(१) डॉक्टरी व वकिली हे दोन्ही कायदेशीर मारामारीचे व्यवसाय, मग त्यांना तुम्ही उदात्त व्यवसाय म्हणा नाहीतर आणखी काही म्हणा! मारामारी म्हणजे संघर्ष आणि या दोन्हीही व्यवसायांत संघर्ष हा पदोपदी आहे. डॉक्टरांची मारामारी रोगजंतूंशी, कॅन्सरसारख्या गाठींशी असते. पेशंटना रोगजंतू, कॕन्सरच्या गाठी या भयंकर वेदना देतात. म्हणून हे रोगजंतू, या गाठी पेशंटबरोबर डॉक्टरांच्याही शत्रू होतात. डॉक्टर्स त्यांच्या औषधांनी किंवा शस्त्रक्रियांनी या शत्रूंवर तुटून पडतात व त्यांचा खातमा करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या पेशंटना न्याय देण्यासाठी ते वैद्यकीय संघर्ष करतात, वैद्यकीय युध्दे लढतात. अशी युद्धे लढणे हा डॉक्टरांचा पेशा आहे, व्यवसाय आहे.
(२) वकील तरी दुसरे काय करतात? त्यांच्या अशिलांना त्रास देणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या वाईट माणसांना ते शत्रू समजून त्यांच्यावर कायद्याची कलमे शस्त्रांसारखी सोडतात व त्यांना कोर्टात सळो की पळो करून सोडतात. अशिलांना न्याय देण्यासाठी ते कायद्याने संघर्ष करतात, कायद्याची युद्धे लढतात. असे लढणे वकिलांचा पेशा आहे, व्यवसाय आहे.
(३) पण मला डॉक्टरांच्या वैद्यकीय युद्धापेक्षा वकिलांचे कायद्याचे युद्ध जास्त आव्हानात्मक वाटते. याचे कारण म्हणजे डॉक्टर्स ज्या विशिष्ट शत्रूंविरूद्ध लढतात ते शत्रू परके असतात. ती माणसे नसतात. परंतु वकील ज्या शत्रूंविरुद्ध लढतात ती तर आपलीच माणसे असतात. मग असे युद्ध हे धर्मसंकट होते. आपल्या जवळच्या नातेवाईकांविरुद्ध लढताना महाभारतात जो प्रश्न अर्जुनाला पडला तसाच हा प्रश्न असतो. म्हणून वकिलीच्या युद्धाला मी धर्मयुद्ध म्हणतो व त्यात पडणाऱ्या प्रश्नांना मी धर्मसंकट असे म्हणतो.
(४) खरं तर, नुसत्या उद्योगपती, व्यापाऱ्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य माणसांनाही संघर्ष नको असतो, युद्धे नको असतात. त्यांना जीवनात शांती हवी असते. म्हणून माणसे जशी खुशीने डॉक्टरांच्या दवाखान्याची किंवा रुग्णालयाची पायरी चढत नाहीत तशीच ती खुशीने कोर्टाची पायरी चढत नाहीत किंवा वकिलांच्या ऑफिस मध्ये जात नाहीत. याचे कारण म्हणजे डॉक्टरी व वकिली व्यवसाय हे कायदेशीर मारामारीचे व्यवसाय आहेत. पण कायदेशीर असली तरी मारामारी करणे कोणाला मनापासून आवडते का?
- ॲड.बी.एस.मोरे©
मुख्यसंपादक