कायदा म्हणजे कॉमन किंवा जनरल सेन्स. या सेन्स मध्ये असते ती सर्वसाधारण बुद्धी. प्रश्न हा आहे की कायद्यातील सर्वसाधारण बुद्धीने सर्व गोष्टी नियंत्रित होतात का? कारण निसर्ग हा विविधतेचा सागर आहे. विविधतेचा अर्थ हाच की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपासून वेगळी आहे. कुठेही समानता नाही. हे वेगळेपण त्या त्या पदार्थातील किंवा गोष्टीतील विशिष्ट गुणधर्माने तयार झालेले आहे. विशिष्ट गुणधर्माने बद्ध असलेल्या विशिष्ट पदार्थ किंवा गोष्टीबरोबर व्यवहार करताना त्या पदार्थ किंवा गोष्टीचा विशिष्ट नियम उपयोगाला येतो ज्यासाठी त्या पदार्थ किंवा गोष्टीच्या गुणधर्माचे व विशिष्ट नियमाचे ज्ञान व वापर कौशल्य आवश्यक असते व त्यासाठी विशिष्ट बुद्धीची गरज असते. कायदा व नियम यात फरक आहे. विशिष्टता असलेल्या विविध नियमांनी सर्वसाधारण कायदा बनतो. निसर्गातील विविध पदार्थ व विविध गोष्टींचे सर्वसाधारण ज्ञान व त्यावर कार्य करू पाहणारी सर्वसाधारण बुद्धी यांचा मिळून बनतो तो जनरल किंवा कॉमन सेन्स जो मधमाशी सारखा गुं गुं असा आवाज आपल्या मेंदूत सतत करीत राहतो. विविधतेचे अंग असलेल्या विशिष्ट वस्तुनिष्ठ नियमांनी बनतो कायद्याचा भलामोठा संच जो सर्वव्यापी संच प्रत्येक विशिष्ट नियमासाठी व विशिष्ट व्यवहारासाठी पाठीमागून कोरस पार्श्वसंगीत देण्याचे काम करतो. म्हणजे सर्वसाधारण कायदा हा विविध पदार्थ व गोष्टींच्या विशिष्ट नियमांना पुढे ढकलण्याचे सार्वजनिक कोरस पार्श्वसंगीताचे पूरक काम करतो. तो विविध पदार्थ व गोष्टींना एका सर्वसाधारण संगीत माळेत गुंफतो. म्हणजे काय तर विशिष्ट गुणधर्म, विशिष्ट शक्ती, विशिष्ट व्यवहार रचना किंवा तंत्र असलेले विविध पदार्थ, विविध गोष्टी व विविध नियम हे झाले विविध मणी व या सर्व विविध मण्यांची जी माळ निसर्गाकडून गुंफली गेलीय तो झाला जनरल किंवा कॉमन सेन्स ज्याचा बनलाय सर्वसाधारण कायदा जो सर्वव्यापी आहे. जगातील विविध पदार्थ, विविध गोष्टी व या सर्वसाधारण सर्वव्यापी कायद्याचे सामान्य ज्ञान विविध पदार्थ, विविध माणसे, विविध गोष्टी यांच्याबरोबरच्या विशिष्ट व्यवहारासाठी कितपत उपयोगी येते हा विशेष अभ्यासाचा विषय आहे. पाठीमागून गुं गुं आवाज करीत कोरस पार्श्वसंगीत देणाऱ्या सामान्य ज्ञानाचा व त्याला चिकटलेल्या कॉमन सेन्स आधारित सर्वसाधारण कायद्याचा विविध गोष्टींबरोबरच्या विशिष्ट व्यवहारासाठी ढकलगाडीसारखा फक्त जुजबी उपयोग होतो. उदाहरणार्थ, रेल्वे रूळावरून धावते त्याचे विशिष्ट तांत्रिक नियम वेगळे व रेल्वेतून प्रवास करताना तिकिट काढणे, शिस्तीने बसणे वगैरे प्रवासी नियम वेगळे. हे दोन्ही विशिष्ट नियम एकत्र केल्यावर बनतो जनरल रेल्वे कायदा. पण या कायद्याचे जनरल किंवा सामान्य ज्ञान त्या त्या विशिष्ट व्यवहारासाठी उपयोगी पडत नाही. पण म्हणून हे सामान्य ज्ञान निरूपयोगी आहे काय? तर नाही! या सामान्य ज्ञानाचा ढकलगाडी सारखा उपयोग होतो. तसे पाहिले तर या जगात कोणतीच गोष्ट निरूपयोगी नाही. प्रत्येक गोष्टीचा विशिष्ट उपयोग आहे. फक्त तो उपयोग कसा करायचा हे माहित पाहिजे. फेसबुक सारख्या समाज माध्यमातून आपण जी काही माहिती मिळवतो ती सामान्य ज्ञानाचाच भाग असते. तिचा ढकलगाडी म्हणून आपल्याला नक्कीच उपयोग करता येईल. हे ढकलगाडी सामान्य ज्ञान जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या मेंदूत साचत राहते व आयुष्यभर पाठीमागून गुं गुं करीत कोरस पार्श्वसंगीत देत राहते. सर्वसाधारण कायदा हा या कोरस पार्श्वसंगीताचे पूरक काम करतो. विशिष्ट काम करीत असताना या ढकलगाडीचा तसा प्रत्यक्ष उपयोग नसतो. विशिष्ट काम करताना विशिष्ट नियमावर बोट ठेवूनच काम करावे लागते. त्यावेळी पाठीमागून गुं गुं करणाऱ्या जनरल कायद्याकडे लक्ष देत बसले तर समोर आ वासून उभे असलेले विशिष्ट काम नीट होणारच नाही. आपण पुराण कथांतून अर्जुन, कर्ण यांच्या धनुर्विद्येबद्दल वाचतो. धनुष्याला बाण लावून तो लक्ष्यावर मारण्याची त्यांची अचूकता ही त्यांच्या विशेष ज्ञान व कौशल्यावर आधारित होती हा बोध त्यांच्या कथेतून घेतला पाहिजे. बाण मारताना त्यांनी पाठीमागून गुं गुं करणाऱ्या कोरस पार्श्वसंगीत कायद्याकडे लक्ष देण्याऐवजी धनुर्विद्येच्या विशिष्ट नियमाकडे लक्ष दिले म्हणून ते यशस्वी झाले. नियम व कायदा यातील हा महत्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे. फोकस हा इंग्रजी शब्द याच संदर्भात वापरला जातो. विशिष्ट लक्ष्यावर विशिष्ट नियमाने एकाग्रतेने लक्ष दिले तरच लक्ष्यभेद करता येतो. अर्थात फोकस हा सर्वसाधारण कायद्यावर नाही तर त्या कायद्यातील विशिष्ट नियमावर द्यावा लागतो.
- ॲड.बी.एस.मोरे©
आमच्या फेसबुक पेज , इन्स्टाग्रामवर खालील लिंक च्या साह्याने सामील व्हा..

मुख्यसंपादक