दोन दिवस आधी माझी गाडी सर्व्हिसिंगला दिली होती मग अचानक ट्रेन ने जाण्याचा योग आला. विचार केला कि लेडीज डब्ब्यात बसू. पण बघते तर काय, तो डब्बा अगदीच गच्च भरून, अगदी दाराला लोम्बकतही होत्या काही स्त्रिया… कस बस करत स्वतःची बॅग सांभाळत मी एका कोपऱ्यात जावून उभी राहिली. काय बडबड सुरु होती. नुसता गोंधळ. पण त्या गोंधळातही काही गोष्टी मनाला पार लागल्या. एक म्हणत होती, “बाई माझी पाच वर्षाची पोर, आज जरा आजारी आहे आणि आज मोठ्या मॅडमची विदेशातल्या लोंकांसोबत मिटिंग आहे. सुट्टी चा विचार करू शकली नाही ग.” “मनच थाऱ्यावर नाही, कसतरी पोरीला दवाई देवून आणि शेजारणीला सांगून आले.” मला जरा आवाजाचा सूर ओळखीचा वाटला मग मी ताराच्या खिडकीतून दुसऱ्या डब्यात डोकवलं तर ती माझ्याच ऑफिस ची राधा होती.दुसरी तेवढ्या गर्दीत वेणी घालत होती आणि म्हणाली “मला सकाळी चारलाच उठाव लागत, आधी सासू मदत करायची पण आता त्याना नाही जमत, आणि माझ्या साठी ती घरी राहते हेच महत्वाचं. मुलगी १० वित आहे, आणि मुलगा सातवीत, सगळच आवरूनच निघते मी, स्वतःला आवरण्यासाठी वेळच नसतो, हे बघ बॅगमध्ये नवीन साडी ठेवली आहे. हि ट्रेन सुटली कि मग,१ तासाने ट्रेन असते… स्टेशन वर पोहचली कि घालेल स्टेशन च्या लेडीज रूम मध्ये, आणि मग जाईल ऑफिस ला अगदी टाप टीप.”त्यांच्याच शेजारी अगदी तरुण मुलीचा ग्रुप उभा होता, बघून मला माझे जुने दिवस आठवले. दोंडाला रुमाल बांधलेलं आणि आपल्याच धुंदीत राहणार तरुण मन. त्याच्या गप्पा सुरु होत्या, “अरे यार, नवीन प्रोजेक्ट सुरु झालाय, खुप वेळ ऑफिस मध्ये राहवं लागत, घरी आई फार ओरडते.” दुसरी म्हणाली “माझं तर लग्न जुळलंय ग, आणि मला वेळच नसतो काही खरीदीसाठी वगैरे… बाबा सोडून दे म्हणतात, पण नाही ग, स्वतःच काहीतरी हवं, लग्न काय होऊनच जाईल, नौकरी नाही सोडणार बाबा, खुप कॉम्पिटिशन आहे, भेटत नाही.” तेवढ्यात एकीचा फोन वाजला, तिनी फोन उचलला आणि हो सर, नाही सर, असच उत्तर दिल आणि मग तिच्या घरी फोन लावला आणि म्हणाली “आई मला यायला उशीर होणार आज, हवं तर तू चौकशी करून घे माझ्या ऑफिस मध्ये, मला आज साईट व्हिजिट ला सर सोबत जायचं आहे. ते मला सोडून देतील चौकापर्यंत, तू दादाला तिथे पाठव.” प्रसंग लक्षात आला होता माझ्या, आणि त्या आईची काळजी आणि मुलीची कामातली जिद्दहि. मी जरा माझ्या कमरेला हात लावत होते, खुप वेळ पासून उभी होती… मग दुखायला लागली होती,अगदीच माझ्या जवळचीने मला हात लावला आणि म्हणाली, पहिल्यांदा ट्रेन ने प्रवास करतेस का? मी जरा बावरलीच, ती पुढं म्हणाली “बाई २२ वर्ष झाली मला नौकरी करत आहे, ये बस इथे, मला माहित आहे तू गर्विष्ठ नाहीस म्हणून उगाच लोकांचा समाज असतो तो, आणि काय ग? वेळ नाही भेटला का तुला, तुझ्या टॉप ला इस्त्री करायला .. मी आश्चर्यानेच बघितलं आणि सकाळचा प्रसंग आठवला, मी ऑफिस साठी निघत होते तेव्हा शेजारची लता अगदीच म्हणाली होती, “अय्या, नवीन फॅशन वाटते, गुजराती पॅटर्न चा आहे का टॉप? मस्त दिसतोय तुम्हाला. बढिया, तुझे फ्लॅटर मॅच झालेत कि टॉप बरोबर, माझ्या साठी पण आन अशा फ्लॅटर्स, वेळ भेटला तर.. ” मी हो म्हणून निघाले होते. किती फरक होता दोघीच्या बघण्यात. खरं तर घरून निघतांना माझी हिल ची एक सॅन्डल थोडी तुटली होती, आणि मिटींग होती माझी, मग ब्लेझर वर हिल्स हवे होते पण पर्यायांनी मी माझ्या नवऱ्याच्या जुन्या स्लीपर्स घातल्या होत्या. आणि माझ्या सँडल्स बॅग मध्ये ठेवल्या होत्या.काकू मोठा श्वास घेत म्हणाल्या, “नौकरी करणाऱ्यांची व्यथा कुणालाच कळणार नाही ग बाई”. “सगळ्यांना वाटत, आपली खुप मज्जा असते.” “मानस नौकरी करतात, तर ते फक्त नौकरी करतात. पण बायका नौकरी करण म्हणजे दोन शिफ्ट मध्ये काम करण असत. सुरवातीला मी अगदी पहाटे उठायची, मग ह्यांचा नाश्ता आणि दुपारचा डब्बा बनवून, स्वतःच आवरून, निघायची. मुलासाठी नौकरी सोडणार होते मी, पण ह्यांचं अपघातात निधन झालं आणि माझा मुलगा तीन महिण्यापासून पाळणाघरात राहिला. आता तरुण झाला. मला सोडायला येतो स्टेशन पर्यंत.” मी गप्प राहून सगळं ऐकत होती मिटिंग च्या टेन्शन मध्ये,पण माझी दुरून नजर राधा बाई वर होती.स्टेशन वर पोहचताच मी कॅप मागवली, आणि सॅंडल शिवायला समोरच्या मोजरी वाल्याला दिली आणि कॅप ची वाट बघत राधाला फोन लावला, तिलाही बसायला सांगितलं गाडीत आणि आधी ऑफिस गाठलं, माझी अर्जेंट मिटिंग होती कंपनीच्या फॉरेन कलाईन्ट सोबत. राधाला सगळे डॉक्युमेंट आणि प्रोजेक्टर लावायला सांगितलं आणि मी मेकअप आवरण्या साठी वॉश रूम मध्ये गेले. तिथे आधीच रागिणी टॉप बदलत होती. तिला सहज विचारलं तर म्हणाली, “मॅडम पान्हा फुटलाय हो, जरा मीटिंगला १० मिनिट उशीर झाला तर चालेल ना, मी सगळं आवरून येते.” मीही म्हटलं “बर बर, ये आवरून.” तेव्हाच माझ्या मुलीच्या शाळेतून तिच्या मॅडम चा फोन आला कि तिला विंटर कॉंसॉर्ट साठी मंकी ड्रेस घायचा आहे आणि परवा लास्ट डे आहे, मी हो हो म्हणतच फोन ठेवला आणि लगेच ऑनलाईन बघायला सुरुवात केली पण कुठेच दोन दिवसात भेटणार नव्हता, मग लगेच शाळेच्या मदर्स ग्रुप मध्ये मॅसेज टाकला कि कुणाला दुकान माहित असेल तर सांगा. आणि लगेच राधा बाईला आवाज देत आणि ब्लेझर घालतच कॉन्फेरेंस रूम कडे निघाले.क्लाईन्ट कडून प्रोजेक्ट अप्रूव्हल घेऊनच बाहेर निघाले आणि सर्वात आधी मोबाईल चेक केला तर ग्रुप वर एकीचा मॅसेज होता आणि मंकी ड्रेस साठी दुकानाचा पत्ता हि. दोन्ही प्रोजेक्ट फत्ते झाल्याचा आनंद मनात होताच. लगेच बेग मध्ये लंच बॉक्स साठी शोधशोध सुरु केली पण काही सापडेना. लक्षात आलं कि मुलींची तयारी करतांना घरीच विसरले होत मी. मग कँटिंग शिवाय पर्याय नव्हताच. तिकडे मला वसुधा भेटली, HR विभागात क्लार्क आहे, सहा महिण्याची गर्भवती, तिला म्हंटल “अग, तू केंटिंगच का खातेस? घरून आणायचं ना.” ती म्हणाली “मॅडम सांबर खाण्याची इच्छा झाली होती आणि घरी वेळच नसतो… सगळं घडीच्या काट्याकडे बघूनच करावं लागत आणि लाड पुरुवून घायला आपण घरीही नसतो ना”. तेवढ्यात केंटिंग वाल्या काकू फोनवर जोरजोरानी बोलत होत्या, कि “मी लवकर येत आज, पाहुण्याना थांबवा.” मी माझं कुपन देतच विचारलं, “काय झालं काकू?, ती म्हणाली “मॅडम, सकाळी ऑफिस साठी निघतच होते, तर सासरच्या गावची सासूचे जवळचे नातेवाईक आलेले. मी घाई घाईतच नाश्ता बनवून ऑफिस साठी निघाले. आता सासूबाई बोलत होत्या कि, मला घरी आलेल्या पाहुण्यान्चा मान सम्मान करता येत नाही, बाहेर च्या लोकांना खायला घालतेस, घरी लोकांना उपाशी ठ्वतेस. तुझे माहेर चे असते तर सुट्टी घेतली असती ना, वगैरे वगैरे..” आता मॅनेजर ला सांगून… आज जरा अर्धा तास आधी निघेल आणि पाहुणचारासाठी काहीतरी घेऊन जाईल, नाहीतर माझी म्हातारी सासू मनाला लावून घायची.”मी तिथून निघालेच आणि माझ्या कॅबिन मध्ये आले तर ऋतुजा मला भेटायला आली आणि म्हणली मॅडम नोटीस काढूया का साडी डे साठी, तेवढाच आपल्यला नटून थटून येण्याचा चान्स, मी म्हंटल, “करू ग, जरा बिझी आहोत आपण .. “ती हळूच म्हणाली, ” दिवस निघून जातात आणि मग वेळेवर धांदल होते ना आपली”.. मी हसूनच म्हटलं “बनव तूच आणि टेबल वर आणून ठेव, बघू काय करता येते ते.”सहज विचार करताकरता अचानक माझ्या हातून हा लेख लिहिला गेला आणि अनेक प्रश स्वतःलाच पडलेत…. खरंच मज्जा असते का नोकरी करणाऱ्या स्त्रियांची…. ?
- उर्मिला देवेन

मुख्यसंपादक