहेत. फरक फक्त एवढाच असतो, प्रत्येक जण जीवनाचा कुठचा तरी दृष्टिकोन डोळ्यांसमोर घेवून चालतो. काहींना आपणच कायम बरोबर हे विधान लक्षात ठेवूनच समोरच्याकडे पहातो. मीच बरोबर, बाकी सगळे चूक. कुणी कितीही सांगितले तरी ते आपलेच खरे करतात. प्रत्येक मनुष्याला इतरांमधील दोष, चुका काढण्यातच आनंद असतो. ते इतरांच्या चुका काढण्यातच पटाईत असतात, त्यातच त्यांना समाधान मिळते. त्यांना आपल्यातले दोष कधीच मान्य नसतात.


    आजच्या धावपळीच्या युगात कुणालाच कुणासाठी वेळ नाही.आपल्यामुळे कुणाचे तरी मन दुखावलं गेलं ही भावना, जाणीव आपल्याला होत नसते. त्यामुळे समोरच्याला सॉरी म्हणायलाही मन मोठे असावे लागते स्वतःचा मीपणा, स्वाभिमान आणि आत्मविश्वास प्रसंगी बाजूला ठेवत मग ते कुठलेही नातं असो सहज आणि मनापासून माफी मागायला हवी. "मी" पणा संपून नातं अधिकाधिक दृढ होईल. "सॉरी" ह्या शब्दात नात्यातला तणाव दूर करण्याचं सामर्थ्य दडलेले असते.
    मनाचा दृढ निश्चय करूनच माफी मागायला शिकले पाहिजे. इतरांच्या चुका आपण सहज बोलून दाखवतो. आपणही तितक्याच सहजपणे आपल्या चुका कबूल करायला हव्यात. अनेकजण सॉरी या शब्दापासून दूर पळतात. स्वतःची चूक मान्य करण्यात कोणताच कमीपणा नसावा. आपल्या चुका आपणच मान्य केल्या तर समोरच्याला आपले विचार, मन भावनांची किंमत समोरच्या मन दुखावलेल्या व्यक्तीला कळते. 


    जीवनात आपण इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा मनाला पटेल आणि जमेल तेच केले तर निश्चितच आयुष्य आनंदात जाईल. सुख आणि दुःख आपल्याच मनाच्या दोन बाजू आहेत. शब्द हे धार असणारे नसावेत. शब्दांना मधाचे बोट लागले तर शब्द मधुर होतात. 
    शब्दांचा आघात मनावर झाला की जीवनभर त्याचे सल व्रण बनून राहतात. शब्दांना आपुलकी, जिव्हाळा, आधार असला की मन जिंकून जीवन जगण्याचा आधार बनतात. शब्द हे इतरांचे मन जपणारे असावेत. मनुष्य हा मायेचा भुकेला आहे. चुकांमुळे खूप काही घडते आणि घडविते. कधी कधी आपल्याच हाताने आपले जीवन उध्वस्त करतो. आयुष्य आनंदी जगण्यासाठी खूप गोष्टी टाळता येतात.
    चुकांशिवाय मनुष्य जीवन नाही, परंतु त्यात स्वतःच्या चुका स्विकारून त्याचे निरसन केले तर निश्चितच आयुष्य जगण्याचा हक्क आपण नक्कीच गमावणार नाही. अजरामर कथांमध्ये सुद्धा काही चुका घडल्या त्यामुळेच इतिहास घडले. रामायण, महाभारत घडले.

    जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला इतरांच्या मोठेपणाचा आधी स्वीकार केला पाहिजे. झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न करणे झालेल्या चुकांची जबाबदारी घेणे हे सद्गुणी मनुष्याचे लक्षण आहे. उगवणारा प्रत्येक दिवस एक नवी आशा घेवून येते. घडणाऱ्या घटनांना कधीच क्रम नसतो, असतो तो फक्त आपणच आपल्या सोयीने आपल्यासाठी केलेला बदल. म्हणजेच काय घडून गेलेल्या चुकांमध्ये सुद्धा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण जास्त काळजी घेवून सोयीस्कर बदल करणे होय. समाजात अश्या चुका करणाऱ्या व्यक्तींना वेळीच उपाययोजना केली तर बरेच चुकीचे गैरसमज होणार नाही. इतरांचे दोष आणि चुका पोटात घालून अन्याय सहन करणे सुद्धा एक अपराधच आहे. अपराधाला क्षमा नसते. जो चुकतो तोच सगळ्या सुखाला मुकतो. चारचौघात आयुष्य सुंदर जगायचे असेल तर चुकांना वेळीच लक्षात घेवून माफ करा माफी मागा.

लेखिका- सुनेत्रा प्रशांत नगरकर
    - अहमदनगर -

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular