सकाळपासून खूप धावपळ झालीय. खरेद्या मग त्यानंतर इतर काही कामे. घरी यायला अंमळ उशीरच झालाय. घरी आल्यावर अन्नपूर्णेची सेवा केल्याशिवाय उदरभरण होणार नाही. हे घरातल्या (स्वैपाकघरातल्या) कर्त्या बाईला माहिती असतेच. खरेतर स्विगी किंवा तत्सम पर्याय अस्तित्वात असतात. पण इतके खाण्याची इच्छा मनात आणि पोटातही नसते अशावेळी “अग छान खिचडी टाक आणि पापड भाज चार.” असे कोणीतरी म्हणते. अनेकदा मुले मॅगीला “वॉव मॅगी” म्हणतात पण खिचडीला ईऽऽ खिचडी म्हणतात. मग “आज खिचडीच बनणार आहे” असे अल्टिमेटम दिले जाते. पण हीच
मुल होस्टेलला जाऊन रहाणार म्हटल्यावर त्याच्या /तिच्याबरोबर एक विजेवर चालणारी शेगडी (हॉटप्लेट), चार कामचलाऊ भांडी आणि डाळ तांदूळ देण्याचा प्रघात आजही आहे . पूर्वी (बिफोर स्विग्गी) शिक्षणासाठी हॉस्टेलला रवानगी होण्याआधी मुलांना खिचडी बनवायला हमखास शिकवले जायचे.
बऱ्याचदा रविवारी संध्याकाळी मेसला /खानावळीला सुट्टी असायची. मग रविवारी संध्याकाळी काहीजण बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायचे. ज्यांना दर रविवारी असे हॉटेलमध्ये जाणे परवडायचे नाही ते रुमवर खिचडी बनवायचे. मग त्यातल्या त्यात बदल म्हणून कधी भाज्या टाकलेली खिचडी बनवली जायची. सोबत पापड नसायचा पण आईने दिलेली लोणच्याची बाटली आणि घरच्या सुग्रास जेवणाची आठवण मात्र असायची.
लहान बाळापासून ते घरातल्या मोठ्यांपर्यंत सर्वांना सहज पचणारी अशी ही खिचडी. घराघरातल्या सुगरणी आणि बल्लवाचार्य (पुरुष सुगरण असतच नाहीत असा विचार करून सुगरणला पुरूषवाचक शब्दच नाही म्हणून बल्लवाचार्य हा भारदस्त शब्द वापरलाय!) आपापले कसब वापरून खिचडीला चविष्ट बनवतात.
जसे दर बारा मैलावर भाषा बदलते तसेच प्रदेश बदलला की खिचडी करायची पद्धतही बदलते बहुतेक.
साजूक तुपावर हिरवी मिरची, कडिपत्ता, जिऱ्याची फोडणी देऊन बनवलेली चवीला फारशी तिखट नसलेली सात्विक खिचडी (याला सपक खिचडी असे नाव दिलेले वाचनात आले होते.) ,कधी यात मुगाच्या साले काढलेल्या डाळीऐवजी सालासकट डाळ घातली जाते. काही ठिकाणी तेलावर लाल मिरची, लसूण, गरम मसाला घालून झणझणीत खिचडी करतात. डालखिचडीत मुगाऐवजी तुरीची डाळ वापरतात.
दक्षिण भारतात भिशीबेळे भात करतात तो पण खिचडीचाच प्रकार आहे.
महाराष्ट्र खाद्यसंस्कृती कोशात डोकावले तर खिचडीचे तब्बल सत्तेचाळीस प्रकार दाखवलेले आहेत त्यात अडतीस शाकाहारी प्रकार आहेत. यात खान्देशातील बाजरीची खिचडी( यात मूगडाळीऐवजी सालं काढलेली बाजरी वापरतात), जोंधळ्याची खिचडी असे वेगळे प्रकारही आढळले.
कोकणात वालाचे बिरडे घालून मसालेदार खिचडी बनवतात. विशेषतः चांद्रसेनिय कायस्थ प्रभूंकडे अतिशय चविष्ट अशी ही वालाची खिचडी बनते. तसेच नॉनव्हेज खाणारे सुकवलेली कोलंबी (सोडे) घालून खिचडी बनवतात.
काही ठिकाणी खिचडीबरोबर भजी असते तर काही घरात, विशेषतः गुजराती घरांमध्ये ताकाच्या कढीशिवाय खिचडी बनत नाही.
दही, लोणचे, पापड अगदी साध्या मोहरीच्या फोडणीबरोबरही फर्मास लागणारी ही बहुरंगी, बहुढंगी खिचडी एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुंदर रुपडे आणि आगळेवेगळे नाव घेऊन समोर आली तर नवल वाटायला नको.
वन डिश मीलच्या जमान्यात हे एक पूर्णान्न कधीही आणि कितीही खावे.
काय मग ? तुमच्याकडे आज खिचडीचा बेत नक्की ना ?
- डॉ समिधा ययाती गांधी
मुख्यसंपादक
खूप सुंदर लिखाण; मॅम मला आम्हाला तुमचे बाल संगोपनाचे भाग वाचायला खूप आवडतात. मी कॉलेज ग्रुप मध्ये पण share करते तेव्हा माझ्या मैत्रिणींना ही ते खूप आवडते. तुम्ही यापुढील ही लेख लिहावेत. मुलांसाठी खूप गरजेचे आहे.
nkkich madam