Homeमुक्त- व्यासपीठकाय भुललासी वरलिया रंगा!

काय भुललासी वरलिया रंगा!

हिरा हा हिरा असतो. त्याचे मोल त्याला सांगत बसावे लागत नाही. पण हिऱ्याला पैलू पाडले की तो जास्त चकाकतो व त्याची किंमत वाढते. गंमत ही की खाणीत पडलेला हिरा अनमोल असला तरी तो स्वतःच स्वतःला पैलू पाडून स्वतःचे अंगभूत गुण दाखवू शकत नाही. तो वाट बघत असतो अशा जवाहिऱ्याची की जो त्याला पैलू पाडून त्याचे अंगभूत गुण जगाला दाखवेल. पण हिऱ्यासारख्या दिसणाऱ्या काही खड्यांना पैलू पाडून त्यांना चमकदार करणारे लबाड जवाहीर व खोटे हिरेही बाजारात खऱ्या हिऱ्याशी स्पर्धा करीत फिरत असतात. असे खोटे हिरे आपली किंमत तात्पुरत्या काळापुरती का असेना पण वाढवून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. पण खऱ्या हिऱ्याचे अंगभूत गुण त्यांच्याकडे नसल्याने पुढे असे खोटे हिरे उघडे पडतात. पण तोपर्यंत भरपूर फायदा कमवून ते खोटे हिरे श्रीमंत झालेले असतात. स्वतःला पैलू पाडून घेऊन चकाकणे व लोकांना आकर्षित करून घेणे ज्यांना जमत नाही ते हिरे जरी खरे असले तरी आकर्षणाला भुलणाऱ्या दुनियेत ते मागे पडतात. आकर्षणाचे मायाजाल हे असे प्रभावी असते. उद्योग, धंदा, व्यवसायातच काय पण राजकारणात सुद्धा आकर्षणाला महत्व असते. याला शायनिंग मार्केटिंग म्हणतात. या शायनिंग मार्केटिंग मध्ये पदार्थावरील वेष्टणाला फार महत्त्व असते कारण आकर्षक वेष्टण मोह पाडते. वेष्टणाच्या आत लपलेला पदार्थ कसा आहे हे नंतर त्याची चव घेतल्यावर कळते. खोटा माल आकर्षणाच्या तंत्राने जास्त काळ खपत नाही ही गोष्ट वेगळी. पण तोपर्यंत खोटा माल भरपूर नफा कमवून मस्त श्रीमंत झालेला असतो हेही खरे आहे.

ज्ञानबळ/बुद्धीबळ, पैसा बळ/अर्थबळ आणि बाहुबल/शस्त्रबळ ही तिन्ही बलस्थाने ज्या ठिकाणी एकवटली जातात त्या बिंदूला किंवा केंद्राला राजसत्ता म्हणतात. सत्तेचे हे केंद्र खूप शक्तीशाली असते व म्हणूनच सर्वोच्च असते. ज्ञानसत्ता, अर्थसत्ता आणि शस्त्रसत्ता या तिन्ही सत्ता विखुरलेल्या असतात. विखुरलेल्या या तिन्ही सत्तांना एकत्र करून सर्वोच्च असलेली राजसत्ता गाजविणे ही काही साधी गोष्ट नाही. पण सत्तेचे सर्वोच्च केंद्र एकाधिकारशाहीने अर्थात राजेशाहीने जेंव्हा मनमानी करू लागले तेंव्हा मग लोकांमध्ये विखुरलेल्या वरील तिन्ही सत्तांना आपली चूक कळली व मग त्यांनी पुन्हा लोकशाहीच्या नावाने सर्वोच्च सत्ताकेंद्राचे तीन विभागात विभाजन केले. लोकशाही सत्तेतले हे तीन विभाग म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ! म्हणजे शेवटी झाले काय तर ज्ञानसत्ता, अर्थसत्ता व शस्त्रसत्ता या विखुरलेल्या तीन सत्ता राजसत्तेत एकत्र आल्या व पुन्हा कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ या तीन विभागात विभागल्या गेल्या. सत्तेचा हा खेळ म्हणजे मानवी बुद्धीचा फालुदा करणारा अजब खेळ!

आता या सर्व भानगडी कोण करतेय? माणूस की अदृश्य राहून निसर्गातील सगळ्याच सजीव निर्जीव पदार्थांना खेळवणारा निसर्गातील देव? अदृश्य राहून देव जर हा असा डोक्याला ताप देणारा खेळ खेळत असेल तर मग निसर्ग व निसर्गातील मानव समाजाला अदृश्य देवाचा दृश्य खेळ असेच म्हटले पाहिजे. माणसांच्या डोक्याला झिणझिण्या आणणारा खेळ स्वतःच सुरू करायचा व मग तो खेळ बौध्दिक हुशारीने कसा खेळायचा याविषयी वैतागलेल्या मानवी डोक्यांना वरून तात्त्विक मार्गदर्शनही करायचे ही काय अजब पद्धत झाली अदृश्य देवाची!

वेष्टणावरचा रंग कितीही आकर्षक असो त्या वेष्टणात झाकलेल्या पदार्थाचा दर्जा काय आहे हे वेष्टणातील पदार्थ वापरल्याशिवाय कळत नाही. हा नियम जसा पदार्थांना लागू आहे तसा माणसांनाही लागू आहे. एवढेच काय देवालाही लागू आहे. देवाला कल्पनांच्या अलंकारांनी कितीही सजवले तरी त्या वेष्टणाखाली दडलेला अदृश्य देव प्रत्यक्षात कसा आहे हे देवाचा खरा अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. अदृश्य देवाचा अनुभव दृश्य असलेल्या निसर्गात व समाजात घेता येतो. निसर्ग व समाजातील डोक्याला झिणझिण्या आणणारे खेळ बघितले की मग अदृश्य देव कसा खेळ्या आहे हे छान कळते. या अदृश्य देवाची कितीही पूजा अर्चा, प्रार्थना करा तो त्याचे खेळ दाखवल्याशिवाय रहात नाही. म्हणून वरवरच्या आकर्षणाला भुलू नये नाहीतर मनाची फसगत होते. म्हणून तर संत चोखामेळा त्यांच्या अभंगातून म्हणतात की “काय भुललासी वरलिया रंगा”!

  • ॲड.बी.एस.मोरे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular