Homeमुक्त- व्यासपीठजागतिक कन्या दिवस निमित्त : लेक लाडकी

जागतिक कन्या दिवस निमित्त : लेक लाडकी

नको आता माझ्या लेकी बापाची तू काळजी करू,
जीव आहेस तू माझा मी तुला कसा सावरू…
धीर देऊन स्वत:ला बनायचंय महामेरू,
नको आता माझ्या लेकी बापाची तू काळजी करू.

बापानं तुला जन्म दिला जगणं मात्र तू दिलेस,
मरणातून जगण्याला जीवंत मात्र तूच केलंस..
आधाराची काठी आणि तुच माझी वाटसरू,
नको आता माझ्या लेकी बापाची तू काळजी करू.

लेक आहेस तू माझी बापाची ढाल आहेस,
संकटकाळी लढण्याचं तूच तर बळ दिलंस…
दोघं मिळून जगण्यातील अडचणींवर मात करु,
नको आता माझ्या लेकी बापाची तू काळजी करू.

नको बाळा चिंता करू अश्रूंचा पाट वाहू,
बापाच्या काळजीनं टकामका वाट पाहू…
दाटलेल्या कंठाला सांग लेकी कसं आवरु,
नको आता माझ्या लेकी बापाची तू काळजी करू.

पोटचा तू गोळा माझ्या हातावरचं फोड तू,
तोल जाईल लेकी माझ्या काळजी करणं सोड तू…
बाप लेकीच्या नात्यावर आभाळभर माया पसरु,
नको आता माझ्या लेकी बापाची तू काळजी करू.

दूर कुठे मी तुझ्या तू तर माझ्या जवळ आहेस,
माझ्या जीवनात तू म्हणजे भातुकलीचा खेळ आहेस…
खेळावरच्या पटावर दोघं मिळून राज्य करु,
नको आता माझ्या लेकी बापाची तू काळजी करू.

लेक लाडकी गोजिरवाणी बापाशिवाय राहिल कशी…?
लाडीगोडी केविलवाणी कुणाकडे मागेल कशी…?
माझ्या लेकरा बापासाठी कुठेच नको हात पसरु,
नको आता माझ्या लेकी बापाची तू काळजी करू.

              - संतोष शिवाजी बामणे

कोट, जि. बेळगाव

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular