Homeमुक्त- व्यासपीठ" जागतिक पुरुष दिन "

” जागतिक पुरुष दिन “

आज 19 नोव्हेंबर ” जागतिक पुरुष दिन ” . किती जणींनी आपल्या जवळच्या नात्यातील पुरुषांना शुभेच्छा दिल्या ??. जेव्हा जागतिक महिला दिन असतो तेव्हा संपूर्ण दिवस सोशल मिडियावर प्रत्यक्षात स्त्रीयांचे कौतुक ओसंडून वाहत असते. पण आज हा दिवस किती जणांच्या / जणींच्या लक्षात आहे? महिला दिन साजरा करण्यात महिलाच आघाडीवर असतात. स्वतःचे कौतुक करून घेतात. नैसर्गिक ही आहे ते. भावनेने , शब्दाने कौतुक कोणत्याही स्त्रीला सुखावणारे असते. मग पुरुषाला नसते का ? त्यांना ही आवडेलच की…

मानवी भावभावना या स्त्री-पुरुष दोघांना ही सारख्याच आहेत. पण आपण , समाजाने काही अलिखीत नियम घालून घेतलेत. पुरुष हा कठोर , भावना व्यक्त न करणारा , खंबीर , शक्तिशाली , धैर्यशील असाच हवा. त्याने भावना व्यक्त नाही करायच्या. हळवेपण नाही दाखवायचं.. का? त्याच्या आपल्या माणसांसाठी तो हळवा असूच शकतो.त्याचंही भावविश्व तेच आहे की..सहानुभूती , कणव ही पटकन स्त्री च्या वाट्याला येते. स्त्री-दाक्षिण्य , स्त्री स्वातंत्र्याचे गोडवे , पुरस्कार नेहमीच होतो.. मी ही करतेच.. पण याचा अर्थ असा अजिबातच नाही की पुरुष दुय्यम आहे..

प्रकृती आणि पुरुष हे परस्पर पूरक आहेत. दोघांशिवाय हे विश्व अपूर्ण आहे. स्त्री ला मातृत्व ; सृजनशील म्हणून अलौकिक समजतो पण पुरुषाशिवाय हे महानपण तिला येत नाही. प्रत्येक स्त्री ने जरासा विचार करून बघावा तिच्या आयुष्यातील प्रत्येक पुरूष नात्याचे काय स्थान आहे? वडील , भाऊ , नवरा , प्रियकर , काका , मुलगा , मामा , मित्र अशी किती नाती .. अशा किती नात्यांनी पुरुष आपल्याला समृध्द करतात.

कोणत्याही क्षणी पुरुषाला कमी , दुय्यम समजण्याची गल्लत होऊ नये. कितीतरी वेळा घरातील स्त्रीयांमुळे पुरुषांची कमालीची भावनिक घुसमट होते. मोकळेपणाने बोलू शकत नाहीत मग नसते आजार मागे लागतात ते मन मारल्यामुळेच.. पुरूषांना नेहमीच गृहीत धरले जाते. प्रत्येक वेळी पुरूषांचीच चूक आहे असा गैरसमज सहज केला जातो. स्त्री पुरुषांच्या भावना समानच आहेत. पूर्ण शहानिशा केल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढू नये. मान्य आहे की खूपदा पुरूषाची चूक असते कारण त्यांची विचारधारा ही शारीरिक कुवतीपर्यंतच असते.. समाजानेच अशी धारणा करून दिलेली असते..

आता हळूहळू हे चित्र बदलत आहे. स्त्री-पुरुष समान पातळीवर येत आहेत. शारिरीक फरक आहे तो राहणार च आणि तो सुंदर आहे.. पालकांची जबाबदारी मोठी आहे.. मुलीला स्वतंत्र सक्षम समर्थपणे उभी करताना पुरूषाचा योग्य आदर , मान राखण्याचीही शिकवण दिली गेली पाहिजे.

पुरुषांनीही हे लक्षात ठेवले पाहिजे की भावनाप्रधान असणे , कधीतरी रडू येणे हे दुबळेपणाचे लक्षण नाही तर भावनांचा निचरा होणे हे अत्यंत नैसर्गिक आणि गरजेचे आहे. इथे तुमचा पुरूषार्थ कसोटीला लागत नाही.

स्त्री आणि पुरुष ही एकाच रथाची दोन चाके आहेत. कोणी हीन कोणी श्रेष्ठ नाही तर दोघेही समान पातळीवर आणि एकत्र सर्वोत्तम आहेत.

आज मी समस्त पुरुष वर्गाला माझे नातलग , माझे मित्र सर्वांना आदरपूर्वक , मनःपूर्वक ” जागतिक पुरुष दिनाच्या ” शुभेच्छा देते. असेच आमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आनंदाने आमच्या बरोबर रहा..

©®मधुश्री देशपांडे गानू

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular