किंकाळी

         मुग्धा त्या दिवशी घरात एकटीच होती. चहापाणी आटोपून, वेणीफणी करुन कंटाळा आला म्हणून सहजच गॅलरीत उभी होती. तिचा तो छंदच होता म्हणा ना!! घरात इन मीन तीन माणसं. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना पाहणे, मैदानातील खेळणारी लहान-लहान मुले पाहणे यात तिला आनंद वाटत असे आणि विरंगुळा ही होई.

    तिन्हीसांजेला दिवाबत्ती करून पुन्हा ती आईची वाट बघत दारापाशी रेंगाळली. तसा नेहमीपेक्षा आईला आज उशिरच झाला होता.

     शेजारीच दोन-तीन घरं सोडून नारकर काकांचं घर होतं. त्यावेळी घरात सुधीर (नारकर) काका आणि त्यांची पाच वर्षांची गोंडस, गोबऱ्या गालांची, निळसर डोळ्यांची गोड परी दोघच होती. अर्थात तिच्या लोभस रूपामुळे ती चाळीत सर्वांचीच परी होती. आई सविता पेक्षा परी; सुधीर काकांच्या सोबत जास्त रमायची. तशा मुली वडिलांच्या जरा जास्तच जवळ असतात. पप्पा सोबत असले की तिला अगदी कुणी कुणी लागत नसे. परी सोबत खेळता खेळता काका किचन मध्ये पाणी प्यायला गेले आणि अचानक लाईट गेले. त्यासरशी परी ची  किंकाळी ऐकू आली. "पप्पा तुम्ही कुठेय? मला खूप भीती वाटतेय!" 

       परीची किंकाळी आणि तिचं वाक्य मुग्धाच्या कानावर पडलं. तिची पावलंही तिकडे वळली आणि क्षणार्धात अचानक थांबली. घरात एव्हाना मिट्ट काळोख पडला होता. तशीच एक किंकाळी मुग्धा च्या ही मनात उमटली. 

      हो, भिती तर मलाही वाटतेय! काळोखाची, एकटेपणाची! पण मग मी कुणाला हाक मारू? मी कोणापाशी रडू? कुठेयत माझे बाबा? कुणाला माझं दुःख सांगू?

      मुग्धाचे बाबा अविनाश खूप शांत, संयमी, न कुणाच्या अध्यात न मध्यात, सरळ मार्गी, हसत मुख, आपलं दुःख कुणापाशी व्यक्त न करणारे.  छान सुखी संसार होता. नवरा-बायको दोन मुलं सगळं छान चाललं होतं. जेमतेम आठ वर्षाचा संसार झाला असेल आणि एके दिवशी अचानक अविनाशचा कंपनीत एक्सीडेंट झाला आणि तिथेच त्यांनी प्राण सोडला.

        मुग्धा अवघी दोन वर्षांची होती तेव्हा आणि तिचा भाऊ मयूर पाच वर्षांचा. मुग्धा ची आई अवनी अक्षरशः  कोलमडून पडली.  कुटुंबाचा आधार हरपला होता आणि समोर फक्त प्रश्नचिन्ह होतं. तरीही न डगमगता त्या माऊलीने सगळ्या परिस्थितीला तोंड देत मुलांचे संगोपन केलं.

        तशी मुग्धा अंतर्मुखच होती. लहानपणी मनावर वडिलांच्या जाण्याने आघात झाला होता. नातेवाईक असूनही तसं घरीदारी फारसं कुणाचं येणं जाणं नव्हतं. शेजारच्या दोन घरांचा मात्र फार आधार होता.  मुग्धा सतत आपल्याच विचारात, एका कोशात गुरफटल्यासारखी असायची.  तिच्या बाल मनाला खूप प्रश्न पडत पण ती कुणापाशी काहीच बोलत नसे. त्यासाठी तिच्यावर घमेंडी हे लेबल ही लोकांनी लावलं होतं. तिने फक्त बाबांचा ध्यास घेतला होता.

       आईला त्रास होऊ नये म्हणून ती आपलं दुःख मनात साठवत गेली; कोंडत गेली.  तिने तिचं आपलंच असं एक विश्व बनवलं होतं.  परीची ती किंकाळी ऐकून मुग्धा आपल्याच विचारात गुरफटली होती.

         एव्हाना आईही आली होती आणि लाईटही. पण मुग्धाच्या मनात मात्र अजूनही अंधार होता आणि वाकुल्या दाखवणाऱ्या काही सावल्या.

शब्दवेडी
सौ. दिपाली संदिप मेस्त्री
http://linkmarathi.com/अबला-हरीणी/
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular