Homeमुक्त- व्यासपीठजाहिराती तले विश्व आणि मी

जाहिराती तले विश्व आणि मी

काल टिव्हीवर कोणत्यातरी पेयाची जाहिरात चालू होती. त्यातली तरुणी जाहिरातीतले पेय पिते तिला ते खूपच आवडते. तेवढ्यात तिचा मित्र येतो. ती बीन बॅगवर (बीन बॅग म्हणजे थर्माकोलचे साबुदाणे भरलेले रेक्झिनचे चेनवाले पोते. यावर खुर्चीप्रमाणे बसता येते) बसते पण त्या बॅगची चेन उघडते आणि सारे थर्माकोल घरभर उडते. बर तो पसारा आवरण्याऐवजी ही आणि हिचा तो मित्र चक्क हसतात!!
असे काही झाले की मला वाटते आता ही बया किंवा खरतर जाहिरातीचे शूटिंग करणारे हा पसारा कसा आवरतील?
एका जाहिरातीत एका बाईने केलेले गुलाबजाम वर्गणी मागायला आलेली मुले खाऊन टाकतात. ही न रागावता चक्क हसते. असं कुठं असतय का राव? काहीच्या काही दाखवतात हे जाहिरातवाले. एकतर कोणी सगळे जेवण पाहुणे यायच्या आधीच टेबलावर आणून ठेवतात का? आणि गोडाचा पदार्थ तर नक्कीच असा टेबलावर न झाकता ठेवणार नाही.माशा नाही का बसतील. माझ्या मुलाने असा गुलाबजाम खाल्ला असता तर धपाटा बसला असता पाठीत.

मला काय झालेय माहीत नाही पण टिव्हीवर पावसात भिजणारे कोणी पाहिले की त्यातला रोमान्स जाणवत नाही पण या भिजणाऱ्यांना सर्दी होईल का? आता यांचे कपडे कसे सुकणार? रंगीत कपडे घातले असतील तर या कपड्यांचा रंग जाईल का?एकमेकांना मिठी मारलीय ओलेत्याने आता हिच्या ड्रेसचा रंग त्याच्या पांढऱ्या शर्टाला लागेल. असलेच प्रश्न पडतात.

अगदी अमिताभ रेखाला ट्यूलिप गार्डनमध्ये पाहिल्यावर एखादीला त्यांची जोडी, त्यांची अॅक्टिंग दिसेल, निसर्ग सौंदर्य दिसेल पण मला त्या फुलांवर मधमाश्या तर नसतील ना? त्या यांना चावतील म्हणून टेंशन येते.
गवतावर लोळत जाणाऱ्या जोडीला मुंग्या चावतील याची भिती वाटते.

कालिदासाला आकाशातला ढग बघून मेघदूत सुचले. मला आधी ढगच दिसत नाहीत कारण मी जमिनीकडे बघून चालते. पण जरी दिसले तरी, अगबाई गच्चीत पापड वाळत घातलेयत किंवा एखादी खिडकी उघडी नसेल ना? फार तर घरात कांदे आहेत ना? आता पाऊस पडला तर भजी तळावी लागतील असले विचार येतात.
कविता वाचल्या की कदाचित आपल्याला कवीचे मन कळेल. आपणही कल्पनेच्या विश्वात रममाण होऊ असे वाटले म्हणून मी कवितांची पुस्तके आणली. पण हाय रे दैवा! बऱ्याच कविता एकदम डोक्यावरून गेल्या आणि ज्या समजल्या असे वाटले त्यांच्या बाबतीतही मला अनेक प्रश्न पडले होते.
उदाहरणार्थ
काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्यांचे हात.

हात चांदण्यांचे कसे असतील? हे कसं शक्य आहे? झालं! अडली माझी गाडी तिथेच.
एका कवितेत शब्द वाचला चांदणचुरा!! साबणचुरा माहितीय. त्याचा उपयोगही माहितीय पण चांदणचुरा!! याचे करायचे काय? मुळात चांदण्यांचा चुरा कोणी कसा काय करू शकेल.
तुझ्या प्रेमाची वस्त्रे मी जगाच्या अंतापर्यंत पांघरेन
अशीही ओळ एका कवितेत वाचली होती.
आता प्रेमाची वस्त्रे बनत नाहीत हे सगळ्या जगाला माहीत आहे.इश्श, म्हणजे काय जन्मभर काल्पनिक कपडे घालणार?? . काहीच्या काही लिहितात बाबा….

काही जण इतके कठीण कठीण शब्द वापरायचे की आधी डिक्शनरीत त्याचा अर्थ बघायला लागायचा बऱ्याचदा कवी स्वतःचेच शब्द पण बनवतात.याचा अर्थ डिक्शनरीत पण मिळत नाही. त्यामुळे
अशा कठीण शब्दांतून त्यांना काय म्हणायचे आहे ते काऽही केल्या डोक्यात शिरत नाही.
एका जाणकार कवी मित्राला विचारले तर तो म्हणाला, “एका कवितेला एक ठोस अर्थ नसतोच. वाचकाप्रमाणे अर्थ वेगळा होऊ शकतो.त्याप्रमाणे एक कविता वाचायला घेतली. माझ्या बुद्धीला एवढा ताण दिला की मला झोपच यायला लागते. मी कवितेचा नाद सोडला.

माझ्या कित्येक मैत्रिणी कसली रोमॅन्टिक पत्रे लिहायच्या आपल्या होणाऱ्या नवऱ्याला किंवा असलेल्या बॉयफ्रेंडला.
अशी पत्रे लिहावी लागतील या विचारानेच मी प्रेमाबिमाच्या फंदात पडले नाही.

त्याला गुलाब दिसला असता
मला गुलाबाचे काटे

त्याला समुद्रकाठी फेनफुले दिसली असती
मला कपड्यांना चिकटलेली वाळू

त्याला माझ्यासाठी चंद्रसूर्य आणावेसे वाटतील
मला ताजी भाजी आणावीशी
वाटेल.

सध्या मी How to fantasize and how to be romantic
यावर मिळतील तेवढ्या साईटस् पहातेय. त्याबाबतही मला अनेक प्रश्न पडलेत. अनेकांनी आपापल्या साईटवर कॉन्टॅक्ट नंबर किंवा मेल आय डी दिलेयत. त्यांना फोन करून किंवा मेल पाठवून मी माझ्या शंका विचारत असते. आजकाल त्यातल्या अनेकांनी माझा नंबर ब्लॉक का केलाय काही कळत नाहीये.
तुम्हाला माहितीय का?

  • डॉ. समिधा गांधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular