Homeमुक्त- व्यासपीठकोण खरे वारसादर..?

कोण खरे वारसादर..?

रायगडावरून राजे म्हणाले
मी स्वराज्याला जन्म दिला
चवदार तळ्याच्या पाण्यातून
बाबासाहेब म्हणाले
मी संविधानाला जन्म दिला
कोल्हापूरच्या मातीतून राजश्री शाहू म्हणाले
मी माणुसकीला जन्म दिला
तिघेही सोबत ओरडले
अरे आम्ही आमचा जन्म
इथल्या मातीसाठी खर्च केला…

तिघांच्याही आवाजात
वेदना होती,माया होती,ममता होती
तिघांनी हातात हात घेतले
आणि थेट भिडेवाड्यावर गेले
महात्मा फुलेंनी तिघांना मिठी मारली
तीन भाऊ एकत्र पाहून
सावित्रीचं काळीज भरून आलं

हे महापुरुष एकत्र आल्याची
बातमी मला कळली
आणि मी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी
धावत पळत भिडेवाड्यावर गेलो
मी राजेंना जय भवानी म्हणलं
बाबासाहेबांना जय भिम केला
शाहू महाराजांना नमस्कार केला
महात्मा फुलेंना वंदन केले

मी सर्वांच्यासोबत एक हळूच
सेल्फी घेतला
सर्वांनी मला जवळ घेतलं
कुणीच जात विचारली नाही
कुणीच धर्म विचारला नाही
आई बापाच्या मिठीपेक्षा
जगातली सर्वात जास्त ममता
त्यांच्या मिठीत मिळत होती

पाणावलेल्या डोळ्यांनी
मी सर्वांसमोर हात जोडून उभा राहिलो
तेव्हा,
महात्म्या फुल्यांनी हातात खडू घेतला
आणि फळ्यावर लिहिलं,
“आमचे खरे वंशज,आमचे वारसदार
हे आमच्या रक्तातून नाही
तर आमच्या विचारातून जन्माला येतात”
तोच खडू
बाबासाहेबांनी हातात घेतला
त्यांनी लिहिलं
“जे आमचे विचार पेरतात तेच आमचे वारसदार”
पुन्हा तोच खडू त्यांनी
शिवबाकडे दिला
आणि महाराजांनी लिहिलं
जो प्रत्येक स्त्री मध्ये
आई बहीण शोधतो
तोच माझा मावळा आणि तोच माझा वारसदार
नंतर शाहू महाराजांनी
त्याच्या खाली लिहिलं
जे माणसावर माणसासारखं प्रेम करतात
तेच आमचे वारसदार
आणि मग सावित्रीने लिहिलं
आमचे विचार पेरत चला
आम्ही पुन्हा पुन्हा याच मातीत उगवत राहू.

आणि त्यांनी माझ्या हातात खडू दिला
आणि सगळेजण हसत म्हणाले
आता तू लिही काहीतरी
माझी अक्कल बंद झाली
मी खडू घेतला
आणि सगळ्यात शेवटी फक्त
एक पूर्णविराम दिला.

मी बाहेर रस्त्यावर आलो तेव्हा
यांच्याच रक्ताचे वारसदार
गटा गटाने गाढवं
घेऊन बोंबलत फिरताना दिसले
तेव्हा,
मी सगळयांना तुडवायालाच सुरवात केली.

  • दंगलकार नितीन चंदनशिवे.
    मु.पो.कवठेमहांकाळ.
    जि.सांगली.

विचारांचे वारसदार आहात असं वाटत असेल तर कविता शेअर करा.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular