Homeमुक्त- व्यासपीठख्रिस्तसेवकाचा बागुलबुवा….!!

ख्रिस्तसेवकाचा बागुलबुवा….!!

   महात्मा ज्योतिबा फुलें च्या चरित्रावर गरळ ओकण्याचा प्रकार महाराष्ट्रात नवीन नाही.फुलेंच्या लेखणाची सानुनासिक व्याकरण मीमांसा पुण्यात ज्या मानसिकतेकडून झाली त्याच मानसिकतेने आगरकरांची जिवंतपणी अंतयात्रा काढली आणि तीच मानसिकता दाभोळकरांच्या भ्याड खूनाला सर्वोच्च धर्मकार्य मानते.महापुरुषांचा इतिहास अभ्यासा. पहिला विरोध त्यांना घरातूनच झाला.म फुलेंची समाजमनावर असलेली पकड त्यांच्या कुटुंबीयांना ही भावली नव्हती."ख्रिस्तसेवकाची"उपाधी देणारे त्यांचे तथाकथित वंशज हे एका संघटनेच्या व्यासपीठावर आत्ता कशासाठी बसले आणि का बसवले हि चिकित्सा करणे गरजेचे आहे.
     सध्या च्या धर्मांधपणाच्या कल्लोळात महात्मा फुलेंवर टिका करण्याची संधी तथाकथिक धर्मवीर सोडत नाही.आभाळाएवढं काम असलेले फुले कसल्या राजकीय शिक्षेचा परतावा म्हणून समाजकार्य करत नव्हते ."सर्व साक्षी जगत्पती नको त्यास मध्यस्थी "म्हणत पौराहित्य केलेल्यांचा ऐतखाऊ आर्थिक कणा फुलें नी समूळ मोडला म्हणून त्यांच्या समकालीन लेखकांचा राग समजू शकतो.
  धर्मप्रेमी फुलेंचा ख्रिस्तसेवक किंवा त्या धर्माचा दलाल म्हणत त्यांच्या चरित्राचं हनन करतात.पण फुलेंच्या माध्यमातून किती ख्रिस्ती झाले ? कोण कोण झाले? ह्याचं उत्तर त्यांच्याकडे कधीच नसतं.उलट हिंदू धर्माला पोषक ठरलेल्या आर्य समाजाच्या धुरीणांना पुण्यातील मिरवणुकी वेळेस संरक्षण पुरवणारे म फुले होते ह्या ऐतिहासिक तथ्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते.आता ना वा टिळक हे ब्राह्मण कुलोत्पन्न गृहस्थ स्वता अमेरिकन मिशन द्वारे ख्रिश्चन होऊन उच्चकुलीन ब्राह्मणांची आर्थिक पुरवठ्याद्वारे धर्मांतरे करत .पण,त्यांच्या कविता मैलाचा दगड मानून त्याची पारायणे ही पुण्यात होत.ह्याच टिळकांनी "ख्रिस्तायण"हा ग्रंथ लिहून अखंड हिंदुस्थान ख्रिस्तमय करायची अभिलाषा बाळगली होती.आज अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिश्चन लोकवस्तीची वाढ ह्यांच्याच एका रेव्हरंड रामचंद्रपंत मोडक नामे सहर्याची  पायाभरणी आहे.पण आमचे आजचे अर्धवट धर्मवीर मात्र कोणताही पुरावा नसताना म फुलेंना दोषी धरतात.विशेष म्हणजे रमाबाई रानडेंच्या आश्रमात ज्या ब्राह्मण स्त्रियांच्या धर्मांतराची प्रकरणे झाली त्याकडे कटाक्ष टाकत नाहीत.
 एका ठराविक वर्गातल्या महापुरुषांचं ठरवून चरित्र हनन करणारे व त्यांचे प्रबोधिनीवादी विद्यावाचस्पती मूग गिळून बसतात.म फुलेंच्या कार्याचा राजकीय लाभ घेणारे तथाकथित पुरोगामी मतांच्या भाऊगर्दीत आणि आमदारकीत एवढे रमलेत की काळ सोकावतोय ह्याचंही त्यांना भान नाही
 पुरवलेलं वाचलं आणि गरजेचं मांडलं की फुटकळ दळिद्री विचारांच्या निकृष्ट बीजांच्या विषवल्ली महापुरूषांच्या चरित्रे गुरफटतात हा इतिहास आहे.संतचळवळीवर ताशेरे ओढले म्हणून फुलेंना दोषी मानणारे संताना टाळकुटे आणि निष्क्रियावादी म्हणलेल्या राजवाडे प्रभृती इतिहासकरांबद्दल ब्र काढत नाही.राजवाडेंना गुरूपदी बसवलेल्या हिंदुह्रदयसम्राट आणि हिंदुसंघटकांची संतमंडळींबद्दलची मते समाजापुढे मांडत नाहीत.
  म फुलेंचा विद्रोह हा काही त्यांच्या जातिसाठी नव्हता.तो कित्येक वर्ष पिचलेल्या मनांचा संघर्ष होता.त्यामुळे त्यांची पाठराखण एकजातिय होणे नाही.आज म फुलेंचं चरित्रहनन होत आहे उद्या हि वेळ इतर महनीय महापुरुषांवर येणार ह्यांचे विचार जागीच ठेचायला हवेत कारण ....म्हातारी मेल्याचं दुःख नसतं पण काळ सोकावतो....!!

-सचिन शिवाजीराव खोपडे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular