लहानपणापासून मी डाव्या हाताने अपंग असूनही क्रिकेट मला भारी आवडायचं.ग्रामीण भागात प्रत्येकाच्या अंगात त्यावेळी क्रिकेटचे वारं वाहत होतं. त्यामुळे मी देखील बेंबीच्या देठापासून क्रिकेट खेळायचो. सकाळी उठलं रे उठलं की पहिल्यांदा खेळाचा माळ गाठणे हा उद्योग ठरलेला असायचा.तर सायंकाळी घरात दप्तर टाकलं रे टाकलं की अंधुक अंधुक दिसे प्रयन्त फक्त क्रिकेट आणि क्रिकेटचं चालू असायचं.खेळून आलं की आई ओवाळणी करूनच घरात घ्यायची.पण खायला काय पाहिजे ते मात्र आधी विचारायची.जणू माझ्या पोटाची काळजी माझ्यापेक्षा माझ्या आईलाच जास्त लागलेली असायची मग काय ‘आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन’ या उक्तीचीच त्यावेळी प्रचिती यायची.
रात्री झोपताना ही डोक्यात आज कोणाला कसं आऊट काढलं, किती धावा काढल्या,खेळताना कोठे चुकलो,कसा शॉट मारायला हवा होता,फिल्डिंग कशी झाली.व आपल्याला सर्वोत्तम क्रिकेट कसं खेळता येईल याचाच अंतर्गत उहापोह चालू असायचा. त्याही पुढची गंमत म्हणजे एखाद्या दिवशी आऊट नसताना चुकीचे आऊट दिलं असेल तर त्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होत नसेल एवढी घरी आल्यावर रंगायची. आणि जर टीम ने खेळत असू तर किती भांडण, किती शिव्या आणि किती चुरस ‘बाप रे बाप!’ ते पार बोलण्या पलिकडचं होतं.जणू क्रिकेट मला आयुष्य भराची शिदोरी देवून जाणार होतं की काय अस मी या क्रिकेटला रात्रंदिवस वाहून घेतलं होतं.
थोडा मोठा झाल्यावर आर्थिक झळा समजू उमजू लागल्याने सुट्टीमध्ये गवंडी कामाला जाऊ लागलो.पण क्रिकेटही चालूच असायच बरं का? परंतु आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यावेळी कामाचं आणि माझं एक जवळच व वेगळं असं नातं निर्माण झालं होतं त्यामुळे आळस हा मला माहीतच नव्हता.कदाचित माझ्या परिस्थितीने त्याला दाबून कुठं तरी दूर ठेवला होता असेल की काय तो माझ्या जवळपास देखील फिरकत नसे.त्यामुळे काम करून कितीही वाजता घरी आलो आणि क्रिकेट सुरू असला की मी सहभागी झालोच म्हणून समजा.आई मात्र आवाजावरून मी कितीही लांब खेळत असलो तरी तिला महाभारतातल्या संजयची दृष्टी लाभल्यासारखी मला अचूक ओळखायची.
मे महिन्याची सुट्टी सुरू होती.कामावरून येऊन मी नुकताच खेळात सहभागी झालो होतो मात्र माझ्या फक्त आवाजावरून आईनं मला अचूक ताडून घराजवळूनच “अ$ रे मुला ये आता घरला’ असं म्हणून दोन तीन वेळा मोठ्याने हाका मारल्या होत्या.पण मी खेळात दंग असल्याने आईच्या त्या इशारा सूचक हाकेकडे दुर्लक्ष केले.व आई ही तिकडे तिच्या कामात मग्न झाली. इकडं मी माझ्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर पहिला हाफस्पीच रोमहर्षक सामना जिंकून देऊन त्याच जोशात दुसरा सामना देखील माझ्या बॅटने गाजवला होता.आता त्याच ताकतीने बॉलिंगची धुरा सांभाळावी लागणार होती.सलामीला मला नेहमी बाबा रे नो स्कुज अस म्हणणारा अन वयानं चाळीशीचा संभाजी कांबळे अर्थात लोटू उतरला होता. घवाळ वर्ण,कमी उंची, पीळदार शरीरयष्टी व गुटगुटीत बांध्याचा क्रिकेट वेडा माणूस होता तो.चालू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शतक झळकावणाऱ्या खेळाडूचे स्वतःस नामकरण करून घेऊन त्याच्या स्टाईलने खेळण्याचा तो नेहमीच आटोकाठ प्रयत्न करायचा. मी त्याला लोटू तर तो मला मोड्या म्हणायचा
मी तेव्हा 18-19 वर्षाचा असेन.दोघांच्या वयात एवढी भली मोठं तफावत असूनही आमची खूप घनिष्ठ दोस्ती होती. तसा त्यानं मला व मी त्याला जीव लावला होता सुरुवात लोटू करणार आहे.तो तुला जास्त धावा काढेल मी बॉलिंग करतो.अस मी दत्तू दादाला (त्याचा सखा भाऊ) सांगत होतो.पण त्याने असू दे, सारख काय आपणच जिंकायचं व्हय गा?अस म्हणत चेंडू माझ्या हातून अक्षरशः हिसकावून घेतला. आता माझ्याकडे पर्याय नव्हता तरी ही बॉल ऑफ साईड ठेवण्याचा कानमंत्र देऊन मॅच आपणच जिंकायचं आहे?असं त्याला सुनावून मी यष्टीरक्षक म्हणून सज्ज झालो.टाळ्यांच्या कडकडाटात सामन्याला सुरुवात झाली.पहिला चेंडू सांगितल्या प्रमाणे पण त्याने खूपच बाहेर टाकला आणि माझा घात झाला.डोळ्याची पापणी लवते न लवते तोच, क्षणार्धात मी आई ग!अस खूप मोठ्याने किंचाळलो. काय झालं ते कोणालाच कळलं नव्हतं मी तोंड घट्ट दाबून धरून खाली बसल्याचे पाहून सगळ्यांच लक्ष माझ्यावर केंद्रित झालं. बघतात तर काय काही अगदी सेकंदात माझा दाबून धरलेला हात आणि तोंड रक्तानं पार माखलं होतं कारण चेंडूला फटका मारण्याच्या लोटूच्या त्या जोरदार प्रहाराने न कळतपणे माझ्या तोंडाचा वेध घेतला होता. क्षणात टाळ्या आणि आवाजाने गजबजलेल्या मैदानात निरव शांतता पसरली.सर्वजण धावतच माझ्या आजूबाजूला जमा झाले.माझी ती भयावह अवस्था युवराज दादानं पाहिल्यानं तो भोवळ येऊन मटकन खाली बसला होता. तर पुढच्या काही मिनिटात घडलेल्या त्या भयानक प्रसंगामुळे कोण कोठे तर कोण कोठे पसार झाले होते. प्रश्न फारचं गंभीर असल्यानं मोजके खंबीर तेवढे तिथं उभे होते. ये ये पाणी आणा पाणी,पळापळा पाणी आणा! असं कोण तरी मोठ्यानं ओरडलं आणि कोणीस पळतच जाऊन पाणी घेऊन आलं.माझ्या डोक्यावर पाणी ओतून चूळ भरण्यासाठी म्हणून मला तोंडात पाणी दिलं खरं,पण सगळं पाणी ओठातून बाहेर येऊ लागलं.ओठ फाटून,दात तुटून माझ्या तोंडाची अवस्था रक्तबंबाळ आणि विद्रुप झाली होती. तर मैदानात व मी घातलेल्या कपड्यांवर रक्ताचा सडा पडला होता. एकंदर अंगाचा थरकाप उडणारा क्षण होता तो.माझ्या जीवावरचं तोंडावर बेतलं होतं एवढीच काय ती जमेची बाजू होती.एव्हाना हा$ हा म्हणता वाऱ्यासारखी ही बातमी आईच्या कानावर जाऊन धडकली आणि ती सैरभैर झाली.छाती बडवत, केस उपटत,बोंबलत,हात पाय आपटत,माझ्या पोराला काय झालं अस मोठं मोठ्यानं आरडत, पायातलं, अवसान गाळून आई माझ्याकडे धावत येत असतानाच काही जणांनी मला धरून अण्णांच्या घरात जिथं आम्ही राहत होतो तिथं आईच्या समोर आणलं.आईनं मला त्या रक्तबंबाळ अवस्थेत पाहताच.आभाळ फटल्यागत,निराधार झाल्यासारखी,भूतलावर एकाकी पडल्यावाणी,साऱ्या जगाला ओरडून सांगत असल्यासारखी एका सुरात, न थांबता ती एकसारखी रडू लागली.तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या धारा काही केल्या थांबेनात.तिला कशा कशाची सूद राहिली नव्हती.तिचा तो गर्भगळीत अवतार पाहून तिथं उभे असलेल्या अनेक जणांच्या डोळ्यातून अश्रुधारेचा बांध फुटला होता.आईची ती भांबावलेली अवस्था माझ्याच्याने पाहवेना माझं हृदय पिळवटून आलं.त्यातच कोत्या विचाराचा एकच जण आईला म्हणाला बाळे आता एका हाताने कशाला दोन हातांनी बोंबल. मला त्याही अवस्थेत त्या माणसाचा जीव घ्यावा की काय असा त्याचा राग आला होता.त्या रागाच्या भरात,मी काही मेलेलो नाही काळजी करू नको.गप्प बस अस आईला ओरडलो देखील पण आई मात्र काही ही आणि कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. तीचं रडणं निरंतर चालूच होतं.कारण मी म्हणजे तिचं सर्वस्व असल्याने मला काय झालेलं तिला अजिबात सहन होणारं नव्हतं.ते नाही का ? जादूच्या खेळात जसा जादूगाराचा जीव पोपटात असतो अगदी तसा माझ्या आईच्या जीव माझ्यात होता काही वेळात फुटून सगळी गल्ली माझ्या भोवती गोळा झाली.येईल तो काय झालं.कसं झालं.अस मनापासून नसलं तरी अचंबित होऊन विचारत होता.तोंडातून वाहणार रक्त काही केल्या थांबेना म्हणून लगेचच सर्वांनी मला घेऊन दवाखान्याकडे कूच केली. हा$ हा म्हणता दवाखाना माणसांनी भरला.ज्याला समजेल तो धावत पळत माझ्याकडे धाव घेत होता. एकप्रकारे दवाखान्यास त्या दिवशी जत्रेचं रूप आलं होतं. चव्हाण डॉक्टरांनी माझ्या ओठाला टाके घातले.माझा एक दात बॅटच्या त्या जोरदार तडाख्याने जाग्यावर पडला होता.कोणी तरी तो उचलून आणला होता.तर दुसरा दात जाग्यावर होता मात्र फिरला होता.डॉक्टर म्हणाले तो ही काढावा लागेल.अशाप्रकारे सगळे सोपास्कार पार पडल्यावर थोड्या वेळात मला घरी आणलं गेलं
बहुतेक डॉक्टरांचे झालेले बिलं दत्तू दादाने भागवले होते.कारण झालेल्या अपघातास त्यांच्या घरातील व्यक्ती जबाबदार होती ना! पुढील आठ दिवस मला व्यवस्थित खाता येत नव्हतं.मावशी आणि आई मला चमच्याने भरवायच्या. झाल्या साऱ्या प्रकाराने लोटू मात्र आतल्या आत खजील झाला होता.साधारण एक दोन वेळा तो दाराच्या चौकटीला हात लावून माझ्याशी बोलण्याची किंवा क्षमा मागण्यासाठीची परवानगी घेण्यासाठी आला ही होता.पण माझ्या मनात धुमसत असलेल्या रागापोटी मी त्याच्या तोंडाकडे देखील पाहिलं नसल्याने तो आल्यापावली माघारी गेला होता.ना मी ना आईने त्याच्याशी वाच्यता केली होती.ते तर त्याच्या खूपच जिव्हारी लागल्याचं त्याच्या देहबोलीतून स्पष्ट जाणवत होतं.त्यातच समाजातील काही वयस्कर माणसं काय रे संभा,तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही.दोन पोरांचा बा आहेस नव्ह.त्या पोराला चुकून जर कानाजवळ बॅट लागली असती तर ते तरणबांड पोरगं हातचं गेलं असत की रे! मग त्या निराधार पोरीनं कोणा कडे बघायचं होत.अशी दूषणं देत होती.आणि बऱ्याच लोकांना तर आम्ही लोटू वर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला कोर्टाच्या पायऱ्या झिजवायला लावावं असं वाटत होतं.पण आम्ही दोघे असे करून एखाद्याच्या मनात कायमच वैरत्व ओढवून घेणारे नव्हतो. कारण घडला सारा प्रकार चुकून झाला होता .तो एक निव्वळ अपघात होता! न कळत घडलेला अपघात! तारीख मला आता निश्चित नाही आठवत परंतू मे 2000 ला ही घटना घडली.आणि 11 ऑगस्ट 2000 ला लोटूने आत्महत्या केली.दहा जणांनी दहा दिवस काठीने बदाबदा मारले असते तरी गडी मेला नसता.पण स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून तो आम्हा सर्वांना सोडून अनंतात विलीन झाला होता.एक क्रिकेट वेडा कायमच क्रिकेट सोडून गेला होता.मी तेव्हा खूप खूप रडलो,कारण राहून राहून मला त्याचा माफी मागायला आलेला तो निरागस चेहरा समोर दिसत होता.नाहीतर तसा तो माझा सच्चा दोस्त होता ना! खरोखर तसा दोस्त पुन्हा न होणे असा तो दुर्मिळ होता.सर्वात महत्वाचं म्हणजे नसानसात क्रिकेट मुरलेल्या त्या ध्येयवेड्या क्रिकेट विरानं, माझ्या दोस्तानं घडलेल्या त्या घटनेच्या धसक्यानं चार महिन्याच्या अल्पकालावधीत का असेना ना बॅटला हात लावला होता ना त्याकडे ढुंकून पाहिलं होतं. तस पाहता दोष ना लोटूचा होता ना माझा! कदाचित हा कर्मधर्म संयोगाचा भाग होता असेल.किंवा माझ्या दातांचा माझ्या सोबत राहण्याचा तो तेवढाच काळ असेल म्हणा पण मी मात्र माझ्या ऐन तारुण्यात पुन्हा कधी ही न येणारे सोन्यासारखे माझे दोन दात गमावल्याने क्रिकेट एकप्रकारे माझ्या आयुष्याला भोवला होता एवढं मात्र खरं ……..
✍ कृष्णा शिलवंत
मुख्यसंपादक