Homeआरोग्यजागतिक दंत आरोग्य दिन

जागतिक दंत आरोग्य दिन

आज 20 मार्च जागतिक दंत आरोग्य दिवस! 2020 ते 2022 चे घोषवाक्य आहे be proud of your mouth!
तुम्हाला वाटेल की आता हे काय नवीन!आता आपण कशा कशाचा अभिमान बाळगावा?
एक सांगू का?आपण कशाचाही अभिमान बाळगण्यापेक्षा आपले वागणे इतरांना अभिमानास्पद वाटेल असे आचरण ठेवले तर?
आज जागतिक दंत आरोग्य दिवस आहे म्हणून दातांबद्दल आणि मुख आरोग्याबद्दल बोलूयात . आपण काय केले तर आपल्या डेंटिस्टला आपला अभिमान वाटेल?
सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या दातांच्या आणि तोंडाच्या संरचनेला समजावून घेणे. दातांच्या संरचनेबद्दल मी मागच्या काही लेखातही सांगितले होते.आणि गुगलवर शोधले तर अगदी व्यवस्थितपणे दातांची संरचना सांगितलेली आहे.
आपण आज दंत आणि मुख आरोग्य या विषयावर अनेक रुग्ण जे प्रश्न वारंवार विचारतात ते प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांचा विचार करणार आहोत.


प्रश्न १)मी रोज दात घासतो /घासते तरीही माझे दात का किडतात?

उत्तर-:याचे उत्तर मिळवताना काही बाबी लक्षात घेऊया.
१)दिवसातून दोन वेळा दात ब्रश करणे अनिवार्य आहे.
2)मी अनेकदा हे उदाहरण देते की आपले मूल दिवसातून अनेक तास अभ्यास करते तरीही त्याचा पहिला नंबर येत नाही,तसेच काहीसे दातांचे आहे.
३)केवळ दोन वेळा दात स्वच्छ करणे पुरेसे नसते.
आपण दात स्वच्छ करण्याकडे मन लावून, पूर्ण लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
४)ज्यांना जवळचे बघण्यासाठी चष्मा लावावा लागतो ,त्यांनी चष्मा लावून दात स्वच्छ करावेत.

५)अनेकदा दात स्वच्छ करण्याची पद्धत चुकते.
दातांबरोबरच जीभ,टाळू, गालाच्या आतला भाग स्वच्छ करणे जरुरीचे असते.
६)फ्लॉस,रिन्स ,ब्रश ही त्रिसुत्री लक्षात ठेवावी.
७)केवळ ब्रशचा वापर केला तर दोन दातांच्या मधली जागा(जिथून दात किडण्याची प्रक्रिया सुरू होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते)स्वच्छ करण्याचे राहून जाते म्हणून फ्लॉसचा वापर जरूर करावा.

प्रश्न२)मी चोकलेट ,गोळ्या खात नाही,जास्त गोड खात नाही तरीही माझे दात का किडतात?
उत्तर:-केवळ गोड पदार्थ खाऊन दात किडतात असे नाही तर जे पदार्थ खाल्ल्यानंतर दातावर त्यांचा थर साठून रहातो उदाहरणार्थ वेफर्स, बिस्किटस् अगदी पोळी सुद्धा!ते पदार्थ खाल्ल्यानंतर जर व्यवस्थितपणे खळखळून चूळ भरली नाही आणि हे पदार्थ काही तास दातांवर तसेच राहिले तर दात किडण्याची प्रक्रिया सुरु होऊ शकते.त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरणे गरजेचे आहे किंवा असे पदार्थ खाल्ल्यानंतर शक्य असल्यास एखादे सफरचंद, संत्र यासारखे फळ किंवा काकडी, गाजर ,मुळा असे काही पदार्थ चावून चावून खावेत जेणेकरून आपले दात स्वच्छ होतील.

प्रश्न 3)माझे दात दुखत नाहीत याचा अर्थ माझे मुख आरोग्य उत्तम आहे असाहोतो का?
उत्तर:-केवळ दात दुखत नाहीत याचा अर्थ मुख आरोग्य उत्तम आहे असा होत नाही.
कधी कधी दात किडण्याची प्रक्रिया सुरूवातीच्या अवस्थेत असेल तरीही दात दुखत नाहीत किंवा दात किडून त्याचे तुकडे पडले तरीही दात दुखत नाही पण याचा अर्थ मुख आरोग्य चांगले आहे असा होत नाही.
कधी कधी दात किडलेले नसतात पण हिरड्या सुजलेल्या असतात,शरिरात रक्त कमी असेल किंवा इतर काही शारिरीक आजार असतील तर गालाच्या आतल्या आवरणात बदल झालेले दिसतात. याचाच अर्थ रुग्णाचे मुख आरोग्य बिघडलेले आहे असा होतो.

प्रश्न ४)माझे मुख आरोग्य चांगलें आहे हे कसे कळणार?
उत्तर-:तुम्ही जर तुमच्या डेंटिस्टकडे गेलात तर ते तुम्हाला सांगू शकतील.त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवावी की,
तुमचे शरीर जर तुमच्या शरीरात काही बिघाड होत असेल तर तुम्हाला त्याची पूर्वसुचना देते.
तुम्ही कोणताही पदार्थ खात असताना तुम्हाला कधीकधी एखाद्या दातात बारीकशी कळ येते व खाणे थांबवल्यावर ती थांबते.
खाताना किंवा ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येते.
दातांवरून व गालातून जीभ फिरवताना नेहमीपेक्षा वेगळी जाणिव होते.
गालातल्या त्वचेचा किंवा जीभेच्या आवरणाचा रंग नेहमीपेक्षा फिक्कट वाटतो.
वारंवार तोंड येते.
थोडासा तिखट पदार्थ खाताना झोंबते.
ही सगळी मुख आरोग्य बिघडलेले असण्याची लक्षणे आहेत.
यापैकी कोणतेही लक्षण दिसत असेल तर तुम्ही डेंटिस्टकडे जाणे गरजेचे आहे.

प्रश्न ५)कोणता ब्रश वापरावा आणि कोणती पेस्ट वापरावी म्हणजे दात स्वच्छ होतील?
उत्तर:-
आपण उत्तमातले उत्तम पेन आणि सर्वोत्कृष्ट कागद वापरला तरीही आपले अक्षर चांगले येईल असे नाही किंवा चांगले रंग वापरून चांगले चित्र काढता येणार नाही .तसेच दातांचे आहे. कोणता ब्रश आणि पेस्ट वापरायची याइतकेच ते कसे वापरायचे हे माहीत असणे गरजेचे आहे.
कोणताही soft ब्रश आणि फ्लोराइड असलेली पेस्ट वापरावी .
दात स्वच्छ करण्याची योग्य पद्धत शिकून घ्यावी.ते जास्त महत्त्वाचे आहे.
आपल्या दंतवैद्याने जर कोणती वेगळी टूथपेस्ट वापरायला सांगितली असेल तर ती जरूर वापरावी.
प्रश्न६) एकदा का मी कृत्रिमरित्या दात बसवले किंवा दात भरून घेतले तर ते पुन्हा किडणार नाहीत ना? जर ते पुन्हा किडणारच असतील तर मी कशाला उपचार करायचे?

उत्तर-: आपण कोणत्याही आजारावर उपचार घेतल्यानंतर तो आजार पुन्हा होणारच नाही अशी खात्री देऊ शकतो का?
तसेच दातांच्या उपचारांचे आहे.गॅरेंटी निर्जिव वस्तूंची देऊ शकतो ,सजीव शरिराच्या कोणत्याही भागाची गॅरेंटी कशी देता येईल?
आपण कधीतरी मरणार म्हणून कोणत्याही आजारावर उपचार करणे टाळतो का? नाही ना?
तसेच दातांचे आहे.आत्ता उपचार करून जर पुढची काही वर्षे दाताचा उपयोग होणार असेल तर ते अधिक चांगले.नाही का?

प्रश्न ७)दर सहा महिन्यांनी दंत तपासणी करणे खरोखरच आवश्यक असते का?
उत्तर : होय,दर सहा महिन्यांनी दंत तपासणी करणे आवश्यक आहे.
आपल्या तोंडात काय चालू आहे ते आपल्याला नीट दिसत नाही.
एखादा दात किडायची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असेल तर ते आपल्या डेंटिस्टला सहज कळेल.काही वेळेस एखादा छोटासा फोड किंवा तोंडाच्या त्वचेतील फरक तुम्हाला कळणार नाही पण डेंटिस्ट ना समजेल. काही आजारांची पूर्वसुचना आपल्याला तोंडातील बदलांमुळे मिळते.उदाहरणार्थ डायबेटिस,रक्तक्षय इत्यादि रोगांची लक्षणे तोंडात आधी दिसून येतात. म्हणूनच दंत व मुख तपासणी करणे गरजेचे आहेत.

मी आज काही प्रातिनिधिक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी काही प्रश्न असतील तर मला जरूर कळवा किंवा तुमच्या डेंटिस्ट ना जरूर विचारून शंकानिरसन करून घ्या.

पुन्हा एकदा सांगते आपल्या दातांबद्दल केवळ अभिमान बाळगू नका तर त्यांची सर्वतोपरी काळजी घ्या.

  • डॉ.समिधा गांधी
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular